दोन दरोड्यात एक ठार, तीन जखमी, नगर पोलिसांची उतुंग कामगिरी 16 तासात आठ दरोडेखोर जेरबंद.! सगळे शालेय वयातील तरुण.!
राहाता तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हाद्दीत निर्मळपिंप्रि शिवारात एकाच ठिकाणी दोन दरोडे पडल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली होती. यात इंदोर येथून गव्हाचा ट्रक भरून बँग्लोरकडे जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला होता यात 8 ते 9 जणांनी गाडीला आडवे होऊन चालकाच्या मानेवर तलवारीने वार करीत ठार केले तर त्याच्या सोबती असणार्या दुसर्या सहकार्याकडून 300 रुपये काढून घेत त्याला देखील दांड्याने मारहाण करण्यात आली होती. तर या दरोड्यानंतर याच मार्गावर निर्मळपिंप्रि शिवारात एक ट्रकचालक लघुशंकासाठी थांबला असता तलावार व चाकू सुर्यांचा धाक दाखवून या प्रवाशांचा 25 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात
याबाबत भुपेंद्रसिंह बहाद्दुरसिंह ठाकुर (वय 36, रा.मध्यप्रदेश) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझा साथिदार कुलदिपसिंह तुंग आम्ही इंदोर येथून गव्हू भरुन बँग्लोरकडे चाललो होतो. तेव्हा सोमवार दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आम्ही निर्मळपिंप्रि शिवारात टोलनाक्याजवळून जात असताना आमच्या गाडीला सहा ते सात जण आडवे झाले. त्यांनी आम्हाला चाकू, तलवार व दांड्याचा धाक दाखवून गाडी थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यातील काही जणांनी गाडीत चढून माझ्याकडील तीनशे रुपये काढून घेतले. तर कुलदिपसिंह तुंग (वय 46) याने थोडा विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या मानेवर या दरोडेखोरांनी वार करुन त्यास ठार मारले. त्यानंतर ते आम्हाला लुटून पुढे निघून गेले. हा प्रकार पाहिल्यानंतर भेदरलेल्या आवस्थेत ठाकुर याने पोलिसांशी संपर्क केला व नंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवूून घेतला.
या पलिकडे हे निर्दयी दरोडेखोर येथेच थांबले नाही! तर यांनी पुढे जाऊन निर्मळ पिंप्रि शिवारातच दुसरा दरोडा टाकला. त्यात खलीद वाहद शेख (रा. मालेगाव जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मी व माझा सहकारी आयुब शेख आम्ही मालेगाव येथून गहू घेऊन बैंगलोर येथे जात असताना रविवार दि. 6 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास निर्मळ पिंप्रि शिवारात आम्ही लघुशंकेसाठी थोंबलो होतो. तेव्हा अचानक तेथे 6 ते 7 व्यक्ती आले व त्यांनी चाकु सर्यांचा धाक दाखवून आमच्याकडील 20 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले होते. याप्रकरणी शेख यांच्या फिर्यादीनुसार लोणी पोलीस ठाण्यात 6 ते 7 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या गुन्ह्यानंतर दरोडेेखोर सोकावले म्हणून त्यांनी दुसर्या दिवशी देखील असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सगळ्यांच्या अंगलट आल्याचे दिसते आहे.
दरम्यान एकापाठोपाठ दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. तर दरोड्याच्या गुन्ह्यात चक्क एकाचा बळी जातो याला अदखलपात्र करणे योग्य नाही. त्यानंतर पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी मनावर घेत अप्पर पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना सुचना व मार्गदर्शन केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथे डॉगस्कॉड, अंगुलीमुद्रा तज्ञ, फॉरेन्सीक व्हॉन यांची मदत घेण्यात आली. वेगवेगळ्या अधिकार्यांनी वेगवेगळी पथके तयार करुन दरोडेखारांचा शोध सुरू करण्यात आला. त्यानंतर लोणी पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक दिपक रोकडे यास या गुन्हातील काही माहिती हाती लागली. त्यानंतर तपासाची चक्रे जलद गतीने फिरली आणि या टोळीतला पाहिला मासा पोलिसांच्या गळाला लागला. तो म्हणजे किरण राशिनकर. त्यानंतर एलसीबी पथक लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांचे पथक यांनी दरोडेखोरांची दिशा शोधली.
दरम्यान पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांना देखील गुन्हेगारांची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी औटी, रोकडे व कुसळकर याचे पथक थेट दरोडेखोरांच्या मानगुटीवर बसले. त्यानंतर या गुन्ह्यातील किरण राजू राशिनकर (वय 24, रा. भगवतीपुर कोल्हार, ता. राहाता) यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसांचा खाक्या दाखविला असता तो पोपटासारखा बोलता झाला आणि त्याने दोन्ही दरोड्यात असणार्या सहकार्यांची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने सोहेल नाशिर शेख (वय 19, पिंजारगल्ली कोल्हार), संतोष सुरेश पठारे (वय 24 चर्चजवळ, कोेल्हार), विशाल कचरु लोखंडे (वय 19, कोल्हार हौसिंग सोसायटी), अक्षय राजेंद्र शिंदे (वय 19, राऊतवस्ती, कोल्हार), संकेत किरण लोखंडे (वय 18, भारत पेट्रोलपंप जवळ, कोल्हार), रुपेश ज्ञानदेव चव्हाण (रा. कोल्हार), सागर सोमनाथ देशमाने (वय 32, आंबिकानगर, कोल्हार) अशा आठ जणांना कोल्हार येथून ताब्यात घेतले आहे. तर यातील आणखी एकजण पसार आहे. या आठ जणांना आता पोलिसांनी अटक केली असता आज दुपारी न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर त्यांना 19 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे, या गुन्ह्यानंतर आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. नगर जिल्हा पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.