संगमनेरात कोविड केंद्र की जीवघेणे सेंटर.! व्हिडिओ पाहून थक्क व्हाल.! जिल्हाधिकारी साहेब.! तुमचा जिल्हा तुमची जबाबदारी!
सार्वभौम (संगमनेर) :- संगमनेर तालुक्यात कोरोनाचा रोजचा वाढता प्रादुर्भाव पाहता वसंत लॉन्स येथे कोविड सेंटर उभारण्यात आले. पण येथे रुग्णांना सुविधांचा अभाव होत असल्याचे रुग्णांकडून तक्रार केली जात आहे. आता ह्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना संगमनेर साखर कारखान्याकडून मोफत उपचार मिळत असलेतरी येथे रुग्णांना अमानुष वागणूक मिळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, "भिक नको मात्र कुत्र आवर" अशी गंमत येथे पहायला मिळत आहे. जीव वाचावा म्हणून लोक सरकारच्या भरवशावर बसतात, मात्र, येथे मरणप्राय यातना सोसाव्या लागत असेल तर त्या मोफत उपचाराचा उपयोग तरी काय? असा ही प्रश्न कोरोना ग्रस्तांनी उपस्थित केला आहे. येथे कोविड पॉझिटीव्ह रुग्णांची वेळेवर तपासणी होत नाही, रुग्णांना उपचारा आभावी सोडले जाते, वेळेवर जेवण मिळत नाही, मिळाले तर नित्कृष्ट दर्जाचे, संडास, बाथरूमची स्वछता नाही, रोजच्या वाढत्या रुग्ण संख्येने येथे नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, येथे कारखाना स्वत: उत्पादन घेत असतानाही येथे सॅनिटायझरची फवारणी देखील होत नाही. कोरोनाबधित रुग्णाने संबंधित अधिकार्यांकडे तक्रार केली तर त्याची दखल घेतली जात नाही. एकूणच येथे कैद्यांसारखी वागणूक मिळून मानसिक छळ होत असल्याचे रुग्णांकडून बोले जात आहे. तर येथे चांगल्या सुविधा मिळतात असे लोकांकडून वदून घेतले जातेय अशी कागाळी पुढे येऊ लागली आहे. आता असा उपचार या कोविड सेंटरमध्ये भेटत असेल तर पर्यायी लोक खाजगी दवाखान्यात जाण्यास पसंत करतात. परंतु येथे लाखो रुपयांचे बिल हातात मिळते. त्यामुळे, जगावे की मरावे? अशी परिस्थिती संगमनेरातील कोविड सेंटरची झालेली पहायला मिळत आहे. ऐकीकडे जीव प्यारा आहे. तर दुसरीकडे पैसा नाही सरकारी यंत्रणा आहे तर तेथे उपचार व सुविधा योग्य मिळत नाही. जो मिळतो तो अपुरा असतो. त्यामुळे येथे रुग्ण वाढले की लागेच कोविड सेंटर मधून चार ते पाच दिवसातच सोडून दिले जाते, अशा तक्रारी देखील आल्या आहेत. हे संगमनेरच नाही तर राज्यात बहुतांशी ठिकाणी हेच चित्र दिसत आहे. मात्र, त्यावर बोलणार तरी कोण ? प्रत्येकजण कोठे ना कोठेतरी मिंधे आहेत. तर माध्यमे देखील पंडुरंग रायकर सारखी एखादा जीव गेल्यानंतर आवाज उठविणार की काय.! असा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आता जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोना बाधित झाले आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी साहेब.! प्रशासकीय दृष्ट्या हा तुमचा जिल्हा असून यात लक्ष घेलणे ही देखील तुमची जबाबदारी आहे. तुमची संवेदनशीलता लक्षात घेता नक्कीच यात बदल होईल अशी अपेक्षा संगमनेरकरांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, एक गोष्ट लक्षात आलेली नाही. की, सरकारी कोविड सेंटरमधून प्रत्येकाला सहा ते सात दिवसात सोडले जाते. माग हेच रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये आठ ते दहा दिवस ठेऊन कोविडवर ठोस औषध नसताना ते नेमकी करतात तरी काय? हे कोडे आजवर उलगडले नाही. यात मात्र, एक गोष्ट लक्षात येते की, रुग्ण घरी जाताना लाखो रुपये बिल तेथे हमखास देऊन जातो. त्यामुळे येथे कोरोना बाधीत रुग्ण नक्कीच आगीतून उठून फुपाट्यात पडल्यासारखे फिल करतो. या रुग्णांना मिळणार्या वागणुकीची दखल वरिष्ठ अधिकार्यांनी घ्यायला हवी. पण, येथे मात्र संबंधित कोविड सेंटर चालवणार्या लोकांना अधिकारी पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे.
तर बुधवार दि. 16 सप्टेंबर रोजी येथे अॅडमिट असणार्या दोन रुग्णांनी एक अर्ज केला होता. त्यात येथील कोविड सेंटरवरील बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला होता. तो अर्ज काहींनी जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभाग मुंबई येथे पाठविला आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांना टाईफाईड आणि पांढर्या पेशी कमी झाल्याचा त्रास झाला होता. मात्र, त्याच दरम्यान त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे त्यांना वसंत लॉन्स येथे अॅडमिट करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी सांगितले होते की, येथे तुम्हाला उपचार मिळेल. मात्र, ते आठ दिवस बेडवर पडून होते. तरी त्यांना कोणत्याही प्रकारची ट्रिटमेंट दिली नाही. तर याच अर्जात त्यांनी अनेकांची पितळ उघडे पाडले आहे. या व्यक्तीने असे अर्ज केल्यामुळे आणि रुग्णांवर होणार्या अन्यायावर वाचा फोडली असता त्यांनी घरी सोडल्यानंतर रहिमपूर येथील तलाठ्याने त्यांना घरी न राहता मराठी शाळेत थांबण्यास सांगितले. जर तेथे थांबले नाही तर जिल्हाधिकारी साहेबांनी तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना असे सांगण्यात आले. तेव्हा हे लोक अगदी आडगळीत पडलेल्या शाळेत नाईलाजास्तव झोपले. जेथे ती शाळा सॅनिटाईझ सोडा, झाडलेली नव्हती, त्यात विंचू, मच्छर आणि विषारी साप देखील वास्तव्य करीत होते. असे त्यांनी अर्जात नमुद केले आहे. इतकेच काय! हे लोक जाणिवपुर्वक त्रास देत असून जर या दरम्यान माझ्या जिवितास काही झाले तर त्यास हेच प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील असा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
आता कोविड हे रोष व्यक्त करण्याचे माध्यम आहे. याची येथे प्रचिती झाली आहे. म्हणजे मंत्र्याला कोरोना झाला तर त्याला घरीच उपचार आणि सामान्य मानसाला जरा देखील सुट नाही. तसेही जिल्हाधिकार्यांचे सुधारीत नियम वाचले तरी प्रशासनाच्या करामतीचा बुरखा फाटेल. मात्र, एकीकडे ते जनतेसाठी अतोनात व अहोरात्र कोरोनाशी झुंज देत आहे. त्यामुळे, त्यांच्या मानसिकतेचा आपण विचार केला पाहिजे. मात्र, त्यांनी देखील एखाद्याचा इतका अंत पाहू नये. हीच परिस्थिती कोणाच्याही जवळच्या व्यक्तीवर ओढावली तर आपली देखील तळपायाची आग मस्तकात जाईल. त्यामुळे, प्रत्येक घटनेच्या वेळी त्या ठिकाणी स्वत:ला ठेऊन पाहिले पाहिजे. मात्र, या पलिकडे जे शासनाची लुट करुन बक्कळ पैसा कमविण्याच्या मागे लागले आहे. त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे.
आज शहरासह तालुक्यात 26 रुग्ण आढळून आले. यामध्ये जोर्वे येथे 40 वर्षीय पुरुष तर वेल्हाळे येथे 36 वर्षीय पुरुष व बीरेवाडी येथे 57 वर्षीय पुरुष तर गुंजाळवाडी येथे 55 वर्षीय पुरुष तर निमगाव बु 64 वर्षीय पुरुष व सुकेवाडी 69 वर्षीय पुरुष व शहरातील जनतानगर येथे 45 वर्षीय महिला तर पोखरी हवेली येथे 62 वर्षीय महिला व ओझर खुर्द येथे 8 वर्षीय बलिकेला 50 वर्षीय आणि 55 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर घुलेवाडी येथे 50 वर्षीय पुरुष व निमोण येथे 20 वर्षीय पुरुष तर पळसखेडे येथे 31 वर्षीय पुरुष व मालदाड येथे 50 वर्षीय महिला तर कौठे बु येथे 46 वर्षीय पुरुष व चंदनापुरी येथे 66 वर्षीय महिला व सावरगाव तळ येथे 65 वर्षीय 13 वर्षीय 65 वर्षीय महिला व 37 वर्षीय पुरुष तर वेल्हाळे येथे 34 वर्षीय व 30 वर्षीय महिला तर शहरातील मालदड रोड येथे 23 वर्षीय महिला व 4 वर्षीय बलिकेला कोरोनाची बाधा झाली आहे.त्यामुळे शहरासह तालुक्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 हजार 588 वर जाऊन पोहचली आहे.
भाग 1 क्रमश:
- सुशांत पावसे