हाहाहा.! ते वाळुतस्कर बैलगाड्या सोडून पळाले.! पोलिसांनी बैल केले जप्त.! गाढव धंदा सुरुच.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील शेडगाव शिवारात स्मशानभूमीजवळ प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळु वाहत असल्याची माहिती आश्वी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मांडवरकर यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी शेडगाव शिवारात जाऊन दोन बैलगाड्यांवर कारवाई करत १ लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल केले आहे. यात अनिल माधव फड व दत्तात्रय शांताराम नागरे (रा. शेडगाव, ता. संगमनेर) यांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शेडगाव परिसरातील प्रवरा नदीपत्रातून काही लोक बैलगाडीचा वापर करुन वाळु काढत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मांडवकर यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक करुन थेट शेडगाव शिवार गाठले. त्यानंतर नदी पत्रातून बैलगाडीद्वारे अवैध वाळूची वाहतूक करत असल्याचे लक्षात आले. त्यांनी एकाचवेळी दोन बैलगाड्यांना हटकवले व त्यांनी विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी असल्याचे कागद मिळाला नाही. त्यामुळे या दोघांवर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यात अनिल माधव फड (रा. शेडगाव, ता. संगमनेर) दत्तात्रय शांताराम नागरे (रा. शेडगाव, ता. संगमनेर) या वाळु चोरट्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेचा पुढील तपास शेख करीत आहे.
दरम्यान, संगमनेरमध्ये वाळुचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. येथे गाढव, बैलगाडी, हायवा, ट्रॅक्टर व अधुनिक यंत्रणेद्वारे राजरोस अवैध वाळु तस्करी केली जाते. पाणी आटले की २४ तास उपसा करुन स्टोअरेज केला जातो आणि पाणी आले की, अव्वाच्या-सव्वा भाव करून विकली जाते. संचारबंदी असतानाही संगमनेरात वाळु माफियांनी हैदोस घातला होता. या लॉकडाऊनच्या काळात महसूल कर्मचाऱ्यांना ही धक्काबुक्की केल्याचे पाहायला मिळाले आहे. तर संगमनेर खुर्द येथून वाळुच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या एका पोलिसाने खाजगी गाडीचा वापर केला होता. तो वाळुच्या गाडीचा पाठलाग करत असताना तिघांचा जागीच मृत्यू देखील झाला होता. पण, त्या पोलिसाला बड्या अधिकाऱ्याचा हात पाठीशी असल्याने या प्रकरणात "तेरी भी चूप और मेरी भी चूप"असेच काहीसे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर या प्रकरणाचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात राहिले. ही घटना होऊन महीना उलटत नाही तेच शहरातील जोर्वेनाका येथे वाळू भरलेल्या एका पिकपच्या धडकेत आरफाद शेख या १९ वर्षीय युवकाचा मृत्यु झाला होता. तर यापुढे आश्चर्याची बाब म्हणजे तहसिल कार्यलयाच्या आवारातून जमा केलेले ट्रॅक्टर पळवून नेले जातात. त्यामुळे संगमनेरमध्ये वाळू माफियांना कायद्याचा धाक आहे की नाही? असा प्रश्नही तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. इथे फक्त थातूर-मातूर कारवाई केली जाते. पण येथे गब्बर झालेले वाळुतस्कर यांना पोलीस, महसूल विभाग यांची किंचितही भीती राहिलेली नाही. त्यामुळे घारगाव-साकुर परिसरातील मुळा नदी ते कसरवाडी आणि आश्वी परिसरातील प्रवरा नदी येथे राज-रोज वाळूची तस्करी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. येथे महसुल व पोलीस यांनी वाळूतस्करांवर संयुक्तपणे कारवाई करणे अपेक्षित आहे पण, तसे होताना दिसून येत नाही. त्यामुळे, वाळू तस्करांनकडून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्का-बुकी होत असल्याचे तालुक्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे, प्रशासनाने येथे कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे.