अखिलेश कुमार सिंग बदलले, सोलापुरचे मनोज पाटील नगर जिल्ह्याचे नवे एसपी! पोलिसांच्या उद्यापासून कारवाया आणि नंतर सेटिंग सुरू..!

सार्वभौम (अहमदनगर) :-  

                राज्याच्या गृहखात्यातून आज दि. गुरूवार दि. 17 रोजी रात्री 22 पोलीस अधिक्षकांच्या बदल्या करण्यात आला आहेत. त्यात नगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांची पुन्हा पदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नव्याने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे, गेल्या दोन वर्षात आता हे तीसरे पोलीस अधिक्षक नगर जिल्ह्याला पहायला मिळाले आहे. तर यांच्या व्यातिरिक्त पोलीस अधिक्षक ते पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या देखील पदोनत्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, राज्यात पोलीस दलात मोठे फेरबदल पहायला मिळाले आहेत. एकंदर नगर जिल्ह्यातील अखिलेश कुमार सिंह यांची बदली होणार होती. यावर पुर्वीच शिक्कामुर्तब झाले होते. विशेष म्हणजे ते नगर जिल्ह्यात बदलून येणार याची माहिती देखील रोखठोक सार्वभौमने टाकली होती. तर त्यांची बदली होणार हे देखील काही अधिकार्‍यांना सांगण्यात आले होते. 

दरम्यान 22 पैकी पोलीस अधिक्षक मोहित कुमार अहेरी येथून रत्नागीरी पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर विक्रम देशमाने यांची पोलीस उपायुक्त दहशतवादी पथक मुंबई ते पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण येथे संधी देण्यात आली आहे. तसेच राजेंद्र दाभाडे यांना गुन्हे विभाग मुंबई ते सिंधुदूर्ग पोलीस अधिक्षक,  सचिन पाटील हे राज्य राखिव पोलीस बल ते पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण, प्रविण मुढे रत्नागिरी ते जळगाव पोलीस अधिक्षक, अभिनव देशमुख हे कोल्हापूर ते पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, दिक्षित कुमार गेडाम हे सिंधुदुर्ग ते सांगली पोलीस अधिक्षक, गडचिरोली येथील कर्तव्यदक्ष अधिकारी शौलेश बलकवडे यांना कोल्हापूर पोलीस अधिक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यांनी यापुर्वी अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून मोठी धडाकेबाज कामगिरी केलेली आहे. ते जेथे जातील तेथे मोठा मानुसकीचा खजिना घेऊन बाहेर पडतात. त्यांनी यापुर्वी नागपूर शहर तसेच रेल्वे पोलीस अधिक्षक म्हणून देखील उल्लेखनिय काम केलेले आहे. विनायक देशमुख यांची सहायक पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था येथून जालना पोलीस अधिक्षक म्हणून बदली झाली आहे. राजा रामास्वामी यांची पोलीस उपायुक्त गुप्त वार्ता विभाग येथून बीड पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हे अधिकारी कडक शिस्तिचे असून त्यांची सन 2016 साली नगर जिल्ह्यात आमरावतील येथून बदली झाली होती. ते हजर झाल्यानंतर अवघ्या नऊ दिवसानंतर त्यांचे व तत्कालिन पालकमंत्री यांचे शब्दयुद्ध झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर त्यांची त्याच्या दुसर्‍या दिसशी थेट अहीरे गडचिरोलीकडे बदली झाली होती. मात्र, तरी देखील या अधिकार्‍यांने आपला स्वाभिमान आणि वर्दीची इमेज गहान ठेवली नव्हती ना कोणाच्या दबावाला बळी पडले होते. त्यानंतर त्यांच्या काही ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. मात्र, या सरकारमध्ये त्यांनी बीड पोलीस अधिक्षक म्हणून संधी मिळाली आहे. 

प्रमोद शेवाळे यांची पोलीस उपायुक्त ठाणे परिमंडळ ते पोलीस अधिक्षक नांदेड, निखील पिंगळे हे राखिव दल मुंबई ते लातूर पोलीस अधिक्षक, जयंत मीना हे पुर्वी परिवेक्षाधिन म्हणून नगर जिल्ह्यात कार्यरत होते. शांत संयमी व्यक्तीमत्वाला परभणी पोलीस अधिक्षक म्हणून संधी मिळाली आहे. तसेच वसंत जाधव शिघ्र कृतीदल मुंबई ते भंडारा पोलीस अधिक्षक, प्रशांत होळकर हे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) ते पोलीस अधिक्षक वर्धा, आरविंद साळवे हे पोलीस अधिक्षक भंडारा ते पोलीस अधिक्षक चंद्रपूर, विश्वास पानसरे हे पोलीस अधिक्षक नागपूर ते पोलीस अधिक्षक गोंदिया पोलीस अधिक्षक, आरविंद चावरीया हे पोलीस अधिक्षक लाचलुचपत औरंगाबाद ते पोलीस अधिक्षक बुलढाणा, डी. के पाटील बुलढाणा ते पोलीस अधिक्षक यवतमाळ, अंकीत गोयल पोलीस उपायुक्त परिमंडळ मुंबई ते पोलीस अधिक्षक गडचिरोली अशा 22 जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान आता यानंतर जिल्ह्याचा विचार केला तर लवकरच पोलीस अधिक्षकांच्या बदल्या होणार आहे. त्यामुळे, जिल्ह्यात काही नवे पोलीस निरीक्षक येणार आहे. तर ज्यांची चार वर्षे पुर्ण झाले आहेत. त्यांनी जिल्ह्यातून काढता पाय घ्यावा लागणार आहे. जे थांबतील ती पोलीस निरीक्षक श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, नगर शहर, कोतवाली, श्रीगोंदा, पारनेर असे मोठे पोलीस ठाणे घेण्यासाठी धडपड सुरू करतील. तर सहायक पोलीस निरीक्षक हे नगर तालुका, कोपरगाव तालुका, सोनई, आश्वी, लोणी, श्रीरामपूर तालुका अशा ठिकाणी आपापली फिल्डींग लावण्यास सुरूवात करतील. खरंतर अनेकांनी जुन्या पोलीस अधिक्षकांकडे लगट सुरू केली होती. मात्र, त्यांची बंदली होणार हे निच्छित होते. त्यामुळे, आता नेमके कोण कोठे सेटिंग लावते आहे. ही चुरस पहायला मिळणार आहे. तर संगमनेर, लोणी, पारनेर, कोपरगाव अशा ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या मर्जीचा माणूस घेतात. त्यामुुळे, गेल्या कित्तेक दिवसांपासून वाड्यांवर, बंगल्यांवर किंवा मंत्र्यालयात सदिच्छा भेटीचा उपक्रम सुरू आहे. मात्र, हे पोलीस अधिक्षक नेमकी काय भूमिका घेतात. नगर जिल्ह्यात ताठरपणे चालले तर रामासामी किंवा लखमी गौतम यांच्यासारखे अर्ध्यावर डाव सोडून इच्छा नसताने जावे लागते हा इतिहास आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या जिल्ह्यात आता पाटील महोदय कसे काम करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, काही झाले तरी नगर जिल्हा जितका नावाने सरळ आहे. तितका तो सरळ नक्कीच नाही. ये नगर जिल्ह्यात येणार्‍या नवख्या व्यक्तीने विसरुन चालणार नाही. 

- सागर शिंदे