नालाईक पणाचा कळस.! कोरोना पॉझिटीव्ह कुटुंब अ‍ॅडमिट आणि त्यांच्याच घरी चोरट्यांचा डल्ला.!

सार्वभौम (अकोले) :- 

                       अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथे चोरट्यांच्या नालाईकपणाचे दर्शन घडले आहे. कारण, येथे एक तुंबारे कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे त्यांना कोविड सेंटरमध्ये अ‍ॅडमिट केले होते. याचाच फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लक्ष ठेऊन डाव साधत या शिक्षकाच्या घरावर डल्ला मारला. यात तब्बल 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोने व पंन्नासहजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. ही घटना सोमवार दि. 31 ऑगस्ट ते शनिवार दि. 5 सप्टेंबर 2020 या दरम्यान घडली. याप्रकरणी तुंबारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुंभेफळ परिसरात एक तुंबारे कुटुंब राहते. दुर्दैवाने गेल्या महिन्यात त्यांच्या कुटुंबावर कोरोनाचे सावट ओढावले होते. त्यामुळे जवळ-जवळ सर्वच कुटुंब अकोले तालुक्यातील खानापूर येेथे अ‍ॅडमिट होऊन उपचार घेत होते. जेव्हा त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले तेव्हा त्यांनी रुग्णालयात जाताना घराचे दारे खिडक्या व्यवस्थित बंद केल्या होत्या. पुन्हा कधी माघारी येणार हे माहित नसल्याने त्याबाबत त्यांनी अन्य कोणाला माहिती देखील दिली नव्हती. कारण,  तसेही लोकांनी कोरोनामुळे मानुसकी पुर्णत: सोडून दिली आहे. त्यामुळे, त्यांना विचारण्यासाठी देखील तेथे कोणी येत नव्हते. त्यामुळे, येणार्‍या काळात येते कोणी चोरी करेल अशी शंका देखील त्यांच्या मनात डोकावली नव्हती. मात्र, या दरम्यान अज्ञात चोरट्यांच्या नजरेतून हे बंद घर सुटले नाही. रोज बंद असणारे घर आणि त्यातल्या त्यात ते शिक्षकाचे.! त्यामुळे, चोरट्यांनी त्यावर डल्ला मारण्याचे ठरविले आणि बंद घराचा फायदा घेत त्यांनी पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान घरातील साहित्यांची उचकापाचक केली. घरात नेमके कोठे काय ठेवलेले आहे याचा शोध घेताना त्यांनी घरातील वस्तुंची उचकापाचक केली. त्यामुळे घरात मोठा पसारा पडला होता. तर याच वेळी त्यांनी कपाटाचे लॉक तोडून त्यात ठेवलेले पंन्नास हजार रुपये, सोन्याची पोत, नेकलेस, चार अंगठ्या, चैन आणि लहान मुलाचे दागिने असे तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास करुन चोरट्यांनी पोबारा केला. 

दरम्यान, आजारातून बरे होऊन तुंबारे कुटुंब सुखरूप घरी आल्यानंतर ते घरासमोर येताच त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांनी घाईघाईना दरवाजा उघडला असता घरात एकच पसारा पडलेला दिसला. त्यामुळे तुंबारे यांनी घाईघाईने कपाट तपासले असता त्यातील सर्व मुद्देमाल चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तुंबारे यांनी अकोले पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. दरम्यान घडलेला प्रकार पोलिसांना कथन केल्यानंतर अकोले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तर तुंबारे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. आता या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक पांडे करीत आहे.

                               

                     दरम्यान, देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलीस प्रशासन कोरोनाविरुद्ध दोन हात करत रस्त्यावर उतरून काम करत आहे. त्याचाच फायदा उचलत चोरट्यांनी आपले डोके बाहेर काढून चोर्‍या दारोडे, रस्तालुट अशी गुन्हे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कोरोना बरोबर आता चोरट्यांची ही दहशत जनतेमध्ये पसरु लागली आहे. यावर वेळीच वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालावे असे तालुक्यातील नागरिकांकडून मागणी होत आहे. तर लोक कोरोना म्हटलं की जवळ यायला कोणी धजत नाही. मात्र, येथे चक्क त्या घरात चोरट्यांनी आत शिरुन चोरी केली आहे. त्यामुळे, हे काम लक्ष ठेऊन असेल तर अशी धाडस कोणी केली असावी? आणि अज्ञात चोरटे म्हणायचे तर ते कोण असावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टिप : रोखठोक सार्वभौमच्या बातम्या आपल्या मोबाईलवर मिळाव्यात यासाठी 7020290257 हा नंबर आपल्या ग्रृपला अ‍ॅड करा.