मालक मुंबईला गेला आणि चोरट्यांनी आख्खे घर धुवून नेलं.! अकोल्यातील घटना, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

सार्वभौम (अकोले) :- 

                    अकोले तालुक्यातील कळंब येथे घराचा मालक मुंबईला गेल्याचा डाव साधून आखं घर धुवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी रात्री 8 ते शनिवार दि. 26 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडला. यात चोरट्यांनी घरातील 10 हजार रुपये रोख व मिक्सर, टिव्ही, पितळी भांडे व अन्य साहित्य चोरीला गेले आहे. याप्रकरणी सुनिल तुकाराम खरात (वय 47, रा कळंब, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                  याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनिल खरात हे मुळत: कळंब येथील रहिवासी आहेत. ते गेल्या काही दिवसांपुर्वी कामानिमित्त आपल्या भावाकडे मुंबईला गेले होते. जाताना त्यांनी घराचे दारे खिडक्या चांगल्या पद्धतीने बंद केल्याची खात्री केली होती. मात्र, ते मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या घरावर चोरट्यांनी पळत ठेवली आणि त्यांच्या पाठोपाठ घरावर डल्ला मारण्याचे प्लॅनिंग आखले गेले. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी खरात यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्यांची उचकापाचक करुन घरात सगळा पसारा केला.

दरम्यान घरात काही मिळते की नाही यासाठी त्यांनी घरातील कपाट आणि अन्य साहित्यांची उचकापाचक केली. त्यानंतर चोरट्यांनी घरात ठेवलेले रोख 10 हजार रुपये आणि काही साहित्यांची चोरी केली. हे चोरटे नक्कीच भुरटे असणार कारण यांनी घरातील मिक्सर आणि टिव्ही देखील चोरून नेला आहे. इतकेच काय! तर यांनी घरातील पितळी भांडी देखील चोरुन नेले आहे. असा एकूण 15 ते 20 हजारांचा मुद्देमाल या घरातून चोरी गेला आहे. हा प्रकार खरात घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आला. नंतर त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे व पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमणे यांनी घटनास्थळी घाव घेऊन तेथील पंचनामा केला आहे.

दरम्यान अकोले पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये पोस्को, अत्याचार या मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल केली आहे. मात्र, चोर्‍या, घरफोड्या आणि काही दरोड्यांचे गुन्हे निकाली काढण्यात त्यांना अपयश आले आहे. इतकेच काय! काही एक अर्ज निकाली काढण्यासाठी शिवाजी धुमाळ यांच्यासारख्या व्यक्तीला पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करावे लागत असेल तर हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखे आहे. तर अनेक अर्ज अकोले पोलीस ठाण्यात प्रलंबित आहेत. त्यावर पोलीस कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही.

तर दुसरा विचार केला तर अकोले तालुक्यात आमदार महोदयांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. कारण, येथे इतका मोठा तालुका असून देखील केवळ एक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक यांच्या जोरावर तालुक्याचा कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता येणार्‍या पाच ते दहा दिवसात राज्यभर पोलिसांच्या बदल्या होणार आहेत. त्यात नगर जिल्ह्यात देखील बदल्या होणार आहेत. किमाण येथे काही अधिकारी व कर्मचारी आणण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करणे अपेक्षीत आहे. अन्यथा तालुक्यात अशीच चलती का नाम गाडी हे चित्र पहायला मिळणार आहे.

दुर्दैव असे की, येथे गुन्हे दाखल होतात. मात्र, त्याचा तपास राम भरोसे असतो. गेल्या महिन्यात कुंभेफळ येथे एका तुंबारे नामक शिक्षकाच्या घरी चोरी झाली होती. ते कुटुंब कोविडशी लढा देत असताना त्यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्यात तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. त्या गुन्ह्याचे पुढे काय झाले देव जाणे. पोलीस यंत्रणेला विचारणा केली असता त्यांच्याकडून उत्तर मिळते तपास चालु आहे. जर असेच तपास चालु राहीले तर येथील चोरट्यांवर पोलिसांची दहशत निर्माण व्हायची कधी? उलट चोरट्यांचीच पोलिसांवर आणि जनतेवर दहशत असल्याचे सध्या येथे चित्र दिसत आहे.

तर दुसरीकडे अकोले तालुक्यात छोट्या-छोट्या गावांमध्ये देखील अवैध धंद्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. शहरात राजरोस दारु, जुगार, मटका आणि गांजा यांनी थौमान घेतले आहे. येथील दुर्दैव असे की, स्थानिक आमदारांना अवैध धंदे बंद करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो. यापेक्षा तालुक्यात अजून काय पहायचे बाकी आहे? हा तालुकाच आता राम भरोसे आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.