खबरदार राजकारण्यांनो.! मराठा आरक्षणाचे पानिपत कराल तर...

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   आज राज्यात मराठा आरक्षणावरुन मोठं राजकारण सुरू आहे. खरंतर गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित प्रश्नावर अवघ्या पाच वर्षात फडणविस सरकारने तोडगा काढत मराठा समाजाला आशेचा किरण दाखविला होता. त्यांच्यानंतर सत्तेसाठी वाट्टेल ते करणार्‍या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यावर पाणी फेरले. विशेष म्हणजे, दुर्दैव असे की, जी शिवसेना छत्रपतींच्या शिवरायांच्या भगव्याखाली मतदान मागते, मराठी माणूस, मराठी माणूस म्हणत भगवे झेंडे या महाराष्ट्रात फिरविते, त्याच शिवसेनाच्या काळत मराठ्यांचे आरक्षण जावे.! आज नोकरीत नाही, शाळेत नाही, कामात नाही मग हा मावळा जगेल तरी कसा? ना शेतकरी समाधानी आहे. ना येथील तरुण, केवळ पोपटपंची करणारी मानसे आणि सत्ता हवी म्हणून बारामती आणि संगमनेरची मनधरणी करीत बसायची. यातच त्यांचे दिवस चालले आहे. मात्र, या सगळ्यात आता मराठा सामाज नाउमेद झाला आहे. तर दुसरीकडे वास्तवत: पाहिले तर राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा इतिहास पाहिला तर ते देशाच्या हितासाठी निर्णय घेताना पुढाकार घेतात. मात्र, त्याच्याकडे 1995 ते 2014 पर्यंत आणि त्यापुर्वी देखील सत्ता होती. मात्र, मराठा समाज इतक्या टोकावर आला तरी त्यांच्या उपस्थितीत जे देता आले नाही ते अनुपस्थितीत मिळून देखील टिकविता आले नाही. हे दुर्दैव नाही का? त्यांना जाणता राजा म्हणून याच समाजाने उपाधी दिली, मग त्यांच्या पालकत्वाचे उत्तरदायीत्व त्यांनी स्विकारयला हवे असेच प्रश्न आता सामान्य तरुणांना पडू लागले आहे. तर काँग्रेस देखील त्याच पारड्यातील आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मराठा आरक्षणाबाबत जे आर्थिक निकशाचे तत्व मांडले होते. त्यावर तेव्हाच विचारमंथन झाले असते तर अन्य राज्याप्रमाणे येथे आज मराठा समाज आरक्षणात बसला असता. मात्र, मराठा समाजास आरक्षण देण्याची काँग्रेसची पहिल्यापासून मानसिकता नव्हती. ही त्यांच्यावर होणारी टिका आता वास्तवात उतरताना दिसत होती. खरंतर हे सगळे मुरब्बी राजकारणी होते. यांना मराठा समाजाचे भले करता आले नाही. मात्र, यांनी फडणविस सरकारवर दबाव टाकण्यासाठी मोर्चे आंदोलने यांना काही प्रमाणात पाठबळ दिले आणि त्यावर प्रकांड पंडीतासारखा अभ्यास करुन त्यांनी यांना अशक्य वाढणारी गोष्ट शक्य करुन दाखविली. कोण्या नव्या नेतृत्वाचा उदय नको म्हणून हे लोखांच्या संख्येने मुक मोर्चे निघाले. मात्र, आज हेच मुकमोर्चे रौद्ररुप धारण करुन प्रस्तापित मराठ्यांच्या घरावर धडकू लागले आहे. हे असे असले तरी काही ठिकाणी मात्र, बुळगा विरोध पहायला मिळाला आहे. स्थानिक मंत्र्यांना न दुखविता कोठेतरी फॉर्म्युलीटी केल्याचे पहायला मिळाले. म्हणजे मराठा समाजात देखील काही भांमटे लोक आहेत. ज्यांना राजकारण नव्हे, साहेबांशी संबंध हवे, समाजही हवा आणि आरक्षणही हवे. नेमकी येथेच समाजाने माती खाल्ली. ज्याला पुढे केले तोच ताटाखालचे मांजर होतो. म्हणून तर आजवर मराठा समाज पुढारला पण सुधारला नाही. हेच वास्तव अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. हे काहीही असो. मात्र, मराठ्यांच्या आरक्षणाचे आता पानिपत झाल्यासारखे पहायला मिळत आहे हे मात्र नक्की.!

राजकीय घटनांमध्ये नेहमी इतिहासाचे अनेक दाखले दिले जातात. मात्र, इतिहासाची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याची साक्ष इतिहासच आज मराठा आरक्षणाच्या अपयशाने देतो आहे. कारण, आजवर मराठा आरक्षणावरून काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी आजवर नेहमीच राजकीय पोळी भाजू पाहिली आहे. मात्र, दुर्दैवाने तेच मात्तब्बर आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आणि लाखोंच्या संख्येत शांततेत मोर्चे काढणारा मराठा समाज सरकारला दिलेला कौल आणि कायद्याच्या पेचात उभा राहीला आहे. या आरक्षणाच्या लढाईत लाखो मराठा रस्त्यावर उतरले. काहींना बलिदान दिले तर काहींना गुन्हे अंगावर घेतले. ज्याप्रमाणे पानिपतच्या लढाईत सर्व मराठा एकवटला होता अगदी त्याचप्रमाणे आरक्षणाच्या लढाईत मराठा समाज एकवटल्याचे पाहायला मिळाले. पाणीपतच्या लढाईत मराठा कुटुंबातील सदस्यांसह सर्वजण रणांगणात दोन हात करून उतरले. अगदी तसेच आरक्षणासाठी युवती, महिला पुरुषांसह लाखोंच्या संख्येत रस्त्यावर दिसून आले. परंतु ती लढाई रणांगणातील होती आणि ही लढाई कायदेशीर मार्गातील आहे. जरी मराठा पानिपत हरले तरी त्यांनतरच्या काळात मराठ्यांनी लढ्याची धग चालु ठेवली आणि दिल्लीवर वर्चस्व प्रस्तापीत करून भगवा फडकविला. आता त्याप्रमाणे राज्यसरकारला ही निर्धार करावा लागेल. जर राज्य सरकारने तसा निर्धार दाखवला नाही तर मराठा समाज आज इतका दुखावला गेला आहे की, तो मुकमोर्चे सोडून अन्य मार्गने न्याय मागण्याचा प्रयत्न करु शकतात. परंतु, ज्याप्रमाणे पानिपतच्या युद्धात प्रमुख मराठा सरदारांनी कच खाली होती त्याचप्रमाणे महाराष्ट्रच्या राजकारणातील प्रमुख मराठे नेते या अडचणीच्या काळात मराठा समाजाच्या मागे उभे राहताना दिसत नाही. सतत मराठ्यांच्या नावावर मते मागणारी शिवसेना ज्याप्रकारे कंगना प्रकरणात बाह्या सरसावून उभी राहताना आपण पाहिली. तसे स्वारस्य शिवसेनेने मराठा आरक्षणात दाखविलेले पहायला मिळाले नाही, किंवा त्यांचा सामना आरक्षणाबाबत मुद्देसूद सामाजापुढे व्यक्त देखील झाला नाही. ते त्यांचेच गुर्‍हाळ मांडण्यात व्यस्त आहेत. तर आज राष्ट्रवादी पक्षात 75 टक्के पेक्षा अधिक नेते मराठा समाजाचे आहेत. परंतु, त्यांचा आरक्षणाच्या लढाईत 20 टक्के ही सहभाग दिसून येत नाही. मग हे तेच मराठे म्हणाचे की काय! ज्यांनी पाणीपतच्या लढाईत कच खाल्ली होती! मात्र, या दोन्ही पक्षांच्या अपयशाचे खापर ते काँग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते आहे. अशोक चव्हानांसारख्या प्रमुख काँगेस नेत्यांना आरक्षणाच्या मुद्यावर बॅकफुटवर जावे लागत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला महाभकास आघाडी असे नामोल्लेख करुन अनेकांनी जहरी टीका केली आहे.

खरंतर अहमदनगरच्या एका खेड्यातून मराठा आरक्षणाच्या क्रांतीची मशाले पेटली गेली. धगधगते काळज घेऊन एक मराठा लाख मराठा या आवेशाने मुठी वळून स्वत:वर होत असलेल्या अन्यायचा ज्वालामुखी बाहेर पडला. कदाचित नव्हे ती मी खात्रीने सांगतो. उरात प्रचंड वेदना आणि मस्तकात काहूर असतांना देखील संबंध मराठा समाज एका रांगेत नि:शब्द होऊन रस्त्यावर उतरला. राज्यात भाजप सेना युतीचे सरकार असताना महाराष्ट्रभर 58 मोर्चे निघाले. आज जे लोक त्यांच्याकडे जातीच्या नजरेने पाहतात त्याच संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यावधी मराठा बांधवांची साद एकेली आणि त्यांनी राजकारण विरहीत सर्व संघटनांसह विरोधी पक्षांना विश्वासात घेवून आरक्षणासाठी स्वत: अभ्यास सुरू केला. जात सोडा हो.! न्याय महत्वाच म्हणून तर कोपर्डीच्या ताईला न्याय मिळण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. ही एक न्यायालयीन बाब असली तरी दोषारोपपत्र ते प्रबळ युक्तीवाद यातून तिघांना फाशीच्या शिक्षपर्यंत नेले. आरक्षणाबाबत शासकीय अध्यादेश काढून मराठा समाजा मोठा आधार देण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र, आज आरक्षणाचे खरे विरोधक कोण? असा प्रश्न जर कोणाला पडत असेल तर तो दुधखुळेपणा ठरु शकतो अशा प्रतिक्रिया जाणकारा व्यक्तींकडून येऊ लागल्या आहेत. तर याहून महत्वाची बाब अशी की, कोपर्डी प्रकरण आता औरंगाबाद खंडपिठात आहे. त्यात तरी किमान या सरकारने लक्ष घालणे अपेक्षित आहे. अन्यथा येरे माझ्या मागल्या. होऊद्या रान मोकळे आम्ही आहोत मनधरणी करुन पाच वर्षे कसे काढायचे या विचारात...

अगदी काल परवा मुख्यमंत्री म्हणाले की, मी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मत विचारात घेणार. पण, साहेब.! वेळ निघून गेल्यावर झालेल्या चुकांवर पांघरुणं घालण्यात काय अर्थ? कारण, गरिबी, गरज आणि सवलत याची झळ काय असे ना.! ती बंगल्यात राहणार्‍यांना आणि पार्ट्या करीत फिरणार्‍यांना काय कळणार? ती त्याच मराठ्याच्या घरातील बापाला विचारा, ज्याच्या पोराला शुल्लक गुण कमी असल्याने कॉलेजात प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. मात्र, दुर्दैव या मातीचे येथे छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन मराठे मोठे झाले आणि त्यांनीच राजांची रयत पोरकी केली. पोरकी.! छे.! उघड्यावर पाडली असे म्हटले तरी काही हरकत नाही. आता या सरकारचे देखील असे झाले आहे की, एक नाही एकात आणि बाप नाही लेकात. कारण, शिवसेनेचा सामना असे म्हणतो की, महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे खुद्द शरद पवार व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील आरक्षणाच्या संदर्भातील पाठपुरावा मुख्यमंत्र्याकडे करायला हवा होता. परंतु तोही झाला नाही. म्हणजे आता मराठा समाजाने नेमकं पहायचं तरी कोणाकडे? की आता जशी केंद्रात भाजपला एक हाती सत्ता दिली. असेही वाटोळे आणि तसेही वाटोळ माग विरोध हा नकोच. असे झाले तर मात्र, या सगळ्यांना आयुष्यभराचा राजकीय धक्का बसले. मग बसो बोंबलत...

आता या राजकारण्यांना एकच विनंती आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, तेव्हा महाराष्ट्रात अहमदनगरमधून आरक्षणाच्या लढ्याचा पहिला मुक मोर्चा निघत क्रांतीची ज्वाला पेटली आणि ती थेट मंत्रालयावर जाऊन थंडावली. दरम्यान, मराठा अरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले, त्यात गोदावरी पात्रात काकासाहेब शिंदे यांनी घेतलेली पहिली जलसमाधी आणि लाखो लोकांचे योगदान आता येथे आम्ही वाया जाऊ देणार नाही. कारण, जसे पानिपतच्या सुरवातीस दत्ताजी शिंदे लढाईत धारातीर्थी पढले. त्यांनी मराठा समाजाच्या अस्मितेसाठी पहिली आहुती दिली. आणि मराठा पेटून उठला आणि दिल्लीकडे चालता झाला. तो तेव्हाच थांबला तेव्हा दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकविला होता. आज काकासाहेबांचे हौैतात्म्य देखील आम्ही वाया जाऊ देणार नाही. काकासाहेब शिंदे यांनी पहिली जलसमाधी घेतल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पडसाद उमटले. त्यांच्या पाठोपाठ अनेकांनी आपला जीव मराठा समाजासाठी समर्पित केला. या गोष्टीला एक फडणवीस नावाचा व्यक्ती गांभीर्याने घेतो आणि जे भगवे झेंडे मिरवितात ते सत्तेत मशगूल होतात. हे अनेकांना आजही संशयास्पद वाटते आहे. त्यामुळे, त्यावेळी मराठा समाजाची शिस्त आणि महाराष्ट्राची संस्कृती म्हणून तेव्हा मुकमोर्चे निघाले होते. त्याचीही सामनातून टिका केली होती हे अजून मराठा समाज विसरलेला नाही. त्यामुळे, सत्ता, कंगना, सुशांत, फिल्मी दुनिया, रिया आणि पार्ट्या यातून या सरकारने बाहेर पडले पाहिजे. आज कोरोनाची महामारी आहे म्हणून फक्त प्रतिनिधीत्व करणारे लोक तुम्हाला जाब विचारत आहे. मात्र, जेव्हा सकल मराठा रस्त्यावर उतरेल तेव्हा मात्र, हे मुकमोर्चे नसतील तर ठोक आणि ठोस मार्चे असतील. त्यामुळे, सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. न्यायालयीन बाबी लक्षात घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. हीच एक मराठा लाख मराठा व्यक्तींची हाक आहे....

- सुशांत पावसे (एक मराठा)

8308139547

--------------------------------------

 96 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 450 दिवसात 720 लेखांचे 86 लाख वाचक)