कोरोनाने नव्हे.! या निर्ढावलेल्या व्यवस्थेने पांडुरंग मारला.! प्रत्येक पत्रकाराला चिंतन करायला लावणारा लेख.!
सार्वभौम (अहमदनगर) :-
आज सकाळी- सकाळी मोबाईल हातात घेतला आणि हजारो मेेसेज येऊन पडलेले पाहिले. त्यात भावपुर्ण श्रद्धांजली हा शब्द बहुतांशी ठिकाणी आला होता. म्हणून सहज एक ग्रृप उचकला आणि पांडुरंग रायकर यांचा चेहरा समोर आला. क्षण-दोन क्षणात डोक्यात मुंग्या शहारल्या, पांडुरंग.! आणि मयत.! छे.! विश्वासच बसेना. घाईघाईने वेगवेगळे ग्रृप शोधून खात्री केली. शब्दच उमटेना अशी परिस्थिती क्षणभर निर्माण झाली. अगदी अनेकदा रात्र-रात्र वृत्तांकन करताना त्या आठवणी डोळ्यासमोर चलचित्रासारख्या दरवळु लागल्या. का, कधी, केव्हा, कोठे, कसे याचे भान देखील राहिले नाही. इतके मन सुन्न झाले आणि मेंदु बधीर झाला होता. नकळत डोळे भरुन आले. कारण, खरोखर हा पत्रकार कमी आणि मैत्री जोपासणारा पांडुरंग होता, अगदी नावाप्रमाणेचे देव माणूस. पण, योग्यवेळी उपचार मिळाला नाही म्हणून त्याने अखेरचा श्वास घेतला. हा विश्वास बसेनासा झाला आहे. कारण, या पांडुरंगाने अनेकांना न्याय देण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. वृत्तपत्रापासून तर इलेक्ट्रॉनिक मीडियात स्वत:च्या कर्तुत्चाचा ठसा उमटविणारा अभ्यासू व निखळ, नितळ व निर्मळ स्वभावाचा पत्रकार पांडुरंग रायकर यांने जगाचा निरोप घेतला आहे.
आता नेमके काय झाले हे सविस्तर अभ्यासले असता लक्षात आले की, गेल्या आठ पंधरा दिवसांपासून पांडुरंग यांना अंशत: त्रास होत होता. मात्र, हा प्रकार दगदग आणि रोजच्या वृत्तांकनामुळे होणार्या धवपळीची ही कणकण असावी असे त्यांना वाटले होते. मात्र, तरी देखील त्यांच्या प्रेमळ आणि प्रांजळ स्वभाव असल्यामुळे त्यांच्या सहकार्यांनी त्यांना कोरोनाची टेस्ट करण्यास विनंती केली. त्यामुळे, पांडुरंग यांनी एकदा नव्हे दोन वेळा पुण्यात रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केली. मात्र, ती निगेटीव्ह आली. तेव्हा खर्या अर्थाने पांडुरंगने मोकळा श्वास सोडला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे तो विषाणु शांत बसला नाही. खरंतर येथूनच आमच्या पांडुरंगाच्या श्वासांवर मृत्युचे अधिराज्य सुरू झाले होते. त्यामुळे, खरी पहिली चौकशी जेथे तपासणी केली, स्वॅब घेतले. त्या लॅबची झाली पाहिजे. कारण, पॉझिटीव्हला योग्यवेळी उपचार मिळाले तर त्याची प्रतिकारशक्ती तरी वाढेल. अन्यथा तो विषाणु शरिरभर पसरत राहील आणि परिणामी मृत्युला सामोरे जावे लागेल. त्यामुळे, येथून खर्या अर्थाने चौकशी होणे अपेक्षित आहे. मात्र, हे सरकार, प्रशासन आणि पुढारलेले नेते एकमेकांना पाठीशी घालतात. जेव्हा त्यांच्या स्वत:वर वेळ येते तेव्हा पुण्या-मुंबईत त्यांच्यावर व्हीव्हीआयपी उपचार होतात आणि एखाद्या सामान्य मानसांवर वेळे येते तेव्हा तो किड्या मुंगीसारखा मेला तरी यांना काही वाटत नाही. म्हणून तर या मोठ्या लोकांना भलेभले आजार होऊन यांच्या कुत्र्यासारख्या मौती होतात.
पुण्यात रायकरला अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्याने थेट नगर जिल्ह्यातील कोपरगाव गाठले. तेथे त्यांची पत्नी असल्यामुळे किमान देखभाल तरी व्यवस्थित होईल याची खात्री होती. कोपरगावात आल्यानंतर त्यांनी पुन्हा आपली कोरोनाची चाचणी करण्याचे ठरविले. तेव्हा तेथील कोविड सेंटरमध्ये इतका नंगानाच सुरू होता की, एका अॅन्टीजन चाचणीसाठी तब्बल 3 तास पांडुरंग जड अंत:करणाने श्वास घेत उभा होता. तेव्हा तेथील हॉस्पिटलने सांगितले की, रॅपीड अँन्टीजन टेस्ट करण्यासाठी जी किट आवश्यक असते ती उपलब्ध नाही. हे असे आहे नगर जिल्ह्याचे कोविड प्रतिबंध नियोजन.! तेव्हा काही पत्रकार, समाजसेवक आणि पांडुरंग यांचे नातेवाईक यांनी जिल्हाधिकारी व स्थानिक डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला. आता किट शिल्लक नाही हे तेथील आरोग्य अधिकारी आणि तहसिलदार यांना माहित असायला हवे होते. मात्र, तीन तासानंतर यांना जाग येते तोवर प्रशासन काय झोपा काढत होते का? याची दुसरी चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, जेव्हा कोणत्याही तालुक्यातील वैद्याकीय अधिकारी किंवा तहसिलदार यांना मदतीसाठी कॉल केला तर त्यांच्याकडून अपवाद वगळता आवश्यक ती माहिती आणि मदत मिळत नाही. उलट अनेकदा प्रशासनाकडून उडवाउडविची उत्तरे दिली जातात. आता पांडुरंग यांची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना कोपरगावच्या आत्मा मालिक येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र, दुर्दैव असे की, आपण ज्या हॉस्पिटलांना कोविड योद्धे म्हणतो, तेच योद्धे कोरोनाशी नव्हे.! तर रुग्णांच्या जिवाशी लढतात की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण, या आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये चक्क 40 हजार भरा.! तरच रुग्ण आत आणा अशी सुचना केली. तोवर पांडुरंग चक्क त्याच्या कारमध्ये निष्तेज होऊन पडून होता. 40 ची रक्कम 20 हजारांवर आली तेव्हा रुग्णालयाची पायरी तो पार करु शकला. हे आहेत आपल्या भारतीय संस्कृतीतले रुग्णालये. खरोखर काही डॉक्टरांना आत्मा आहे का? कि निव्वळ पैसा कमवायचा आणि भल्या-भल्या बिल्डींगा बाधून त्यातून रुग्णांना लुटायचे हा धंदा मांडला आहे? असा प्रश्न सुज्ञ नागरिक आता उपस्थित करु लागले आहेत. मात्र, या सर्व प्रक्रियेत "पैसा फेको और तमाशा देखो" अशा आत्मा मालिकचा चेहरा उघडा झाला आहे. त्यांची तिसरी चौकशी होऊन जिल्हाधिकारी, जिल्हाशल्यचिकित्सक आणि आरोग्य मंत्री यांनी कारवाई केली पाहिजे.
येथे एक गोष्ट नमुद कराविशी वाटते की, पत्रकारीतेच्या नावाखाली अनेकांनी घबाडं जमा केले. गडगंज प्रॉपर्टी उभी केली, पत, प्रतिष्ठा आणि धनसंपदा जमा करुन सगळे धुतल्या तांदळासारखे शुद्धतेच्या अविर्भावात जगत आहेत. मात्र, दुर्दैव असे की, पांडुरंग रायकर हे एबीपी माझा, टिव्ही नाईन यांसारख्या मोठ्या ब्रँण्डमध्ये काम करीत होते. मात्र, त्यांनी कधी कोणाची लाचारी केली नाही. अगदी निर्व्यसनी देव माणूस म्हणून आमच्यासाठी ते आदर्श होते. नगर शहरात एबीपी माझाचे काम पाहताना आम्ही अनेक खळबळजनक बातम्या बाहेर काढल्या. एसपींचे फटाका प्रकरण ते पोलीस भरती घोटाळे आणि बरेच काही उघडे पाडले. तेव्हा त्यांनी ठरविले असते तर भरपूर पैसा कमविला असता. मात्र, पत्रकारीता आणि तात्वीक स्वभावाशी ते प्रचंड प्रमाणिक होते. एका साध्या मेसवर आम्ही एका ताटात जेवण केले असेल. परंतु भाजी वाढणार्याला देखील "सर" नावाने हाक मारणारा हा दिलदार मित्र होता. त्यामुळे, एक पत्रकार म्हणून ज्या रुग्णालयाने त्यांच्याकडे 40 हजार रुपये मागितले त्यांना लाज कशी वाटली नाही ? एका सामाजिक उत्तरदायित्व म्हणून एखाद्या रुग्णाला तत्काळ तपासले असते तर आज पांडुरंग जग सोडून गेला नसता.! त्यामुळे, पैसे असेल तरच उपचार असे होत असेल तर इतक्या मोठ्या पत्रकाराचे हे हाल होतात तर सामान्य मानसांचे काय हाल होत असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर शहरे उमटतात. त्यामुळे, जिल्हाधिकारी महोदय आपण अशा रुग्णालयांवर कारवाई करणे नित्तांत गरजेचे आहे. तर या पलिकडे पुर्वी पत्रकारीतेत मन्सुरभाई अध्यक्ष असताना मी कित्तेकदा अनुभविले आहे. अगदी पत्रकाराची कोणतीही समस्या असुद्या. तेथे मन्सुरभाई न हाक देता उभे रहायचे. आज तेथील परिस्थिती माहित नाही. मात्र, पत्रकारांना वेगळी सुविधा हवी, प्रत्येकाचे विमे काढायला हवेत, ते संपादक आणि कार्यालयात काम करणार्यांचे किंवा चाटुगिरी करणार्यांचे नकोत.! तर जे ग्राऊंडवर काम करतात त्यांच्या हयातीचे आणि त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणाची बांधणी प्रत्येक पत्रकार संघटनांनी केली पाहिजे. अन्यथा पत्रकार म्हणजे "जन्माला आला हेला आणि पाणी वाहता-वाहता मेला" अशीच गत निर्माण झाल्याचे पहायला मिळते आहे. कारण, गेल्या महिन्यात पोलिसांनाच डिपॉझिट शिवाय संगमनेरात उपचार नाकारले तर पत्रकार किस झाड की पत्ती? हे आज पांडुरंगाच्या जाण्याने सिद्ध करुन दिले आहे.
आता कोपरगावच्या रुग्णालयाने पत्रकाराची इज्जत काढली खरी मात्र, उपचार शुन्य दिले. त्यामुळे, पांडुरंगाला श्वास घेण्यास अधिकच त्रास होऊ लागला होता. म्हणून त्याने निर्णय घेतला की आता पुणे तेथे काय उणे.! तेव्हा अखेर निर्णय झाला. जेथे सध्या त्यांची कर्मभूमी होती, तेथे वृत्तांकन करीत असतांना भल्याभल्या सुविधांचा सरकारने बाऊ उभा केला होता. त्यावर विश्वास ठेऊन ते पुण्याला चालते झाले. मात्र, तो त्यांचा चुकिचा निर्णय ठरला असे अनेकांना वाटू लागले आहे. कारण, तेथे जम्बो कोविड सेंटर नव्हे तर निव्वळ एक "जंम्बो सांगाडा" उभा करण्यात आला होता. त्यामुळे, चक्क हे उपचार केंद्र म्हणायचे की कत्तलखाने ? हा संतप्त प्रश्न टिव्ही नाईनने उपस्थित केला आहे आणि तोच प्रश्न सरकार व प्रशासनाला चक्क आत्मचिंतन करायला लावणारा आहे. अर्थात जेव्हा पांडुरंग पुण्यात दाखल झाला तेव्हा तो मित्रांसोबत बोलत होता आणि काही तासात त्याचा मृतदेेेह बाहेर पडतो. ही किती मोठी शोकांतिका आहे. कारण, शिवाजीनगर येथे त्यांना जेव्हा अॅडमिट केले गेले तेव्हा तेथे ऑक्सिजनची सुविधा नव्हती. त्यांचा ऑक्सिजन लो होत गेल्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे, त्यांची मित्र कंपनी अगदी कसोशीने कामाला लागली. मात्र, दुर्दैव असे की, "सारा गाव मामाचाआणि एक नाही कामाचा.!" अशी परिस्थिती पांडुरंगाबाबत पहायला मिळाली. एक पत्रकार म्हणून रायकर यांनी भलेही धन कमविले नसेल. मात्र, मन जिंकण्याचे कौशल्या त्याच्या ठाई-ठाई भरलेले होते. त्यामुळे, इतक्या रात्री देखील पुण्यातील दिलदार मित्र त्यांच्या मदतीला धावून आले होते. पण, आजवर बर्याच पत्रकारांना हे समजले नाही. की, आपल्याला ओळखणारे, मान देणारे, फोन करणे मोठमोठे अधिकारी असतात. मात्र, आपल्यावर संकट आले की, "वेळेला केळं आणि वनवासाला शिताफळं," अगदी तेच झाले. पांडुरंगाला जेव्हा फक्त सात मिनिटासाठी एका अॅम्ब्युलन्सची गरज होती, त्याला भूक लागलेली असताना अन्नाची गरज होती तेव्हा अक्षरश: बिनपाण्याचा देह पांडुरंगाने सोडला. मात्र, त्याच्या बहिनीने घरुन दिलेल्या जेवणाचा डब्बा देखील रुग्णालयात त्याच्यापर्यंत पाहचू शकला नाही. याच्याइतके दुर्दैव काय असावे?
खरंतर मुंबईत इतके रुग्ण मेले नाही, तितके पुण्यात मयत झाले आहे. हे कोणाचे अपयश आहे? जर पांडुरंग रायकर सारखा प्रतिष्ठीत पत्रकार केवळ सात मिनिटांसाठी अॅम्ब्युलन्स मिळाली नाही म्हणून मयत होतो. तर या पुण्यात "दादा"गिरीखाली किती लोकांचे उपचाराआभावी निष्पाप बळी गेले असतील? याला जबाबदार कोण? अर्थातच या सगळ्यांच्या मागे नकळत राजकारणाचे देखील वलय आहे. कारण, महानगरपालिका भाजपकडे आणि राज्यात सत्ता राष्ट्रवादीकडे त्यामुळे या दोघांच्या भांडणात सामान्य नागरिकांची बळी जाताना दिसत आहे. खरंतर शंभर कोटी खर्च करून असल्या जंम्बो कोविड सेंटरमध्ये उपचाराआभावी रुग्ण मरत असतील तर हा पाण्यासारखा पैसा खर्च का करायचा? यात दुर्दैव असे की विरोधीपक्षनेत्यांनी यावर अंकुश ठेवायचा तर तेच राष्ट्रवादी सरकारचे गोडवे गाण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे, पुन्हा एखादा "रात्रीस खेळ चाले" हा उपक्रम आपल्याला पहायला मिळाला तर आश्चर्य वाटू देऊ नका. मात्र, यात सामान्य नागरिकांचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही, हे देखील सफेद कपड्यातील नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. कारण, आज एक पांडुरंग गेला परंतु यापुर्वी देखील बेड मिळला नाही म्हणून आशा चौकात एका पांडुरंग नावाच्या तरुणाने कुटुंबासह उपोषण सुरू केले होते. त्यानंतर दुर्दैवाने त्याचा देखील मृत्यू झाला. म्हणजे पुणे हे फक्त धनदांडग्यांसाठीच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर उत्तर शोधण्यापेक्षा आरोग्यमंत्री म्हणतात बेड हे धनदांडग्यांमुळे मिळत नाही. म्हणजे या सरकारमध्ये "आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय" असेच काहीसे दिसते आहे. कारण, सरकारमधील जबाबदार लोकच सरकारला घराचा आहेर देताना दिसत आहे. हा सावळा गोंधळ कोठेतरी थांबला पाहिजे.
आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रायकर बाबत कागदी घोडे नाचविण्यास सुरूवात केली आहे. चौकशी करु, आदेश दिलेत, करु, पाहू अशा पद्धतीने त्याच्या अपयशापासून ते तोंड लपवत फिरताना दिसून आले. कारण, रायकरला योग्यवेळी अॅम्ब्युलन्स मिळाली नाही, दोन वेळचे जेवण सोडा, पाणी देखील मिळाले नाही असे प्रश्न विचारले असता त्यांनी चक्क उत्तर देण्याचे देखील टाळले. म्हणजे, सत्ता असली की हे माध्यमांना अक्षरश: कोलतात आणि सत्ता गेली की यांना मध्यमांची गरज पडते. हीच "दादा"गिरी जनता एकदिवस पुन्हा मोडीत काढणार आहे. आता ते काहीही असोत, राजकारण गेलं चुल्हीत.! मात्र, पांडुरंगाला न्याय देण्यासाठी शिवाजीनगर ते जंम्बो हॉस्पिटल या सर्व आरोग्य यंत्रणेची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा (कलम 304) गुन्हा दाखल झाला पाहिजे. विशेष म्हणजे अश्वासने नको.! तर अंमलबजावणी झाली पाहिजे अशी भूमिका आता पत्रकार संघटनांनी घेतल्या पाहिजे. कारण, जेव्हा "कोपर्डी" प्रकरण झाले तेव्हा तेथून पांडुरंग रायकर याने सर्वोत्तम वृत्तांकन केले होते. त्या निर्भयाच्या माध्यमातून सकल मराठा समाज्यास न्याय मिळाला. आरक्षणासह अन्य प्रश्न मार्गी लागले. आता पांडुरंग रायकरच्या बलिदानानंतर पत्रकारांचे प्रश्न घेऊन सगळ्या संघटनांनी एकत्र आले पाहिजे. जर असे झाले तरच पांडुरंग हा पत्रकारीतेसाठी अजरामर ठरेल.! अन्यथा आज चर्चा, बातम्या, दु:ख, आरोप प्रत्यारोप आणि उद्या पांडुरंग इतिहासजमा होऊन जाईल. त्यामुळे, त्याच्या कुटुंबाला मदत आणि पत्रकारांचे प्रश्न या दोन गोष्टी महत्वाच्या वाटू लागल्या आहेत. बाकी टिव्ही नाईन आणि एबीपी माझा पांडुरंगाच्या पाठीशी ठाम उभे राहिले. ही बाब प्रचंड आनंद देणारी वाटली. माझ्या सहकार्याला भावपुर्ण श्रद्धांजली व माध्यमांचे आभार.!
- सागर शिंदे (अहमदनगर)
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 89 लाख वाचक)