प्रचंड धक्कादायक.! बाळांतपणा करायचे तर नर्स चक्क तीन तास संडासात दडून बसली.! दवंडी नंतर सुईनने केलं बाळांतपण.! त्यांना बडतर्फ करा, अन्यथा...!
- आकाश देशमुख
सार्वभौम (राजूर) :-
अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या कुशीत वारंघुशी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जो ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर देखील शहरे उभे राहून तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते. कारण, एका महिलेनेच महिलेच्या प्रसुतीच्या असहाय्य वेदनांचा खेळ मांडल्याचे पहावयास मिळाले आहे. कारण, एक गर्भवती महिला असंख्य कळा सहन करीत एका आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी आली होती. मात्र, तिचे बाळांतपण करायचे सोडून तेथील आरोग्य सेविका चक्क घरातील संडास बाथरुमध्ये जाऊन दडून बसली. इतकेच काय! तीन तास मातृत्वाच्या किंकाळ्या ऐकूण देखील या सरकारी व्यक्तीच्या काळजाला पाझर फुटला नाही. त्यावेळी चक्क गावतील एका टेकडीवर जाऊन या सेविकेला बोलविसाठी दोन वेळा दवंडी देण्यात आली. मात्र, ज्याने "झोपेचे सोंग घेतले त्याला जागे करणे अशक्य असते" हेच खरे. त्यामुळे, गावातील एका बुजुर्ग महिलेला आणून मंजाबाई लोटे या महिलेची प्रसुती करण्यात आली. दरम्यान, जेव्हा नर्सचा शोध घेण्यात आला तेव्हा अगदी घामाघूम अवस्थेत गावकर्यांनी तीस संडासाच्या कोपर्यातून बाहेर काढले. आता या महिलेस खात्यातून बडतर्फ करा अन्यथा जनआंदोलन उभे करू असा पवित्रा गावकर्यांनी घेतला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, "सह्याद्रीच्या कुशीत" जे आदिवासी बांधव वसले आहेत त्यांना प्रंचड "मानुसकी" आहे. अगदी "कळसुबाई"च्या कुशीतून वाहणार्या झर्यांप्रमाणे ते नितळ, निर्मळ आणि प्रांजळ आहेत असे इतिहास सांगतो. मात्र, दुर्दैवाने त्यांना तितके प्रांजळ प्रेम त्यांना लाभत नाही. जो अधिकारी जातो तो त्यांना लुटून खातो, प्रकल्प विभागापासून तर ग्रामसेवकापर्यंत सगळा भ्रष्ट कारभार त्यांच्या नशिबी पडलेला आहे, आजवर असे पहायला मिळाले आहे. हे ठिक आहे मात्र, किमान त्यांच्या पदरात आरोग्य तरी सोईचे मिळावे अशी देखील अपेक्षा त्यांनी ठोऊ नये.! येथे कोणाचा उपचाराआभावी मृत्यू होतो तर कोठे दुखनं अंगावर काढावे लागते. इतकेच काय.! येथे प्रसुतिच्या वेदना देखील आरोग्य केंद्राच्या दारात सोसाव्या लागतात, यापेक्षा दुदैव काय असावे? असाच एक घृणास्पद व संतापजनक प्रकार वारंघुशी येथील आरोग्य केंद्रात पहावयास मिळाला आहे.
त्याचे झाले असे की, मंजाबाई लोटे ही माय माऊली प्रसुतीच्या असहाय्य वेदना सोसत होती. प्रचंड त्रास होऊ लागला म्हणून गुरूवार दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिने पतीसोबत जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. त्रास सहन होईना म्हणून त्यांनी आरोग्य सेविका यांना आवाज दिला. खरंतर तत्काळ सेवा मिळावी म्हणून शासनाने काही सेविकांना आरोग्य केंद्राच्या अगदी शेजारीच निवासस्थाने बांधून दिले आहेत. मात्र, दुर्दैवाने हे घरे राहण्यासाठी आहेत की लपण्यासाठी हेच कळेनासे झाले आहे. कारण, मंजाबाई यांना कळा येत असल्यामुळे त्यांनी सेविकेला आवाज दिला. मात्र, या बाईसाहेबांनी आपल्या मुलीस सांगितले की, आई घरात नाही ती गावात सर्वे करण्यासाठी गेली आहे असे सांग. त्यामुळे एक स्त्री असून देखील ती स्त्रीच्या वेदना समजू शकली नाही हे सर्वात मोठे दुर्दैव होते. त्यानंतर सरपंच ताई अनिता संजय कडाळी व माजी. उपसभापती भरत घाणे यांनी आरोग्य केंद्र गाठले आणि सेविकेचा शोध सुरू केला. घर तर उघडेच होते, त्यांची गाडी देखील घरासमोर होती, सर्वे तर परवाच होऊन गेला होता. त्यामुळे, बाईसाहेबांच्या अवचित स्वभावाला सर्वजन ज्ञात होते. तरी देखील ग्रामपंचायतीच्या शिपायास गावात दवंडी देण्यास सांगितली.
ऐका हो ऐका...! सेविका बाई ज्या घरात असतील त्या घरातून त्यांना थेट आरोग्य केंद्रात पाठवावे, प्रसुती करणे नित्तांत गरजेचे आहे. मात्र, झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला कधी जागे करता येते का? त्यामुळे अर्धा तास झाला, तरी देखील सेविका संडासात लपूनच होत्या. ऐकीकडे गर्भवती महिला आपला दुसरा जन्म दान मागत किंकाळा आणि वेदना यांच्यात गुरफटून केंद्रात पडून होती. आता आणखी एका प्रयत्न म्हणून शिपायाला पुन्हा टेकडी चाढायला लावली. हातात भोंगा घेऊन तो बेंबीच्या देठापासून ओरडला. ऐका हो..ऐका..! आरोग्य सेविका कोणाच्या घरात असेल तर प्रसुती करायची आहे. त्यांना तत्काळ केंद्रावर घेऊन यावे, पण कसले काय.! बाईसाहेब संडास बाथरुमात गप्प बसून होत्या. मात्र, तेथे वर डोंगरावर कळसुबाई आहे. त्यामुळे, "देव तारी त्याला कोण मारी" ! अखेर गावकर्यांनी एक शक्कल लढविली. गावातील एक बुजूर्ग आजी सोनाबाई लोटे यांना घेण्यासाठी गाडी पाठविली. म्हणतात ना.! अनुभव हा कधीही वाया जात नाही, अगदी तसेच झाले. आजीबाईंनी अगदी "नॉर्मल प्रसुती" केली. मंजाताईने अगदी सुंदर व गोंडस मुलीला जन्म दिला आणि त्यांनी मोकळा श्वास सोडला.

दरम्यान, सेविका बाईसाहेब नेमकी कोठे गेल्या याची चिकित्सा गावकर्यांना होतीच. त्यामुळे, महिला सरपंच आणि काही सजग व्यक्ती आरोग्य सेविकेच्या थेट घरात घुसले. मुलीस विचारणा केली असता तिने तोच पाढा पुढे वाचला, आई गावात सर्वे करण्यासाठी गेली आहे. मात्र, विश्वास ठेवतील ते गावकरी कसले? त्यांनी घरातील कानाकोपरा तपासला, तेव्हा संडासात ह्या आरोग्य सेविका मिळून आल्या. जेव्हा त्यांना बाहेर बोलविले तेव्हा मात्र, त्यांना प्रचंड घाम फुटलेला होता. कारण, आरोग्य केंद्र व निवासस्थान हे अगदी समोरासमोर आहे. त्यामुळे, त्यांना पळण्यास देखील जागा मिळाली नाही. अखेर अकोले तालुक्यातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळाले. आता या आरोग्य सेविकेला खात्यातून बडतर्फ करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. कारण, या ज्या व्यक्तीला समाज आणि आपल्या कामाविषयी आत्मियता नाही. त्यांना फुकटचे पगार कशाला देत बसायचे? यापुर्वी याच आरोग्य केंद्रावर आदिवासी बांधवांना अक्षरश: दारात उभे करुन त्यांना आतून गोळ्या फेकून दिल्याचे प्रकार घडले आहे. कोणतीही तपासणी न करता अशा पद्धतीने वागणूक देणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे आता या प्रकाराची आ. डॉ. किरण लहामटे, माजी आ. वैभव पिचड तसेच सभापती, तहसिलदार, बीडीओ, आरोग्य अधिकारी यांनी तत्काळ दखल घेणे आवश्यक आहे. यावर काही कारवाई न झाल्यास कायदेशीर जनआंदोन उभे करून हे प्रकरण विधानसभेत पोहचवून न्याय मागितला जाईल अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
- सागर शिंदे
टिप : रोखठोक सार्वभौमच्या बातम्या आपल्या मोबाईलवर मिळाव्यात यासाठी 7020290257 हा नंबर आपल्या ग्रृपला अॅड करा.
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 720 लेखांचे 92 लाख वाचक)