वायरमनच निघाला चोरटा! तारा, पोल आणि ग्राहकांचे विजबिलाचे पैसेही चोरले! गुन्हा दाखल

सार्वभौम (संगमनेर) :- 

               संगमनेर तालुक्यात पिंपारणे येथे चोराच्या हाती चाव्या दिल्याच्या प्रकार समोर आला आहे. कारण, एक वायरमन तथा वरिष्ठ तत्रज्ञ यलप्पा पंडीत देवकर (रा. पिंपारणे, ता. संगमनेर) याने चक्क 40 हजार रुपये किमतीच्या विद्युत तारा, तीन डिस्क, इन्सुलेट व एक पीन इन्सुलेटर यांची चोरी केली. तसेच ग्राहकांचे विजबिल भरण्यासाठी त्याच्याकडे दिले होते. मात्र या बहाद्दराने ते देखील हडप करुन ग्राहकांची व कंपनीची फसवणुक केली आहे. हा प्रकार बुधवार दि. 9 रोजी सकाळी 9 वाजता समोर आला असता याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंते दिग्वीजय दिनकर लोहे (रा. चैतन्यपुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                       

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पिंपारणे येथे महा. विज वितरण कंपनीचा कक्ष आहे. तेथे आरोपी यलप्पा पंडीत देवकर हा वायरमन तथा वरिष्ठ तत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. त्याने कामावर असताना शासनाची फसवणूक केली. अधिकार्‍यांच्या डोळ्यात धूळ फेकून 40 हजार रुपये किमतीच्या विद्युत तारा, तीन डिस्क, इन्सुलेट व एक पीन इन्सुलेटर यांची चोरी केली. तसेच आजकाल गावातील लोक किंवा विज वितरण कंपनीचे ग्राहक विजबिल भरण्यासाठी आता कार्यालयात गर्दी करीत नाहीत. ते संबंधीत वायरमनकडे बिलाची रक्कम देत असतात. अशाच प्रकारचे काही ग्रहकांनी मोठ्या विश्वासाने देवकर याच्याकडे बिलाची रक्कम भरण्यासाठी दिली होती. मात्र, या महाशयाने ती रक्कम भरली नाही तर स्वत:च्या खिशात टाकून विज वितरण कंपनीच्या ग्राहकांची फसवणुक केली आहे. इतकेच काय! तर याने कंपनीचा देखील विश्वासघात केला आहे. हा प्रकार मराविवि कंपनीच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी सहायक अभियंते दिग्वीजय दिनकर लोहे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर अकोले तालुक्यात देखील अशाच प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत. तर जेथे काही कामे मंजूर न करताच त्यावर अर्थपुर्ण तडजोडी करुन घोडा-बैलासारखी कामे केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारची एक तक्रार मंत्र्यालयात आणि जिल्हा प्रशासनाकडे गेली असून स्थानिक अधिकारी नेमकी कशा पद्धतीने हात काळे करतात, कंत्राटी लोकांच्या माध्यमातून काय-काय कारभार चालतो, अवैध कामांचे कशा पद्धतीने अर्थपुर्ण तडजोडी होतात हे सर्व अर्जात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात ही देखील चौकशी लागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, आवाच्या सव्वा बिले, खोटी कामे असे अनेक प्रश्न लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे असे बोलले जात आहे.