आज अकोले तालुक्यात 61 रुग्णांची भर.! अकोले नंतर राजूर बंद.! जान हैं, तो जहाँन है.! पिचडांची टिका.! बंदचे समर्थन.! डॉ. नवलेंचा विरोध.!
- शंकर संगारे
सार्वभौम (राजूर) :-
अकोले शहर बंद करण्याहून चांगलच रणकंद माजले आहे. त्यावर डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले की, बंदला माझा विरोध नाही. मात्र, कोणाला सक्ती करु नये. कारण, कोरोनाच्या बरोबरीने आपल्याला उपासमारीवर मात करायची आहे. त्यामुळे, ज्याला कोणाला दुकाने चालु ठेवायची असेल त्यांनी चालु ठेवा, ज्यांना बंद ठेवायची असेल त्यांनी बंद ठेवा. त्यानंतर आज पुन्हा वैभव पिचड यांनी सरकार आणि डॉ. किरण लहामटे यांच्यावर टिका केली. कोरोनावर मात करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. बारामती लॉकडोऊन होऊ शकते तर अकोले का नाही? आणि बंदला विरोध करण्यापेक्षा तालुक्यात कोरोना अटोक्यात आणण्यासाठी त्यांनी काय ठोस पाऊले उचलली आहे? याची माहिती त्यांनी द्यावी असे म्हणत त्यांनी अकोले बंदला भाजपचा पाठींबा दिला आहे. हे झाल्यानंतर लगेच मार्क्सवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. अजित नवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की मी अनेक व्यक्तीशी अकोले बंद बाबात चर्चा केली. त्यानंतर एक गोेष्ट प्रकर्षाने लक्षात आली की, अकोले तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा आत्ता योग्य उपाय होऊ शकत नाही. आता देश सुरू होत आहे. आजुबाजुची गावे सुरू आहेत. त्यामुळे, अकोले, राजूर, समशेरपूर किंवा कोतुळ बंद करुन कोरोना रोखण्याचा हा पर्याय नाही. जरी तुम्ही तालुका बंद ठेवला तरी लोक सिन्नर, घोटी इगतपुरी, नाशिक, संगमनेर जुन्नर येथे जातात. त्यामुळे अकोल्यात नाही तर अन्य ठिकाणी लोक आपल्या गरजा पुर्ण करतात. त्यामुळे, अकोले बंद हा योग्य पर्याय नाही. शहरात एक भोंगा फिरविला आणि चार लोक एकत्र आले की शहर बंद होते. त्यामुळे आता बंद पेक्षा योग्य नियोजन आणि उपायोजना शोधल्या पाहिजे. त्यासाठी मात्र कोणी पुढे येत नाही. येथील आरोग्य सुविधा बळकट करणे, शासकीय नियमांचे कटाक्षाने पालन, पार्ट्या, लग्न, विधी, वाढदिवस यावर किमान आळा घातला पाहिजे, काही नियमांचे पालन केले पाहिजे. मात्र, हे कोणी करत नाही. बैठका घेऊन भोंग फिरवून गावं बंद करण्याचे सोपे काम आपल्याला लगेच जमते. हे कोठेतरी थांबले पाहिजे. यासाठी पक्ष व राजकारण सोडून एकत्र आले पाहिचे. अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव का होतो याचे मुळ शोधणे गरजेचे आहे. जर असे झाले नाही तर कितीही वेळा लॉकडाऊन केला तर त्याचा काय उपयोग? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी अकोले तालुक्यातील कोविडच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले. तर लॉकडाऊन करण्यापेक्षा उपायोजना करण्यात तुम्ही ठोस भुमिका का घेत नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करुन त्यांनी लॉकडाऊन करणार्यांचे सोपे मनोबल डाऊन करुन टाकले. ज्यांनी कोरोना रोखण्यासाठी काही करायचे आहे त्यांनी अकोले बंदच्या पाठीमागे लागण्यापेक्षा तालुक्यात एखादी सुसज्ज लॅब उभी करण्यासाठी प्रयत्न करावे. एखादे सुसज्ज कोविड सेंटर उभे करावे. जे कोविडशी लढत आहे. त्यांच्यासाठी मदत करावी, त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडाव्यात. मात्र, चारदोन जणांनी बैठका घेऊन भोंगे फिरवून अकोले बंदचा घाट घालु नये असे म्हणत त्यांनी तालुक्यातील या व्यवस्थेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली.
दरम्यान अकोले बंदच्या बाबत माजी आमदार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा व सुविधा देण्यास राज्य सरकार व लोकप्रतिनिधी कमी पडले असून तालुक्याची आरोग्य सेवाच व्हेंटिलेटरवर आहे. तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आपण 1 हजाराचा टप्पा लवकरच पूर्ण करू. या सर्व पार्श्वभूमीवर अकोले शहर व शहरातील नागरीकांच्या हितासाठी व्यापारी असोशिएशने जो अकोले स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे मी स्वागत करीत असून त्यास जाहीर पाठिंबा देत असल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगितले.
व्यापारी असोसिएशनच्या या बंदच्या निर्णयामुळे अकोले शहर येणारे 7 दिवस बंदच राहणार आहे. काही लोक यात राजकारण करू पाहताय. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. काही मंडळी या बंदबाबत राजकारण करून व्यापारी वर्गाची एकजूट फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. असे मत वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या रुग्णांना उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात येत आहे. बेड्सची संख्या, ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता, 108 नंबरच्या अॅम्ब्युलन्सचे प्रमाण कमी, जी आहे ती देखील वेळेवर उपलब्ध होत नाही. उपलब्ध पीपीई किट्स चांगल्या दर्जाच्या नसून पुरेशा नाहीत, आरोग्य अधिकारी, सेविका या आपला जीव धोक्यात घालून काम करीत असून त्यांच्या सरंक्षणासाठी पीपीई किट्स नाही, आदिवासी व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत.
आज अकोले शहरात व तालुक्यात आजपर्यंतचे सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह आलेली संख्या आहे, तेव्हा आत्ता जर बंद नाही ठेवले तर याचे परिणाम येणार्या काळात भोगावे लागतील आणि मग नंतर कितीही दिवस बंद ठेवले तरी पण उपयोग होणार नाही. शेवटी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अकोले शहरात व्यापार करणार्यांनी घ्यायचा आहे. तसेच आमदार डॉ.लहामटे यांनी अकोले तालुक्यातील आरोग्य सुविधा देण्यासाठी काय उपाय योजना केल्या त्या जनतेला एकदा सांगावे, मगच बंद ला विरोध करावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती लॉकडाऊन होऊ शकते, सांगली बंद होऊ शकते, मग अकोले तालुक्यात विरोध का? असा प्रश्न पिचड यांनी विचारला आहे. आपण अकोले तालुक्यातील व्यापार्यांच्या पाठीशी कायम खंबीर उभे आहोत असा आत्मविश्वास त्यांनी दिला. नागरीकांनी स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी, मास्क वापर, सॅनिटायझरने हात धुवावेत, सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करावे. जान हैं, तो जहाँन हैं! हे लक्षात ठेवावे. आपली व आपल्या कुटुंबाची व इतरांचीही काळजी घ्या असे आवाहन माजी आ.वैभवराव पिचड यांनी केले. या वेळी अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक नामदेव पिचड, नगरसेवक परशुराम शेळके, प्रकाश नाईकवाडी रोहिदास धुमाळ, महेश माळवे, गिरजाजी जाधव, शंभूू नेहे आदी उपस्थित होते.
आज सोमवार दि. 14 रोजी राजूर ग्रामीण रुग्णालय रुग्णालय येथे अनेक रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये एकूण 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात राजूर येथे 47 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 86 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगी, 35 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, असे 14 रूग्ण आढळून आले आहेत. तर पाडाळणे येथे 27 वर्षीय महिला, 53 वर्षीय महिला अशे दोन रूग्ण आढळून आले आहेत. आदिवासी भागातील गोंदोशी येथे 24 वर्षीय पुरुष आढळून आला आहे. तर राजूर मध्ये जास्त रूग्ण भेटत असल्यामुळे राजूर मधील व्यापारी असोसिएशन ने 16 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2020 पर्यंत राजूर मधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती व्यापारी असो.च्या सदस्यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना दिली आहे.
तर अकोले तालुक्यात बेलापूर येथे 45 वर्षीय पुरुष, मन्याळे येथे 32 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 45 वर्षीय पुरुष, समशेरपुर येथे 48 वर्षीय पुरुष, नागाची वाडी 52 वर्षीय पुरुष, पानसरवाडी येथे 56 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 3 वर्षीय बालिका, अकोले येथे 23 वर्षीय तरुण, 31 वर्षीय महिला, धामनगाव पाट येथे 25 वर्षीय तरुणी, 51 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय तरूणी व अवघ्या 2 वर्षीय बालक, 27 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय तीन तरुण, बोरी वाघापूर येथे 45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, मोग्रस येथे 28 वर्षीय तरुणी, शेरणखेल येथे 34 वर्षीय पुरुष, अकोले येथे 51 वर्षीय पुरुष, वाशेरे येथे 50 वर्षीय महिला, अकोले येथे 52 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय मुलगा व 22 वर्षीय तरूणी, इंदोरी येथे 38 वर्षीय पुरुष, लहित खु येथे 35 वर्षीय पुरुष, ढोकरी येथे 42 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय बालिका, नवलेवाडीत 36 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी कॉलनीत 33 वर्षीय पुरुष, शाहुनगर येथे 33 वर्षीय पुरुष, पारधे हॉस्पिटल येथे 20 वर्षीय पुरुष, शाहुनगर येथे 15 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगी, 40 वर्षीय पुरुष, आंबेडकर नगर 30 वर्षीय पुरुष, सुगाव बु येथे 25 वर्षीय पुरुष अशा ६१ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.
- आकाश देशमुख