कौटुंबिक वादात आईने आत्महत्या करुन घेतला 4 वर्षाच्या मुलीची जीव.! खुनाचा गुन्हा दाखल!
सार्वभौम (अहमदनगर) :-
पतीपत्नीच्या वादात आईने स्वत:सह आपल्या मुलीची जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना रविवार दि. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील कोळगाव शिवारात घडली. यात उषा गणेश झिरपे (वय 25) व गायत्री गणेश झिरपे (वय 4) असे मयत झालेल्या दोघींची नावे आहेत. याप्रकरणी जगन्नाथ आण्णासाहेब झिरपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गायत्रीच्या आईवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उषा हिचा गेल्या काही वर्षापुर्वी विवाह झाला होता. मात्र, तिचे आणि तिच्या पतीचे संसारात काही दिवस मन रमले, मात्र, दरम्यानच्या काळात दोघांमध्ये नेहमी तत्वीक वाद होत होते. या दोघांची समज काढण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील त्यांची मने जुळली नाही. त्यानंतर उषा ही प्रचंड अस्वस्थ आवस्थेत जगत होती. दरम्यान तिला तिच्या पतीपासून वेगळे रहायचे होते. मात्र, तिच्या सासरच्या लोकांनी तिला विरोध केला होता. त्यामुळे ती अधिकच टेन्शनमध्ये होती. त्यामुळे तीने रविवारी कोळेगाव शिवारात शेती गट नं. 130 असलेल्या विहिरीकडे जाऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान उषा गणेश झिरपे हिने आपल्या अवघ्या चार वर्षाच्या मुलीसह विहीरीत उडी घेतली. त्यामुळे, दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघी लवकरी घरी आल्या नाही म्हणून शोधाशोध सुरू केली असता जवळच्या विहीरीत त्यांचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर दोघींना बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर कायदेशीर प्रक्रीयेनुसार जगन्नाथ आण्णासाहेब झिरपे यांनी फिर्याद दिली की, उषा हीने आपल्या 4 वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे. त्यानंतर मयत उषावर पोलिसांनी कलम 302 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.