शहरात कोरोनाचा 15 वा बळी, 20 रुग्ण पॉझिटीव्ह.! तर आशा कोरोना सर्वेक्षणावर बहिष्कार टाकणार.!

                      

सार्वभौम (अकोले) :- 

                      अकोले तालुक्यात रॅपीड अँन्टीजनच्या किट शिल्लक नसल्यामुळे काही स्वॅब हे नगर जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यात आज 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर आज दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात अगस्ति थेटर जवळ राहणारा अवघ्या 32 वर्षाचा तरुण तर पाडाळणे येथे राहणार्‍या 75 वर्षाय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या पलिकडे चार दिवसांपुर्वी राजूर येथेच एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अकोले तालुक्यात मृत्युची संख्या 15 वर गेली आहे. तर कोरोनाने आठव्य शतकाकडे वाटचाल केल्याचे दिसते आहे. त्यामुळे, आजवर कोरोनाचा रुग्ण सापडले तरी काही हरकत नाही असे वाटत होते. मात्र, आता आठवड्याभरात जर तीनचार लोक मृत्यू होऊ लागले तर येणार्‍या काळात येथे फार भयानक स्थिती निर्माण झालेली राहिल. त्यामुळे, प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. नियम शिथिल झाले म्हणजे हकनाक गाव पिंजत हिंडणे योग्य नाही. प्रशासन आता कोठे-कोठे लक्ष देणार आहे? त्यामुळे, किमान स्वत:ची तरी काळजी स्वत: घ्यायला अकोलेकरांनी शिकले पाहिजे. आता कारखाना रोडवर एकही रुग्ण मिळून येत नाही. कारण, तेथे कोरोनाचे चटके अनेकांनी सोसले आहे. तर कोरोनासह सामाजिक चटक्यांना देखील त्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही हेच खरे आहे. त्यामुळे, तालुक्यातील प्रत्येकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. 

काल व आज अकोले तालुक्यात दोन मयत आणि 20 रुग्णांची भर पडली आहे. यात गर्दनी येथे 42 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुणी, तर अकोले शहरात 62 वर्षीय महिला, 64 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला तर 9 वर्षीयचा बालक, तसेच ढोकरी येथे 52 वर्षीय पुरूष, शेेंडी येथे 46 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय तरुण, ब्राम्हणवाडा येथे 40 वर्षीय पुरूष, आंभोळ येथे 40 वर्षीय पुरूष, मोग्रस येथे 43 वर्षीय पुरूष, गर्दनी येथे 17 वर्षीय तरुणी, 37 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 8 वर्षाचे बालक, 10 वर्षीची बालिका, 48 वर्षीय पुरूष व ब्राम्हणवाडा येथे 45 वर्षीय महिला अशा 20 जणांचे पॉझिटीव्ह अहवाल अकोले आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

....अन्यथा कोरोना सर्वेवर बहिष्कर

तर सर्वेचा पुरेसा मोबदला न देता आशांना प्रतिदिन केवळ 33 रुपये व आशा गट प्रवर्तकांना प्रतिदिन 16 रुपयात राबवून घेतले जात आहे. कोरोना महामारीपासून संरक्षणाची  कोणतीही पुरेशी साधने न देता महिला कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे राबवून घेणे थांबवा. स्थानिक विकास निधितून कोरोना सर्वेसाठी आशांना  प्रतिमहिना किमान 3000 रुपये व आशा गट प्रवर्तकांना किमान 5000 रुपये अतिरिक्त मानधन द्या, अन्यथा कोरोना सर्वेवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा सिटू संलग्न जनशक्ती आशा कर्मचारी संघटनेने दिला आहे. अकोले तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांनी या बाबतचे निवेदन अकोले तहसीलदार श्री मुकेश कांबळे यांना दिले असून पुढील आठ दिवसात  निर्णय न झाल्यास कोरोना सर्वेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी आशांनी जाहीर केला आहे. 

                       ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावर उपलब्ध असलेल्या स्थानिक विकास निधीतून महिन्याला 3000 रुपये कोरोना सर्वेसाठी तरतूद करणे अजिबात अवघड काम नाही. नेत्यांच्या सत्कारासाठी हजारो रुपयांचा चुराडा करणाऱ्या ग्रामपंचायती व नगर परिषदा कोरोना सर्वेसाठी अशाप्रकारची  तरतूद करायला तयार नसतील तर आशा सुद्धा आपला व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात टाकून केवळ 33 रुपयात सर्वे करायला तयार नाहीत अशी निःसंदिग्ध भूमिका संघटनेने घेतली आहे. स्थानिक विकास निधीतून आशांना सॅनिटायझर, ग्लोज, मास्क सह इतर पुरेशी संरक्षण साधने उपलब्ध करून द्या,  कोरोना संसर्ग झाल्यास आशा कर्मचारी, गट प्रवर्तक व त्यांच्या कुटुंबाला प्राधान्याने तपासणी व मोफत उपचार उपलब्ध करून द्या, तालुक्यातील जनतेसाठी तालुक्यातच कोरोना तपासणीची पुरेशी सुविधा उपलब्ध करा, खानापूर कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना पुरेशा सुविधा उपलब्ध करा या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. भारती गायकवाड, संगीता साळवे, सुनीता गजे, अस्मिता कोते, सुजाता गायके, मंगल गावंडे, चित्रा हासे, चित्रा डगळे, आशा उगले, जानका परते, रुपाली तातळे, स्वाती ताजने, मनिषा मंडलिक, शालिनी वाकचौरे, नैना पांडे, संगीता धुमाळ, आशा देशमुख, चंद्रकला हासे, वंदना बांगर, विद्या वाकचौरे, सविता गाडे आदींनी यावेळी आशा कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. तहसीलदार श्री मुकेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभीरे यांनी मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासने दिली. मागण्या मान्य न झाल्यास कोरोना सर्वेवर बहिष्कार टाकण्याच्या आशा कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला किसान सभेचे डॉ अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, साहेबराव घोडे, खंडू वाकचौरे,  युवक संघटनेचे एकनाथ मेंगाळ, देवराम डोके व जनवादी महिला संघटनेच्या जुबेदा मणियार, सुमन इरणक यांनी पाठिंबा व्यक्त केला.

 टिप : रोखठोक सार्वभौमच्या बातम्या आपल्या मोबाईलवर मिळाव्यात यासाठी  7020290257 हा नंबर आपल्या ग्रृपला अ‍ॅड करा.