गुड न्युज! अकोल्यातील देवठाण व संगमनेरासह बोट्यात होणार रेल्वे स्टेशन.! कसारा ते शिर्डी रेल्वेमार्गासाठी डॉ.लहामटे अग्रही!


सार्वभौम (अकोले) :-
                        नाशिक-पुणे या दोन स्मार्ट सिटींना जोडणारा 235 किमीचा मार्ग आता लवकरच जनसेवार्थ उपलब्ध होणार आहेे. त्यामुळे अकोले आणि संगमनेर अशा दोन्ही तालुक्यांच्या विकासाच्या वाटा आता मोकळ्या होणार आहे. जर अकोले तालुक्याला रेल्वेचा पदस्पर्श झाला तर येथील पर्यटन आणि एमआडीसी तसेच दळणवळण या तीन गोष्टी फार महत्वपुर्ण ठरणार आहे. तर संगमनेरात देखील विकास झपाट्याने वाढणार आहे. तसेच अवघ्या सव्वा तासात दोन्ही तालुक्यातील लोकांना पुणे गाठता येणार आहे. इतकेच काय! त्यापेक्षा नाशिक अधिक जवळ होणार आहे. त्यामुळे आज नाशिक येथे झालेल्या व्हीडिओ कॉम्फरन्स व्दारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत अकोले तालुक्याला एक नवचैतन्य मिळाले असून त्यामुळे एक महत्वाची एमआयडीसी आणि दुसरी त्यासाठी लागणारी वाहतूक यंत्रणा या निमित्ताने उभी राहणार आहे. अशी माहिती डॉ. किरण लहामटे यांनी दिली आहे.
                           
यावेळी नाशिक-पुणे मार्गाच्या विषयी चर्चा निघाली होती. त्यावेळी अकोले तालुक्यातून हा मार्ग नेण्यात यावा व तालुक्यातील देवठाण व बोटा येथे रेल्वेचे उपस्टेशन स्टेशन देण्यात यावे. कारण, असे झाले तर अकोले तालुक्याच्या दळणवळणासाठी हा मार्ग सोपा होईल. येणार्‍या काळात त्याचा पर्यटन आणि उद्योग व्यावसायांसाठी मोठा आधार मिळेल, येणार्‍या काळात तालुक्याला बाजारपेठा जवळ होतील त्यामुळे येथील शेती आणि व्यपाराला चालना मिळेल तसेच तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल अशी भूमिका आ. डॉ. किरण लहामटे यांनी मांडली. त्यावर सकारात्मक उत्तर देत उपमुख्यमंंञी अजितदादा पवार यांनी या गोष्टीला हिरवा कंदिल दाखवला आहे.ताशी 200 किमी हा या रेल्वेचा वेग असणार आहे तर भविष्यात हा वेग ताशी 250 करण्यात येणार आहे. तसेच अकोले तालुक्याच्या विकासात्मक दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा रेल्वे मार्ग येत्या चार वर्षात पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सष्ट केले आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यातून आता रेल्वे धावण्याचे प्रलंबित स्वप्न पुर्ण होणार असून अनेकांनी डॉ. किरण लहामटे यांचे अभिनंदन केले आहे. या बैठकीत आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, खा. अमोल कोल्हे, खा. सदाशिवराव लोखंडे, आ. सरोजनी आहिरे सामिल झाले होते.
ना. बाळासाहेब थोरात यांचे कौतुक.!
दरम्यान ना. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे या रेल्वे मार्गात सर्वात मोठे योगदान आहे. गेली कित्तेक वर्षे त्यांना याचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. सुदैवाने त्यांना वारंवार मंत्रालयात बसण्याची संधी मिळाली आणि त्याचा फायदा म्हणजे निव्वळ संगमनेर तालुक्यालाच नव्हे तर अकोले तालुक्याला देखील झाला आहे. नव्हे-नव्हे तर नगर जिल्ह्याची मान ही रेल्वे धावल्यानंतर उंचावणार आहे. त्यामुळे, संगमनेर तालुक्याला या सुविधेचा मोठा लाभ मिळणार असून प्रगत संगमनेर आता आणखी प्रगत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे, ना. थोरात यांच्यावर दोन्ही तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आता कसारा ते शिर्डी ट्रेन धावावी!
अकोले तालुक्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा झाला आहे. येणार्‍या काळात शेतमाल वाहतूक व दळण-वळणाच्या दृष्टीने याचा प्रचंड फायदा होणार आहे. अकोले तालुक्यातील प्रसिध्द नैसर्गीक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, अकोले तालुक्याची आदिवासी समाज्याची लोककला तसेच येथील संस्कृती अभ्यासण्यासाठी लोक येत असतात या सर्व गोष्टी विचारात घेत हा निर्णय माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. तसेच या बैठकीत शिर्डी -कसारा रेल्वे मार्ग हा अकोले तालुक्यातून जावा अशी आग्रही मागणी मी केली आहे.
- डॉ. किरण लहामटे (अकोले विधानसभा सदस्य)