बोट्यात एकास फायटरने व वायरीने मांड्या झोडल्या! दुचाकी जाळून 60 हजार लुटले! घारगावात गुन्हा दाखल!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील तळपेवाडी बोटा शिवारात जमिनीच्या वादातून एकास फायटर आणि वायरीने मांड्या झोडून त्यांची दुचाकी जाळून टाकल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. 1 ऑगस्ट रोजी सात वाजण्याच्या सुमारास घडली. यात संजय धोंडीभाऊ तळपे (रा.बोटा, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर आरोपींनी जखमीची दुचाकी देखील जाळून टाकली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात संजय तळपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय तळपे यांची तळपेवाडी शिवारात जमीन आहे. तर याच लगत आरोपी करण्यात आलेल्या तळपे यांची देखील जमीन आहे. त्यांचे या जमिनीहून वारंवार वाद होत होते. मात्र, बुधवारी हे वाद फारच विकोप्याला गेले. त्यावेळी आरोपी शिवाजी बन्सी तळपे, रविंद्र दादाभाऊ तळपे, करण मारुती तळपे, शुभम मारुती तळपे, योगेश रघुनाथ तळपे (रा. तळपेवाडी, ता. संगमनेर) तर यांच्यासह अन्य दोघे यांनी संगनमताने गैरकायद्याची मंडळी जमवून संजय तळपे यांना फायटरने मारहाण केली. तर यातील काही व्यक्तींनी केबलच्या वायरच्या तुकड्याने पाठीवर व दोन्ही पायाच्या पोटर्यांवर मारहाण केली. यावेळी फिर्यादीने त्याची जी दुचाकी आणली होती. ती देखील आरोपींनी रागाच्या आवेशाने जाळून टाकली. तर तळपे यांच्या खिशात जे 60 हजार रुपये होते ते आरोपींनी काढून घेतले. असे संजय यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान या प्रकारानंतर तळपेवाडी शिवारात एकच खळबळ उडाली होती. संजय तळपे यांना फायटरने मारहाण केल्यामुळे ते चांगलेच रक्तभंबाळ झाले होते. तर आरोपी यांनी पुर्ण प्लॅनिंगनी मारल्यामुळे त्यांच्या पोटर्या चांगल्याच सुजल्या आहेत. त्यामुळे त्यांनी काही व्यक्तींनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी दुसर्या दिवशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भुसारे यांच्या मर्गादर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल देशमुख करीत आहेत.