आजी-माजी आमदारांनो तुमचे वाद जरावेळ थांबवा.! तालुक्याला आज या गोष्टींची नित्तांत गरज आहे.! जरा त्याकडे लक्ष द्या.
सार्वभौम (अकोले) :-
खरंतर मांडताना फार वाईट वाटते आहे. की, आजकाल अकोले तालुक्यात विकासाच्या, आरोग्याच्या आणि वैचारिक चर्चा फार कमी होताना दिसत आहे. मात्र, हेव्यादाव्यांच्या राजकारणाने तालुका नटू पाहत आहे. भुतकाळात कोणाच्या बुडाखाली किती अंधार होता हे चाचपडण्यात अनेकांना गोड वाटत आहे. मात्र, यात औद्योगिक, पर्यटण आणि शैक्षणिक सोडाच मात्र, आरोग्याचे देखील येथे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत. हे आज या विशेष लेेखातून तुमच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे, तालुक्यातील सजग नागरिक, दानशूर व्यक्ती आणि प्रत्येक लोकप्रतिनिधींसह आजी-माजी आमदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन व्हेंटीलेटरवर पडलेली दवाखाने, असुविधा सोसणारी जनता आणि हतबल झालेल्या डॉक्टरांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे. तर यासाठी तत्काळ काय उपायोजना करता येईल. हे कोणतेही अश्वासने न देता एक होऊन अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे, यावर कोणी राजकारण न करता एकोप्याने काही आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
खरंतर अकोले तालुक्यातील कोतुळ येथे अनन्या शिंदे हिचा केवळ उपचारा आभावी मृत्यु होऊन दोन महिने देखील उलटले नाही. तोच रुग्णालयांची वास्तवत: चव्हाट्यावर आली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अकोले तालुका जिल्हा प्रशासनाने खरोखर वाळीत टाकला आहे की काय? हेच काळायला तयार नाही. कारण, आपल्या तालुक्यात चार ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यात अकोले शहर, कोतुळ, राजूर व समशेरपूर यांचा सामावेश होतो. मात्र, येथील रुग्णालयांमध्ये वर्ग एकचे अधिकारीच उपलब्ध नाहीत. तेथे सहायक अधिकारी निव्वळ चालढकल करण्याचे काम करीत असताना दिसत आहे. म्हणजे दहावीच्या वर्गाला पाचवीचा शिक्षक अशी परिस्थिती आरोग्याची आहे. तर कोतुळ व राजूर रुग्णालयात एमओच्या प्रत्येकी 2 तर समशेरपूर येथे एक जागा रिक्त आहे. तर धक्कादायक म्हणजे या सर्वांचे काम एक वैद्यकीय अधिकारी पाहतात असे दाखविले जाते. मात्र, वास्तवत: हे अधिकारी देखील आजवर एका ठिकाणी दिसत नाही आणि त्यांनी डॉ. बबन गायकवाड यांच्याप्रमाणे आत्मियतेने कधी रूग्ण तपासले असे देखील कधी पहायला मिळाले नाही अशी तक्रार येत आहे. त्यामुळे, चार रुग्णालयात वर्ग एकचा डॉक्टर हे तुम्हाला तरी पटते का? त्यामुळे जनतेने जागे झाले पाहिजे. इतका अनागोंदी कारभार.! तो ही आदिवासी आणि दुर्गम तालुक्यात आणि तो ही कोविडच्या काळात.! ही तालुक्यासाठी सर्वात मोठी शोकांतीका आहे. त्यामुळे, येथे औषधे नाहीत, सुविधा नाहीत, योग्यवेळी उपचार होत नाहीत, अक्षरश: दरवाजात उभे करुन 10 फुटाहून रुग्ण तपासला जातो हे एकदम हॉरर आहे. त्यामुळे, कोणीतरी या तालुक्यातील गोरगरिबांचे पालकत्व स्विकारणार आहे का? की सर्वांना फक्त राजकारण करायचे आहे? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
अकोलेकरांनो.! तुम्हाला धक्का बसेल, मात्र 1,505.08 किमी. असे सर्वाधिक क्षेत्रफळ असणार्या अकोले तालुक्यात भर कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली असताना येथे 4 लाख लोकसंखेसाठी फक्त एक अॅम्ब्युलन्स होती. म्हणजे सकाळी कोरोनाचा संशयित सापडला तर नाशिक, सिन्नर किंवा लोणीची अॅम्ब्युलन्स येईपर्यंत वाट पाहवी लागते. तर धक्कादायक म्हणजे दर्याखोर्यात सापडलेल्या एका रूग्णाला आणण्यासाठी चक्क पाथर्डीची रुग्णवाहीका आणावी लागली होती. त्यामुळे, खरोखर प्रश्न पडतो की, यालाच खरोखर तालुक्याचा विकास म्हणतात का? आत तालुक्यात 3 अॅम्ब्युलन्स आहेत मात्र त्या देखील उपलब्ध होत नाही. तरी अजून चार ठिकाणी अॅम्ब्युलन्सची गरज आहे. त्यात कोविड सेंटर खानापूर, पीएचसी ब्राम्हणवाडा, शेेंडी व समशेरपूर ही ठिकाणे फार संवेदनशील आहे. मात्र, तेथे अॅम्ब्युलन्सची सुविधा नाही. त्यासाठी कोणी लक्ष देणार आहे का? की जो-तो नागरिकांना निळ्या दिव्याच्या प्रतिक्षेत व्हेटीलेटरवर ठेऊन लाल दिव्याच्या मागे लागणार आहे? जर मतदार या कोरोनातून आणि आरोग्यातून जगला तर तो उभी हायात या सुविधा पुरविणार्यांच्या उपकारात राहिल. त्यामुळे, कोणी का होईना या तृटींची पुर्तता करण्यासाठी प्रस्ताव तयार करुन पाठविणे गरजेचे आहे. तर आजी-माजी आमदारांनी यात लक्ष घालून नागरिकांना या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे असे नागरिकांना वाटते आहे.
एक महत्वाची गोष्ट अशी की, अकोले तालुका दुर्गम भागात सामाविष्ट आहे. मात्र, तशा सुविधा येथे पुरविण्यात सरकार आणि प्रशासन देखील अपयशी झाल्याचे दिसते आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आपल्या तालुक्यात आजही स्त्रीरोगतज्ञ नाही. कोतुळ व राजूर येथे स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोगतज्ञ यांची नित्तांत गरज आहे. मात्र, येथे स्त्रीया आणि बालके यांच्या आरोग्याचे पडलेय कोणाला? ज्यांचे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात चालते ते एकमेकांवर टिका करण्यात मग्न आहेत. सुदैवाने येथील साक्षरतेचे प्रमाण 60 टक्के असून देखील लोक निरक्षर सारखे वागतात आणि ज्यांच्या ओढावर मिसरुड फुटले नाही ते राजकारणावर बड्या-बड्या गप्पा मारताना दिसतात (संदर्भ-इंदोरीकर महाराज) त्यामुळे सक्षम लोकांनी तरी आता लोकप्रतिनिधींकडे आरोग्याच्या भौतिक सुविधांची मागणी केली पाहिजे. तरुणांनी राजकारण नाही तर समाजकारण म्हणून पुढे येत अशा महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही तर उलट सोशल मीडियाचा गैरवापर करीत नको त्या अपशब्दांचा वापर करून आपल्या आकलेचे तारे तोडताना ते दिसत आहे.
खरंतर अकोले तालुक्याचे क्षेत्रफळ (1505.08 किमी.) सर्वात मोठे असून येथे 1,058 मिमी पर्जन्याचे प्रमाण आहे. म्हणजे इतका पाऊस जिल्ह्यात कोठेच होत नाही तर तो येथे महाबळेश्वरच्या वाई प्रमाणे होते. त्यामुळे येथे गडूळ पाणी, होणारे मच्छर, छोट्यामोठ्या किटकांचे प्रजनन, साचणारे पाणी, नद्या नाल्यांचा मैला, थंडगार वातावरण त्यामुळे येथे सर्वाधिक लोक आजारी पडतात. जर घटघरचा माणूस आजारी पडला तर राजूर व अकोलेपर्यंत येता-येता तो अधिक बधिर होतो. त्यात रस्त्यांची दुरावस्था यावर न बोललेलंच बरं.! दुर्दैव असे की, आदिवासी भागात भर रस्त्यात माय भगिनींची डिलेवरी होते. केवळ सुविधांचा आभाव असल्यामुळे त्या मातृत्वाला ज्या कळा सोसाव्या लागतात. याचे पातक कोणाच्या माथी मारायचे? मग आपण अकोले तालुक्यात राहतोय की गडचिरोलीसारख्या नक्षलवादी क्षेत्रात हेच कळत नाही. जर घाटघरचा रुग्ण अकोल्यात आणि तेथून पुढे नगरला हालवायचा म्हणजे त्या रुग्णाने 275 किमीचे अंतर काटून उपचार घ्यायचे. या हतबलतेपेक्षा आणि आदिवासी भागात जन्म घेतला या शल्यापेक्षा दुसरे दु:ख काय असणार आहे? त्यामुळे जाणकार राजकारणी, सुज्ञ समाजसेवक आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीस विनंती आहे की, अकोले तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय होणे गरजेचे असून त्यात ऑक्सिजन सुविधा, वर्ग एकचे अधिकारी, गंभीर स्वरुपाचे ऑपरेशन केले जाईल असे सुसज्ज रुग्णालय, त्यात भौतिक सुविधा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एलएससीएस (सीझर) करण्याची सोय होणे नित्तांत गरजेचे आहे. कारण, अकोले तालुक्यात मातामृत्यू आणि बालमृत्यू यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला आळा बसला तरी त्याचे पुण्य पाठपुरावा करणार्यांना लागणार आहे.
आता हे इतकेच प्रश्न नाही. तर आज कोरोनाची फार भयानक परिस्थिती आहे. जे आरोग्य सेवक मैदानात काम करीत आहे. त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे पीपीकिट सध्या उपलब्ध नाही. आ. डॉ. किरण लहामटे यांनी जी काही मदत केली होती. आजवर त्याच साहित्यांच्या सहाय्यतेने चालढकल सुरू आहे. मात्र, तुम्हाला धक्का बसेल की, जे लोक स्वॅब घेतात, त्यांना आता किट नाही, कोविड सेंटरमध्ये फिरतात त्यांना किट नाही, हाताला सॅनिटायझर नाही, मास्क शिल्लक नाही, फार म्हणजे फार भयानक समस्यांतून हे लोक प्रवास करीत आहेत. हे लक्षात येताच रावसाहेब वाकचौरे (विरगाव) यांनी स्वखर्चाने तहसिल कार्यालय व खानापूर कोविड सेंटर येथे महागडा सॉनिटायझर टँक बसविला आहे. त्यांच्या या दानशुरतेला साद देत तालुक्यातील प्रत्येकाने जी वाटेल ती मदत करणे अपेक्षित आहे. आम्ही सार्वभौमची टिम पहिले पाऊल म्हणून या आरोग्यसेवक टिमसाठी काही महत्वाच्या वस्तू सुपुर्द करणार आहोत. तुम्ही देखील वरिल गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न कराल व तालुक्याला सावरण्यासाठी स्वत:च्या परिने मदत कराल अशी अपेक्षा.! धन्यवाद.!
- सागर शिंदे
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 75 लाख वाचक)