अकोेल्यात कोरोनाचा नववा बळी.! कारखाना रोड अस्थिर.! कोरोनाचे नव्हे भितीचे बळी.!

 

सार्वभौम (अकोले) :-

                      अकोले तालुक्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहेत. मात्र, मयत होण्याची जी सरासरी आहे ती मात्र फार चिंताजनक आहे. कारण, गेल्या २४ ते २५ दिवसात कोरोनाने तब्बल सहा बळी घेतले आहेत. तर आजवर हि संख्या ९ वर जाऊन पोहचली आहे. यातच काल रात्री उशिरा नगर शहरातील कारखाना रोड तथा शेटे मळा येथील एका ७८ वर्षीय व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या चार दिवसांपुर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर संगमनेर रुग्णालयात उपचार सुरु होेते. त्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे, कोविडपेक्षा कोविडच्या भितीनेच लोकांचे बळी जात असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी प्रशासनाने जनजागृतीसाठी काहीतरी उपायोजना आखणे आज नित्तांत गरजेची झाले आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, आकोल्यात कोरोनाच्या रुग्णाचा प्रारंभ कारखाना रोडपासून सुरु झाला. आज एक-एक करत शहरात ४० पेक्षा जास्त रुग्ण मिळून आले आहेत. मात्र, जितकी चर्चा आणि वादळ कारखाना रोड परिसरात उठले तितके तालुक्यात कोठे उठले नाही. वास्तवत: येथे बहुतांशी नात्यागोत्याचा आणि पुढाऱ्यांचा गोतावळा आहे. त्यामुळे, काळजी घेणारे कमी आणि काळजी घ्या सांगत फिरणारे फार झाले आहेत. त्यामुळे, भल्याभल्यांना येथे कोरोनाची बाधा झाली असून त्याचा तोटा आता सामान्य जनतेला होऊ लागला आहे. त्यामुळे, पुढच्याला ठेच मागचा शाहणा अशी परिस्थिती अजूनही येथे दिसून येत नाही. म्हणून तर आजवर तब्बल ४० रुग्ण फक्त एकट्या कारखाना रोडचे आहेत. त्यामुळे, येथील नागरिकांनी थोडीशी समझदारीची भुमिका घेतली पाहिजे. वारंवार बाहेर पडणे, गर्दी आणि घोळक्याने गप्पा मारणे, समाजसेवेच्या नावाखाली गावभर फेरफटका मारणे असे अनेक उपद्रव थांबविले पाहिजे. जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे ठिक आहे मात्र अन्य व्यक्तींनी कोरोनाला थोडंसं गांभिर्याने घेतले पाहिजे. कारण, प्रत्येकाच्या घरात वृद्ध व लहान मुले आहेत. त्यांना जर कोरोनाची बाधा झाली तर त्यांना थेट मृत्युशी झुंज द्यावी लागते. तर जे तरुण आहेत ते अगदी सहज रिकवर होतात. त्यामुळे, आपली नाही तर किमान घरातील व्यक्तींची तरी काळजी घेण्यासाठी आपले पाय घरात डांबून ठेवले पाहिजे.

          सुदैवाने अकोेले तालुक्यात कोरोनाची परिस्थिती फार बरी आहे. पण, नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढत राहिला तर कोविड नियंत्रण हाताबाहेर जाईल. त्यात एक महत्वाचे म्हणजे जितका अकोल्याचा मृत्युदर वाढतो आहे, तितका तर नगर शहर आणि संगमनेरचा देखील नाही. त्यामुळे, बाधा झालेली परडेल,  मात्र मृत्युचे प्रमाण नाही. त्यामुळे, प्रत्येकाने हे शहाणपण अंगिकारले पाहिजे. तर महत्वाचे म्हणजे या रोगाशी धैर्याने लढले तर हा रोग अगदी शुल्लक आहे. मात्र, त्याचा प्रसार भयानक वेगाने होत असल्यामुळे त्याची तिव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे, जे बाधीत झाले आहेत त्यांना धीर द्या, कारण, कोरोना जीव घेण्यापुर्वीच लोक अटॅकने मयत होण्याचा दुर्घटना आजकाल वाढत चालल्या आहेत. सेफ रहा, घरी बसा, काळजी घ्या.

 दरम्यान, एकीकडे रोज रुग्णांमध्ये भर पडत असताना जिल्ह्यातील विविध तालुक्यातून रोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण घरी जाताना दिसत आहेत. काल आणि आज जिल्हा रुग्णालयातून एकूण ११ शे रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. त्यामध्ये, काल मनपा १८५, संगमनेर काल आणि आज ४३, राहाता १४, पाथर्डी ३०, नगर ग्रामीण २६, श्रीरामपूर ३७ , कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २२,   श्रीगोंदा १५, पारनेर १८, काल आणि आज अकोले ०८, राहुरी ०४, शेवगाव २५, कोपरगाव ३७, जामखेड ०३, कर्जत १७ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर एकाच दिवसात सहा जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे, बरे होण्याचे प्रमाण अधिक असून दुर्दैवाने जे कोणी मयत होत आहे. त्यांची भितीच त्यांना मृत्युच्या दारापर्यंत घेऊन जात आहे. तर, यात लहान मुले बाधित होतात मात्र सुदैवाने त्यांचा मृत्युदर काहीच नाही परंतु वृद्ध व्यक्तींना बीपी, शुगर, निमोनिया, मुळव्याध,किडनी स्टोन, लिव्हरचे आजार असे अनेक प्रकार असल्यामुळे हा मृत्युदर वाढता असल्याचे लक्षात येत आहे. मात्र 80 आणि 90 वयाच्या व्यक्तींनी देखील कोरोनावर मात केल्याचे शेकडो उदाहरणे आहेत. त्यामुळे, घाबरु नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

- महेश जेजुरकर