महाराष्ट्रात मालेगाव, नगर जिल्ह्यात कुरण.! संगमनेरात ठरले कोरोनाचे एक रोलमॉडेल गाव.!


- सागर शिंदे

सार्वभौम (संगमनेर) :- 

                         संगमनेर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असे वाटत असले, तरी देखील एखाद्या निर्जन खडकावर दरीच्या कठड्यावर एक आनंददायी रोपटं फुलावं आणि त्याकडे पाहताच जगण्याला प्रेरणा मिळावी, लढण्याला धैर्य मिळावे असे वातावरण निर्माण व्हावे. अगदी तसेच कोरोनाच्या काळात कुरण हे कोविडच्या वादळात फुललेले स्फुर्तीदायी रोपटे आहे. जसे मालेगाव हे महाराष्ट्राचा आदर्श ठरले तसे कुरण हे देखील नगर जिल्ह्यासाठी एक आदर्श रोलमॉडेल ठरले आहे. त्यामुळे अगदी कालपर्यंत जेथे 60 रुग्ण आणि 10 संशयित मयत होते, आज त्याच ठिकाणी अपवाद वगळता तुलनात्मक रूग्ण नाही. ही कोविडची जंग जिंकल्याचे हे उदाहरण नाही तर काय आहे? मात्र, हे यश असेच नाही, त्यासाठी अनेकांनी स्वत:चे आरोग्य पणाला लावले आहे. गंगाधर राऊत यासारख्या ग्रामसेवकाने उपद्रवी लोकांशी पंगा घेतला आहे, तर प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक बीडीओ, विस्तार अधिकारी आणि डॉ. नेवासकर यांच्यासह अन्य सेवकांनी तेथे दिवसरात्र मेहनत घेतली आहे. म्हणून तर कुरणच्या कुरूक्षेत्रावर कोविडचे अस्तित्व पुसटसे झाले असून काल लोकांचे मृतदेह पाडणार्‍या कोरोनाचा आज तेथे "रक्तपात" झाला आहे.  त्यामुळे तेथील नागरिक आणि कोविडशी झुंजणार्‍या प्रत्येक योद्ध्याला "रोखठोक सार्वभौम" मानाचा सलाम करीत आहे!

  चिनच्या वुहान शहरात 2019 मध्ये जन्माला आलेला कोरोना बोलबोल करता 30 जानेवारी 2020 रोजी भारतातील केरळमध्ये पहिल्यांदा दाखल झाला. डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच  त्याचा प्रलय जगभर पसरत गेला. आज गाव तेथे रुग्ण आणि गल्ली तेथे कोरोना असे दहशतमय चित्र निर्माण झाले आहे. रोज कोरोनाची आकडेवारी पाहता अनेकांच्या भुवया उंचावतात, कोणी धीर देते तर कोणी बधीर करते. मात्र, उपाय सांगायला आणि मैदानात लढायला कोणी तयार नाही. एकीकडे महाराष्ट्रात पहिल्यापासून जातीनिहाय कोरोनाला गणले गेले. तर त्याच वेळी मालेगावात त्याने थैमान घातले. परंतु, हाताबाहेर गेलेले हे शहर पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे आणि त्यांच्या टिमने तेथून कोरोनाची पाळंमुळं उखळून फेकून दिली आणि त्यानंतर एकेकाळी कु-शब्दाने विटंबलेले मालेगाव आज सुस्थितीत उभे राहून महाराष्ट्रात एक "रोलमॉडले" ठरले आहे. इतकेच काय! जाती पातीच्या भिंती तोडून कोरोनाचे साम्राज्य उध्वस्त करणारे हे देशात एकमेव शहर ठरले आहे. अगदी त्याच पावलावर पाऊल ठेऊन कुरणच्या अस्तित्वाची लढाई तेथील नागरिकांनी जिंकली आहे.

             खरंतर कुरण सारख्या ठिकाणी कोणी आयएएस, आयपीएस अधिकारी येऊन त्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली नाही. तर, आमचा साधा ग्रामसेवक, गंगाधर राऊत, आरोग्यसेवक डॉ. नेवासकर, डॉ. आरविंद काळे, आशा सेवक रेहना शेख, आयशा शेख, अंगणवाडी सेविका समिना शेख, सोनवणे मॅडम यांच्यासह स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेेतला आणि सुरू झाली कोरोनाची तिरढी उभी करण्याचे काम.! कुरण म्हणजे 4 हजार 417 लोकसंख्येचे गाव. इकडून तिकडून जमा झालेले म्हणजे 5 हजार लोकवस्ती. त्यात 95 टक्के लोक मुस्लिम बांधव, त्यामुळे रोजची रोजीरोटी कमविण्यासाठी जो-तो धडपड करीत होता. एकीकडे या नतदृष्ट समाज्याचा दृष्टीकोण आणि सोशल मीडियातून पसरणार्‍या अफवा यामुळे हे बांधव पुरते खचून गेले होते. त्यामुळे, त्यांच्या भावना आणि हतबलता काय असावी या वेदना त्यांनाच माहित.! मात्र, तरी देखील प्रशासनाने त्यांची साथ सोडली नाही. एकेकाळी कुरण थेट लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे समज-गैरसमज होत प्रकरण थेट कोर्टापर्यंत गेले. मात्र, होणार तरी काय? कारण,  कोणाला वाटते की जनतेला बळच त्रास द्यावा! अखेर 14 दिवस पोलीस, महसूल, आरोग्य विभाग यांनी संयमाची भुमिका घेतली. तर नकळत कुरणच्या भल्यासाठी तेथे आणिबाणी सारखी वेळी निर्माण केली. त्याचा फायदा असा झाला की, त्यावेळी जी कोरोनाची साखळी तुटली त्यानंतर अनेकजण आपोआप बरे झाले असावेत आणि प्रादुर्भावही टळला गेला.

वास्तवत: हे वाटते तितके सोपे नाही. कारण, हे कोसळलेले कुरण उभे करण्यासाठी अनेकांनी मनस्ताप सहन केला आहे तर रात्रीचा दिवस करुन समोर मृत्यू दिसत असताना देखील झुंज दिली आहे. तेथे जे कोविड योद्धे होतेे त्यांनी सकाळी नऊ ते रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत अविरत ड्युट्या केल्या आहेत. शहरातील भलेभले धनबलाढ्य लोक रुग्णांना दवाखाण्यात घेत नाहीत त्यामुळे, येथील डॉक्टर आणि प्रशासनाने स्वत:चा दवाखाना उभा करुन 24 तास तो जनतेसाठी खुला केला होता, त्यावेळी एक ना दोन तब्बल हजारो लोकांच्या तपासण्या तेथे करण्यात आल्या होत्या. तेथील नागरिकांना होमिओपॉथी गोळ्या आणि आयुर्वेदीक काढे देण्यात आले होते. जेव्हा भर संगमनेरात कोरोनाचा कहर सुरू होता, तेव्हा काही विघ्नसंतोषी लोक अफवा, जातीयवाद आणि बाधित रुग्णांना अस्पृश्यतेची जाणीव करुन देण्यात दंग होते. त्यामुळे, कोणी स्वॅब देण्यास देखील पुढे येत नव्हते. मरण आले तरी बेहत्तर पण, कोविडचा शिक्का नको. अशा भावनेत जनता गुरफटलेली असताना येथील कर्मचार्‍यांनी प्रत्येक घराघरात जाऊन भेदरलेल्यांची मस्तके साफ केली. त्यांना तपासणीसाठी प्रवृत्त केले, गोळ्या घेऊन खाण्यासाठी प्रेरीत केले. तेव्हा कोठे एक-एक व्यक्ती कुरणमध्ये उभा राहिला आहे. यावेळी खरंतर तेथील राजकारण बाजुला ठेऊन पहिली मानुसकी आणि कटू प्रसंग पाहिला गेला. समझदार व्यक्तींनी पुढे येत तेथे बघता-बघता राजकारण विरहीत एक समाजहिताचा पक्ष उभा केला, ज्यांनी केवळ कोविडला नष्ट करण्याची शपथ घेतली होती. म्हणून  तेथील प्रत्येक व्यक्तीचा या कोविड विरुद्ध संग्रामात मोलाचा वाटा आहे.

 खरंतर आजच्या या कुरणमध्ये त्याकाळात संशयित 10 लोकांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यात कोणी बाधित होते कोणी नाही देव जाणे. पण, अहवालापुर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यदा कदाचित प्रशासनाने हे गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला नसता तर येथे माणसे मरुन पडली असती, त्याचा थांगपत्ता कोणाला लागला नसता. परंतु "सब्र का फल मिठा होता हैं !" याची प्रचिती आज प्रत्येकाला येत आहे. मात्र, मागे वळून पाहिले तर प्रशासनाने तेथे फार अथक परिश्रम घेतले आहे. पहिले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कुरण लॉकडाऊन हा निर्णय अगदी ठामपणे घेतला, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रांताधिकारी यांनी तत्परता दर्शविली आणि प्रचंड विरोध होऊन देखील ते प्रत्यक्षात उतरविले ही बाब वाखान्याजोगी आहे. खरंतर येथील तलाठी यांची भुमिका नेहमी गुलदस्त्यात राहिली, मात्र महसूल विभागाचे प्रमुख अमोल निकम यांनी प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्यासोबत नेहमीच पायपीट केली. यापलिकडे पंचायत समितीचे बीडीओ सुरेश शिंदे यांनी बाकी खर्‍या अर्थाने कुरणची माती पायाखाली घातली. कारण, त्यांचे विस्तार अधिकारी डोके साहेब यांच्यासह त्यांच्या अंतर्गत येणार्‍या प्रत्येक व्यक्तीने कुरणला कोरोनाच्या विळख्यातून सोडविण्याचे काम जिकरीने केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमाकडे देखील दुर्लक्ष करुन जमनार नाही.

                   या सर्वांमध्ये तुम्ही लढा आमचे पाठबळ आहे असे म्हणणारे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी देखील वेळोवेळी कुरणमध्ये पोलीसबळ पुरविले. जेव्हा सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण होत होती. तेव्हा स्वत: जातीने हजर होऊन अनेकांच्या कॉलर पकडून आत टाकणारे हे अधिकारी होते. असे अनेकांचे हात कुरणच्या वेशीवर आशिर्वाद म्हणून पडत राहिले म्हणून तर आज कुरणचा प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत आहे. त्यामुळे ही गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते की, जसे राज्यात मालेगाव नावारुपाला आले, तसे किमान नगर जिल्ह्यात तरी कुरणचे नाव पुढे येईल यात तिळमात्र शंका नाही. तर जेव्हा कधी इतिहासात कोविड योद्ध्यांचा सन्मान केला जाईल तेव्हा कुरणमध्ये मृत्यु समोर दिसत असताना देखील ज्यांना हात पत्कारली नाही. त्यांचे देखील या यादीत नाव राहिल अशी तजबीज शासन-प्रशासन यांनी करणे अपेक्षित आहे. बाकी त्या कोविड योद्ध्यांना व गावकर्‍यांना "रोखठोक सार्वभौम"चा मानाचा मुजरा.!!!

तेथे नेमके काय केले?

* प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षन केले

* स्वॅब देण्यास प्रवृत्त केले

* कोेरोना विषयी जनजागृती केली

* स्थानिक डॉक्टरांची मदत घेतली

* प्राथमिक दवाखाना सुरू केला

* संशयितांची तपासणी केली

* होमीओपॉथी दावाखाना सुरू केला

* बाहेरुन आलेले क्वारंटाईन केले

* बहुतांशी लोक होमक्वारंटाईन केले

* बाधितांच्या संपर्काचा शोध घेतला

* आहार कसा घ्यायचा माहिती दिली

* रोज संशयितांचे टेम्प्रेचर घेतले

* कुरण योग्यवेळी लॉकडाऊन केले

* स्थानिक व्यक्तींना विश्वासात घेतले

* अधिकार्‍यांच्या सुचनांचे पालन केले

* प्रत्येक गोष्टीच्या नोंदी ठेवण्यात आल्या

* मालेगाव काढा प्रत्येकाने घेतला

* तेथे नव्याने कोविड सेंटर केले

* राजकीय व तरुणांची मदत घेतली

* प्रत्येकाच्या समुपदेशनवर भर दिला

* हे सर्व एक टिमवर्क नुसार नियोजन केले..


टिप :- या लेखात काही माहिती संदिग्ध असू शकते. कृपया सकारात्म विचार करावा. पोष्ट योग्य वाटली तर शेअर करा. अन्यथा विनाश काले विपरीत बुद्धीचा वापर करुन विरोध करु नये.!

- सागर शिंदे

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 82 लाख वाचक)