पंचायत समितीत दोन अधिकारी योद्ध्यांना कोरोनाचे संक्रमण.! बाजीगर साहेबांनो.! जिगर सोडू नका!


सार्वभौम (संगमनेर) :- 

                         संगमनेरात असे कार्यालय राहिले नाही जेथे कोरोनाने शिरकाव केला नाही. या महाशयाने तालुका आणि शहरातील गल्लीबोळच सोडा चक्क खाकीचे नियम तोडून जेलमध्ये एन्ट्री मारली तर पोलिसांना देखील बाधित करुन मोठी खळबळ माजविली. आता एकच कार्यालय राहिले होते. ते म्हणजे पंचायत समिती. मात्र, त्याने तेथे देखील जे कोविड योद्धे होते त्यांच्यावर अटॅक केला आहे. ज्यांनी ग्रामपंचायतींच्या माध्यमांतून कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले अशा दोन ग्रामपंचायत विस्तार अधिकारी तथा "वजीरांना" कोरोनाने चेकमेट केले आहे. मात्र, आता सध्यातरी संगमनेर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याचे श्रेय पंचायत समिती आणि महसूल कर्मचारी यांना जाते. त्यामुळे हे खर्‍या अर्थाने "बाजीगर" आहेत. त्यामुळे आज दोन अधिकार्‍यांना जरी बाधा झाली असली तरी त्यांना धीर देणे आणि लढ म्हणणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे, साहेबांनो कोरोनाचे "मैदानी युद्ध" तुम्ही जिंकले आहे तर हे युद्ध तुम्हासाठी "कस्पटाप्रमाणे" आहे त्यामुळे फक्त तुम्ही "जीगर सोडू नका" अशी साद त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. हे अधिकारी लवकर बरे होऊन सेवेत हजर होतील यात तिळमात्र शंका नाही.

                                 याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यात एकूण 143 ग्रामपंचायती आहेत. तर त्यांचे नियंत्रण करण्यासाठी चार विस्तार अधिकारी आहेत. तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, त्यामुळे त्यांची सुरक्षा करण्यासाठी हे अधिकारी व कर्मचारी 24 तास कार्यतत्पर असल्याचे दिसते आहे. आज मितीस पुर्ण तालुक्यात 1 हजार 65 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात शहरी भागात 462 असून ग्रामीण भागात 603 आहेत. विशेष म्हणजे या तालुक्यात संगमनेर, राहाता व अकोले अशा "तीन विधानसभेंचा गोतावळा" आहे. मात्र, कार्यभार एकट्या संगमनेरवर आहे. यावरुन लक्षात येईलच की, येथे क्षेत्रफळ कमी आणि लोकसंख्या मात्र अवाजवी आहे. अशात बीडीओ सुरेश शिंदे व त्यांची टीम जीवाचे रान करुन कोरोनाशी दोन हात करताना दिसत आहे. त्याची "फलनिष्पत्ती" म्हणजे "कुरण" होय.!

आता जे दोन विस्तार अधिकारी यांना जी कोरोनाची बाधा झाली आहे. ते दोन्ही व्यक्ती ग्रामपंचायत विभागातील आहे. त्यांनी तालुक्यातील गाव ना गाव पिंजून काढले आहे. कुरण सारख्या ठिकाणी तर सलग 20 ते 25 दिवस डेरा दाखल करणारे हे अधिकारी यांनी कधी स्वत:च्या जिवाची पर्वा केली नाही. प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम आणि बीडीओ सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आरोग्य अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक तसेच आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांनी तालुका कोरोनाविरहीत करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. त्यात जर त्यांना बाधा होत असेल तर त्यांची शासन आणि प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. जेव्हा "जिल्हाधिकारी" महोदय राहुल द्विवेदी फेसबुक ऑनलाईन आले होते. तेव्हा त्यांना "रोखठोक सार्वभौम"च्या माध्यमातून सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब यांच्याबाबत प्रश्न करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की, प्रत्येक विभागाच्या आस्थापनेला मी तसे आदेश देत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न मिटणार आहे. तेव्हापासून अनेकांना धीर मिळाला आहे.

आता जनतेची काळजी करता-करता कोविड योद्ध्यांनी त्यांचे आयुष्य पणाला लावले आहे. मात्र, कोरोना अगदी प्रशासनाच्या घरात येऊन उभा ठाकला आहे. त्यामुळे, त्यांनी आता तरी स्वत:ची सुरक्षा जोपासली पाहिजे. आज पंचायत समितीत कोरोनाचे रुग्ण मिळून आले. त्यामुळे तेथे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीने फार महत्वाचे काम असेल तरच तेथे आले पाहिजे, प्रशासनाच्या वतीने येथील कर्मचारी व अधिकारी यांना मास्क, सॅनिटायझर, आवश्यकता असल्यास पीपी किट, हॅन्डवॉश यांचा पुरवठा केला पाहिजे. खरंतर हे "उत्तरदायीत्व" जितके शासन-प्रशासनाचे आहे, तितकेच येथील राजकीय पुढार्‍यांचे देखील आहे. जितका मिजास ते अधिकारी व कर्मचारी वर्गावर गाजविण्याचा प्रयत्न करतात, तितकी त्यांची काळजी घेण्यासाठी स्वयंस्फुर्तीने पुढे येणे गरजेचे आहे. आता त्यांच्या मानुसकीची देखील येथे परिक्षा होणार आहे. त्यामुळे, सध्या तरी पंचायत समितीत "गर्दी" नव्हे तर "दर्दी" लोकांची गरज आहे. 

              खरंतर अगदी कालच पंचायत समितीचे बीडीओ सुरेश शिंदे यांना "एक वर्षासाठी एक्सटेंन्शन" मिळाले आहे. अर्थात त्यांची या तालुक्याला गरज आहे हे लक्षात घेता हा शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनसामान्यांच्या पाठीशी उभा राहणारा हा अधिकारी त्यांच्या कर्मचार्‍यांच्या नक्कीच पाठीशी उभा राहिल यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे येणार्‍या काही दिवस तरी जनतेने सहकार्य करावे, येथे हकनाक गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर वेळ पडल्यास जसे जिल्हा परिषद हे मुख्यालय बंद करण्यात आले होते. तसे काही दिवस हे कार्यालय बंद करण्याची वेळ भासल्यास ते बंद करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसिलदार, बीडीओ यांनी स्वत: पुढाकार घेतला पाहिजे असे तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांना वाटते आहे. कारण, या कार्यालयात सर्वांमध्ये आता काही प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
- सागर शिंदे

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 82 लाख वाचक)