आरं देवा.! नवरा-नवरीच्या आईबापावरच ठोकले गुन्हे.! कोतुळची वरात जाखुरीच्या दारात.! देशमुखशाही महागात पडली.!


सार्वभौम (अकोले) :- 

                       संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे एक विवाह संपन्न झाला. त्याला अकोले तालुक्यातील कोतुळचे वर्‍हाड आले होते. मात्र, शासनाची परवानगी नाही, लग्नात सोशल डिस्टन्स नाही, 50 लोकांची मर्यादा नाही असे ढांगाढोंगात हा लग्नसोहळा संपन्न झाला. त्यास सांखिंडीफाटा येथील कृष्णा लॉनचे सहकार्य लाभले. त्यामुळे, नियमांची पायमल्ली करीत कोरोनाला चकवा देण्याचा प्रयत्न करणार्‍यांवरच संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नवरा-नवरीच्या आई बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर दगू देशमुख व मंदाबाई मधुकार देशमुख (रा. कोतुळ, ता. अकोले) तर सुनिल वसंत देशमुख व सुनिता सुनिल देशमुख (रा. जाखुरी, ता. संगमनेर) अशी चौघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाने हजारो लोकांचे जीव घेतले आहे तर लाखो लोक आजही व्हेंटीलेटरवर आहे. त्यामुळे, एक दक्षता म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकवेळी जग बंद करण्याचा निर्णय युएनओने घेतला होता. मात्र, त्यातून आपण अजून कोठे सावरतही नाही. तोच लोकांचा लग्नाचा सुरबुडा उठला आहे. बरं त्यावर कोणाचा अक्षेप मुळीच नाही. मात्र, शासन-प्रशासन तुम्हाला जीव तोडून सांगत आहे की, बाबाहो.! लग्न करा, पण अवघ्या काही पाहुण्यांमध्ये करा, नातेवाईक नाराज होणार नाही. कोणी मानापानावाचून रुसणार नाही फुगणार नाही. आपल्यापासून कोणाला त्रास होईल, कोरोनासारख्या महामारीचा प्रसार होईल असे वर्तन करु नका. मात्र, लोकं एकायला तयारच नाही. आज संगमनेरात 1 हजार 153 रुग्णांपैकी 400 ते 500 जणांना कोरोनाची बाधा लग्नामुळे झाली आहे. इतकेच काय.! अकोले तालुक्यात देखील 250 पैकी किमान 50 जणांना लग्न समारंभात कोरोनाची बाधा झाली आहे. म्हणजे तरी देखील लोकांना शहाणपण येईनासे झाले आहे. भलेभले अधिकारी व नेते चक्क बड्या लोकांच्या लग्नांना हजेर्‍या लावतात. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. हे कोणा एकाचे दु:ख नाही तर सर्वीकडे हेच दिसत आहे.

                               

आता आज मितीस संगमनेर तालुक्यात जवळपास 12 शे रुग्ण होत आले आहे. 22 जण मयत झाले आहेत. अशा परिस्थित लोक मरताक्षणी एकमेकांना स्पर्श करायला तयार नाही तर संगमनेर सारख्या ठिकाणी अशा पद्धतीचे लग्न पार पडावे.! हे दुर्दैव नाहीतर काय आहे? आता ज्या ठिकाणाहून वर्‍हाड आले आहे. त्या कोतुळ गावात आज 15 पेक्षा जास्त रुग्ण आणि एकदोन रुग्ण मयत झाले आहे. अशात जर कधी कोरोना देखील अक्षदा टाकण्यासाठी आला असेल तर? सगळ्या पाहुण्यांना पळता भुई थोडी होणार नाही का? संगमनेरात असेच एक लग्न पार पडले तर त्याचे परिणाम आजही संगमनेर भोगत आहे. इतकेच काय! कोतुळच्या जवळच ब्राम्हणवाडा आणि काळेवाडी येथे झालेल्या लग्नांमुळे कोरोनाने किती थैमान घातले हे जगजाहिर असताना कोतुळमधून वर्‍हाड निघावे हेच दुर्दैव असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशा पद्धतीने गुन्हा दाखल झाला हे दोन्ही तालुक्यातील पहिले उदा. आहे. त्यामुळे संगमनेर तालुका पोलिसांचे खरोखर कौतुक केले पाहिजे. कारण, यदा कदाचित जर हाच प्रकार अकोले तालुक्यात असता तर त्यावर राजकारण होऊन साप सोडून भूईच बडविली गेली असती. जसे काळेवाडीच्या नरवडे गृपबाबत पहावयास मिळाले. त्यामुळे खरंतर जाखुरी येथील दक्षता समितीने जी भुमिका घेतली ती महत्वाची ठरली आहे. त्यानुसार आता सहायक फौजदार ईस्माइल शेख यांच्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येणार्‍या काळात या कारवाईला वधु-वराच्या वरबाप वरमाईला सामोरे जावे लागणार आहे. तर हा गुन्हा म्हणजे येणार्‍या काळात सर्व समाजासाठी आणि गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्यांसाठी फार मोठी चपराख असणार आहे.