धक्कादायक.! अत्याचाराचा गुन्हा मागे घेत नाही म्हणून आदिवासी मुलीस पेटून दिले.! कागदावरचं नको, सन्मानानं जगण्याचे स्वातंत्र्य हवे.!


सार्वभौम (पारनेर) :- आज भारत स्वतंत्र होऊन 74 वर्षे झाली. तरी देखील येथील जातीयवाद आणि बुरसटलेली विचारधारा देशातून हद्दपार झाली नाही. अनेक थोर पुरुषांनी देशाला एका समांतर साचातबसविण्याचा प्रयत्न केला. म्हणूनतर बहुजनवर्ग सुसज्ज पद्धतीने जगताना दिसत आहे. अन्यथा काही नतदृष्ट लोकांनी येथील सामान्य जनतेचे किड्यामुंगीसारखे हाल केले असते. आजही दलित अत्याचार, महिला अत्याचार, बाल अत्याचार यांसारख्या भयानक घटना कानावर पडतात, तर डोंगर दरीत राहणारा आदिवासी समाज अजुनही शहरात आला नाही आणि आलाच तर त्याची हेटाळणी होते, एव्हना नकळत अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते. त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याऐवजी राजकीय व्यक्ती आणि प्रशासन देखील त्यांच्यावर दडपशाहीचा मार्ग अवलंबवितात. म्हणूनतर संविधानाने अ‍ॅट्रॉसिटी सारख्या कडक कायद्यांची निमिर्ती करण्यात आली, मात्र त्याचीही धार दिवसेंदिवस कमी करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे, देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे, मात्र येथील बहुजन समाज आजही पारतंत्र्यासारखे जीवन जगत असल्याचे दिसते आहे अशा प्रतिक्रीया शिकल्या सवरलेल्या व्यक्तींकडून येत आहे. तर त्याला प्रमाण म्हणून असे काही धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे, खरोखर देशातील दुबळे लोक स्वातंत्र्य उपभोगत आहे का? याचे उत्तर या गुन्हेगारीच्या माध्यमातून लक्षात येईल.

ती एक सविस्तर घटना अशी की, पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात एक आदिवासी कुटुंब राहते. तेथील एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी तिने पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्यावर वारंवार दबाव टाकला होता. मात्र, माझ्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे मला कायदेशीर न्याय हवा आहे असे म्हणत ही तरुणी तिच्या मतावर ठाम होती. त्यामुळे, आरोपी हे थेट या आदिवासी तरूणीच्या पालावर गेले आणि तिला बाहेर बोलावून तिच्या अंगावर पेट्रोल फेकून तिला पेटून दिले. यात या तरुणीच्या अंगावर असणार्‍या कपड्याला आग लागून तीन गंभीर रित्या भाजली आहे. यावेळी तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. हा प्रकार पोलिसांना समजला असता पोलीस उपाधिक्षक अजित पाटील पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार सुपा पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात राजाराम गणपत तरटे, अमोल राजाराम तरटे (रा. पळवे, ता. पारनेर) यांच्या विराधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                          
संबंधित घटना एकल्यानंतर खरोखर न्याय मागण्याचे धाडस पीडित व्यक्तींनी करावे की नाही. येथे इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होऊन 74 वर्षे झाली. मात्र, तेव्हाही अत्याचार सहन करावे लागत होते आजही तेच दिवस आहे. मग बदल का? असे प्रश्न सामान्य पीडित कुटुंब विचारत आहे. बडे लोक बडे होत गेले आहे तर गोरगरिब आजही दोन वेळच्या अन्नासाठी झटत आहे. येथे असंख्य मागासवर्गीय कुटुंबांच्या मुलभूत गरजा देखील पुर्ण होत नाही. जेथे आश्रय घ्यायला जावे तेथे भर दिवसा आब्रु वेशीवर टांगली जात आहे. नगर जिल्हा, नंदुरबार, पालघर अशा अनेक ठिकाणी आजही आदिवासी, दलित आणि संबंध बहुजन समाज न्यायापासून वंचित आहे. जर त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यासाठी न्याय मागितला असता असे पेटून देण्याचे प्रयत्न होत असतील तर ते पारतंत्र्य काय वाईट होते. त्यामुळे, येथील नागरिकांनी कोणाच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असे वागताना विचार केला पाहिजे. सामाजिक वातावरण दुषीत होईल असे वागणे टाळले पाहिजे. हे देश स्वतंत्र फार महान लोकांनी बलिदान केले आहे. त्यांचे कर्म व्यर्थ जाणार नाही याचा प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.