संगमनेरात चक्क एटीएम फोडले.! बँकांचे पैसे रामभरोसे.! गुन्हा दाखल, तपास सुरू.!
संगमनेर (प्रतिनिधी) :-
संगमनेर शहरात फ्लोरा टाऊन अपार्टमेंट येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या एटएममधील मुद्देमाल किती होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, तो सुरक्षित असून तेथील सीसीटीव्ही आणि सायरनची वायर तोडून मशिनचा हाँण्डलॉक तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना आज पहाटे 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास घडली. यात भलेही मुद्देमाल चोरी गेला नाही. मात्र, एटीएमवरील सुरक्षा आणि भुरट्या चोरट्यांचे धाडस हा मुद्दा पुन्हा शेरणीवर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून अद्याप त्यांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक संगमनेर रोडलगत फ्लोरा टाऊन अपार्टमेंट येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. त्यांनी एक गाळा घेऊन एटीएम स्थापन केले खरे. मात्र, त्याची सुरक्षा रामभरोसे ठेवली. त्यामुळे, म्हणजे पैसा कमविण्याच्या नादात जेव्हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा यांनी पोलीस प्रशासनाच्या बळाचा वापर करुन घ्यायचा. मात्र, त्यापुर्वी एखादा सेक्युरिटी गार्ड यांना का नेमता येत नाही? असा प्रश्न आम जनतेने उपस्थित केला आहे. कारण, जेव्हा रात्री -अपरात्री कोणी वाटसरु पैसे काढण्याच्या निमित्ताने एटीएममध्ये जातो. तेव्हा त्याची स्वत:ची सुरक्षा काय? त्याने पैसे काढल्यानंतर त्याला तेथेेच कोणी लुटले तर? अशा वेळी तेथे सेक्युरीटी असेल तर मोठा आधार असतो. म्हणजे या बँका सुविधा देतात मात्र सुरक्षा देण्यात अपयशी आहेत की काय? असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.आज दि. 31 ऑगस्ट रोजी पहाटे अज्ञात व्यक्तीने एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. आपला हा प्रकार सीसीटीव्हीत येऊ नये म्हणून त्याने सीसीटीव्हीचे तोंड दुसर्या बाजुला फिरविले, तर एटीएमचा सायरन बोंबा मारु नये म्हणून त्याची वायर कट करुन टाकली. त्यानंतर त्याने त्याच्याकडील लोखंडी रॉडने एटीएम मशिनच्या समोरील बाजुचा हुड लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुर्णत: तोडण्यात त्यास अपयश आले. त्यामुळे, त्याचा एटीएममधील पैशावर डल्ला मारण्यात अपयश आले आहे. हा प्रकार आज सकाळी उघड झाल्यानंतर बँकेच्या कर्मचार्यांना जाग आली व त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तेव्हा अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत व पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी घटनास्थळी घाव घेऊन पाहणी केली आहे. तर तपासी अधिकारी परदेशी यांनी पंचनामा केला आहे. त्यांनी सार्वभौमशी बोलताना सांगितले की, या एटीएमच्या बाहेर कोणतीही सेक्युरीटी नव्हती. सध्या गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.
तर आता जसजसे लॉकडाऊन शिथिल होत चालले आहेत, तसतसे अशा प्रकारचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत चालणार आहे. यापुर्वी नाशिक ते संगमनेर आणि संगमनेर ते बीड अशा मार्गांवर अनेकदा एटीएम फोडल्याचे प्रकार घडले आहेत. संगमनेर शहर, लोणी, राहुरी, नगर एमआयडीसी, नगर शहर आणि तालुका या मार्गावर अनेकदा एटीएम फोडल्याचे प्रकार झाले आहे. मात्र, नगर शहराच्या लागत नवनागापूर येथील घटना वगळता बहुतांशी गुन्हे हे कायम तपासावर आहेत. हा गुन्हा पाहता तो एखाद्या भुरट्या चोरट्याने केल्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. कारण, अट्टल गुन्हेगारांची एटीएम चोरीची मोडस पाहता हा चोरटा स्थानिक असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान पोलीस तपास सुरू झाला असून हा प्रकार कोणी केला, याची उकल झाल्यास सर्व प्रकार समोर येईल आशी आशा बाळगुया.!