सुशांतचे नखशिखांत प्रकरण आणि अस्थिर सरकार.! कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा? नक्की वाचा...

- सागर शिंदे

सार्वभौम (मुंबई) : सुशांत सिंह राजपूत याचा श्वास स्थिर झाला खरा मात्र, त्यानंतर राजकारणात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याची हत्या की आत्महत्या येथून प्रश्न उपस्थित झाले. तर तपासावर आक्षेप घेत "तरुण मंत्र्याच्या" भोवती संशयाचे धागेदोरो गुंडाळले गेले. आता यात वास्तव काय अवास्तव काय माहित नाही. पण, कोरोना, दुधदर, शेतमाल आणि बाधितांची होणारी लुट व गैरसोय या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊन सरकार अस्थिर कसे होईल आणि पुर्वी जशी इडीची बीडी करुन भल्याभल्यांचा धुर केला. हे प्रकरण त्याचाच एक भाग तर नाही ना? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. त्यामुळे, पहिले पाऊल म्हणून राज्य सरकारला हा तपास त्यांच्या अखत्यारीत ठेवण्यात अपयश तर आले म्हणून तर आता अनेकांची धाकधूक वाढली असून विरोधी पक्षाची ताकद आणि सीबीआयचा तपासात यांच्यातून कोणत्या "वादळाची निर्मिती" होते. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

          खरंतर "नाक दाबलं की तोंड उघडते" ही म्हण फार जुनी आहे. मात्र, तिचा राजकारणात पुरेपूर वापर केला जातो. त्याचे उत्तम उदा. म्हणजे गेल्या विधानसभेच्या वेळी असे बोलले गेले की, भाजपने अनेकांच्या फायली उघडल्या आणि "महाभरती" करत आज "आती तेथे माती" करून ठेवली. मात्र, प्रत्येक वेळी निशाणा योग्य ठिकाणी लागतो असे नाही. आनंद आणि आवेशाच्या भरात ते "बारामतीच्या पैलवानाला" हात देऊन बसले आणि एका "इडिच्या चौकटीत" त्यांना बसविण्याच्या प्रयत्नात "चारी मुढ्या चित" झाले. म्हणजे "एक चौकशी आणि एक पाऊस" यात सगळं राजकारण धुवून निघाले. त्यानंतर देखील त्यांनी दादांवर एक रातोरात "डाव" टाकूण पाहिला, मात्र या धुरंधर राजकारण्यानं असा एक "कैची" डाव मारला की बाजू पलटी करुन "तीन पैलावन" एकत्र केले आणि राज्याचा "आखाडा" उभा केला. त्याचा परिणाम असा झाला की, 105 गडी असून देखील सुटाबुटातला पाहुणा पण, आज "उपाशी मेला" अशी टिका भाजपवर होत आहे. मात्र, हे शल्य भल्याभल्यांना पचविता आले नाही. त्यानंतर अनेक "फुटातुटी" आणि "नाराजी नाट्य" आपल्याला पहायला मिळाले. मात्र, सरकार अजुनही स्थिर आहे.

आता या सरकारला "कोरोनाचे गतीरोधक" लागले खरे. मात्र, तरी मोठ्या जिद्दीने त्यांनी "राज्याचा झेंडा" लावून धरला. यात आता सगळ्यात मोठा खोडा निघाला तो म्हणजे सुशांत सिंह राजपूत या प्रकरणाचा. खरंतर जेथे सत्ता असते तेथे दबाव असतो हा नैसर्गीक नियम आहे, आणि त्यातल्या त्यात घरातला कोणी पिंजऱ्यात असेल तर पद प्रतिष्ठा पणाला लावून हस्तक्षेप होतो. हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे, मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार आणि सीबीआय यांच्यास बिहार पोलीस यातून ओढाताण होत राज्याचे राजकारण गढूळ झाले. खरंतर कोणी फार प्रांजळ व निरापराध असेल तर कोणतीही चौकशी असो, त्याला सामोरे जाण्यास हरकत नाही, असे नैतिकता सांगते. मात्र, सुशांतच्या प्रकरणाशी संबंधित अनेक पुरावे व सीसीटीव्ही फुटेज हे नष्ट करण्यात आल्याचे राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, यात नेमके काय "गौडबंगाल" आहे हे फार "गुलदस्त्यात" असून येणार्‍या काळात "राजकीय वर्तुळात" फार मोठा "भुकंप" होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. कारण, "सत्तासंघर्ष आणि संविधानाचे प्रशासकीय बळ" यात फार मोठी ताकद असते, ती केंद्राकडे असते. तर आता तरी एकहाती सत्तेमुळे दिल्ली झुकविण्याची कोणात ताकद आहे असे म्हटले तर ते केवळ एखाद्याच्या "फुग्यात हावा भरल्यासारखे" होईल. त्यामुळे, वास्तव काय हे प्रत्येकाला माहिती आहे.

       आता सुशांतच्या प्रकरणात "न्यायीभाव" कमी, परंतु त्याचे "राजकीय भांडवल" होऊ लागले आहे हे संपुर्ण जग पाहत आहे. तर या प्रकरणात प्रांजळपणा कमी आणि "राजकीय हस्तक्षेप" देखील वाढत आहे. तसेही बहुतांशी हत्याकांडांमध्ये सत्ताधारी तपासाला आपल्याला हवे तसे वळण देण्याचा प्रयत्न करत असता. म्हणून तर अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव हत्याकांडात एका राजकीय पक्षाने पोलिसांवर प्रचंड दबाव आणला होता. तेव्हा हतबल झालेल्या पोलिसांनी चक्क शासनाला पत्र लिहून सांगितले होते. की, "दबावापोटी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावे" तेव्हातर एक ना दोन त्यात तीनचार आमदार आणि भल्याभल्यांना आरोपी करण्यात आले होते. तर लांडे खून प्रकरणात देखील मोठा राजकीय हस्तक्षेप झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे, सत्ता असेल तर काहीही शक्य आहे अशीच काहीशी धारणा आजकाल होऊन बसली आहे. त्यामुळे, केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेवर डोळा ठेवून हा घाट तर घातला नाही ना? असा प्रश्न देखील अनेकजण उपस्थित करु लागले आहेत. आता जर ही कानोकान चाललेली बळाच्या वापराची चर्चा वास्तवात येत असेल तर सरकार नक्कीच अस्थिर होऊ शकते असे तज्ञाना वाटते आहे. तर सरकार कधी जाणार हे देखील काही विरोधी नेते खुलेआम बोलताना दिसत आहे.

खरंतर हे सरकार म्हणजे विभिन्न विचारांच्या तीन खांबासारखे आहे. तर चौथा विरोधी खांब यांच्या मुळावर वेगवेगळ्या मार्गाने घाव घालतो आहे. मात्र, जोवर एखादा "अस्मितेचा मुद्दा" आणि "चौकशीच्या भोवर्‍याचे प्रकरण" गळ्याशी येत नाही तोवर सरकारला भिती नाही. मात्र, दुर्दैवाने असे झालेच तर अशा वेळी हाताच्या पंजाला कोणाचा आधार राहणार नाही. ना ते कोणाला आधार देण्याच्या आवस्थेत राहतील. तेव्हा त्यांची भुमिका निव्वळ बघ्याची असेल. तर तेव्हा मात्र, बारामतीचे धुरंधर 1978 ला भाजपला साथ देऊ शकतात तर आज का नाही? त्यामुळे त्यांच्या राजकारणावर एक तप अभ्यास केला तरी ते पुर्ण होऊ शकत नाही हे देखील तितकेच वास्तव आहे. मात्र, आजकाल त्यांच्या डोक्यात नेमके काय शिजते आहे देव जाणे. कारण, त्यांनी ज्या तरुणाला संसदेत पाठविण्यासाठी लोकसभेचे तिकीट दिले. त्याच पार्थ यांच्या सुशांतच्या तपासावर सीबीआयचे भाष्य केल्यानंतर त्यास अपरीपक्व ठरविले. पण, सुदैव म्हणा की दुर्दैव परंतु तो तपास चक्क सीबीआयकडे गेला आणि त्यानंतर पार्थ यांचे सत्यमेव जयते ट्वीट खूप काही बोलून गेले. म्हणजे पार्थ हे बालबोध किंवा अपरिपक्व नक्कीच नाहीत. त्यांना यात काही धागादोरा वाटला असेल, म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले असावे असा अंदाज आता लावला जात आहे. त्यानंतर मात्र, हा तपास, राजकारण आणि सरकार राहिले बाजुला. परंतु पवार कुटुंबातील मतभेद यावर मात्र माध्यमांनी मोठी पोथीपुरण उभे केले.

           आता सुशांतचा तपास काय वळण घेईल याचा अंदाज बहुतांशी लोकांना आहे. कारण, राजकारणाची "मोडस" आता बर्‍यापैकी अंगवळणी पडली आहे. सध्या यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही. मात्र, सरकारने ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण, दुधाचे प्रश्न, कोविडचा प्रतिबंध व अस्थिर झालेले राज्य स्थिर करण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजे. राजकारणातील काही लोक उगच सुशांतच्या आत्महत्येची चर्चा करून सरकारमधील नेत्यांना बागुलबुवाची भिती घालून देत आहेत. याचा तोटा म्हणजे सरकारमधील मंत्र्यांचे लक्ष वेधून त्यात रस वाढवत आहेत. त्यामुळे, शेतकरी, विद्यार्थी, पॉझिटीव्ह रूग्ण, रोगावरील उपायोजना, मजुरांचा प्रश्न आणि शेती संसाधणे अशी अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणून तर दोन दिवसांपुर्वी राजू शेट्टी म्हणाले होते की, सुशांतच्या आत्महत्ये इतकी चर्चा जर दुधावर आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावर झाली असती तर आज या ज्वलंत प्रश्नावर कायमचे उत्तर निघाले असते, आणि होय.! तेच खरे आहे. सुशांतचे नखशिखांत प्रकरण याने सरकारमधील लोक अस्थिर झाले असून त्याचा तोटा मात्र आज सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी यांना बसत आहे असे मत जाणकार व्यक्तींनी सार्वभौमकडे मांडले आहे. ही एक खंत असली तरी येणाऱ्या काळात काय होते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

- सागर शिंदे

--------------------------------------

 80 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 450 दिवसात 720 लेखांचे 86 लाख वाचक)