अरे देवा.! पुन्हा अकोले तालुक्यात शालेय मुलीचे अपहरण करुन अत्याचार.! दोघांना अटक, दोन अधिकार्‍यांनी कायकाय करायचे.!


सार्वभौम (अकोले)- अकोले तालुक्यातील खिरविरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या परिसरात राहणार्‍या एका शालेय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कलमान्वये एका महिलेसह दोन तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवा सुभाष सदगीर व अनिल सदगीर असे आरोपी करण्यात आलेल्या दोघांचे नावे आहेत. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासांत अकोले पोलीसांनी दोघांनाही मुंबईतून अटक केली आहे. त्यामुळे काल ब्राम्हणवाडा तर आज खिरविरे असे दोन गुन्हे दाखल झाले असून त्यांची उकल करण्यात अकोले पोलिसांना यश आले आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील खिरविरे परिसरात राहणार्‍या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने एक धक्कादायक माहिती पोलिसांना सांगितली. त्यात तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी देवा सदगीर याने पीडीत मुलीस प्रेमाची भुरळ घातली व तिला वेगवेगळया प्रकारचे आमीष दाखवून अत्याचार केले. तर तिची इच्छा नसताना तिला दुचाकीवर घेऊन थेट ठाणे जिल्हयातील शहापूर गाठले. हे काम करताना त्यास अनिल बेनके याने मदत केली. असे पीडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तर हा गुन्हा दाखल होताच पोलीस उपअधिक्षक रोशन पंडीत व पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक ढोमणे यांनी तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी खिरविरे, अकोले, संगमनेर, पुणे व मुंबई अशा विविध ठिकाणी चौकशी सुरू केली. तर आरोपीचे ठाणे जिल्हयातील शहापूर येथील लोकेशन मिळताच काल दोघांना अटक केली आहे. 

दरम्यान, आरोपी देवा हा त्याच्या नातेवाईकाकडे ये-जा करत असेे. तेव्हा त्याच परिसरात असणार्‍या एका मुलीशी त्याने मैत्री केली होती. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संपर्क होत होता. मात्र, देवा याने पीडित मुलीस एका मंदीराच्या परिसरात अत्याचार केला. तर काही दिवसानंतर त्याने अनिलच्या मदतीने पीडित मुलीस एका दुचाकीवर शहापूर येथे नेऊन देवाने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे, तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अपहरण करुन अत्याचार अशा प्रकारचे कलम लागले आहे. कारण, तसे न्यायालयाचे निर्देश आहेत. आत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दोघांना अवघ्या 12 तासात अटक करण्यात यश आले आहे.   

दरम्यान, अल्पवयीन मुलींना पळविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लग्नाचे अमिष दाखविणे, चैन करण्याचा मोह आणि प्रेमाची भूल घालून शालेय मुलींचे अपहरण होण्याचे प्रकार जास्त वाढू लागले आहे. तर, लॉकडाऊनमुळे जे प्रेमाच्या जाळ्यात गुंतलेले मजनू आता बाहेर पडू लागले असून त्यांचे उफाळू आलेले प्रेम त्यांना गुन्ह्यात अडकण्यास सहाय्यभूत ठरत आहे. मात्र, त्याची डोकेदुखी पालकांना सहन करावी लागत आहे. आता संगमनेर शहरात देखील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत मोमीनपुरा परिसरात राहणार्‍या 17 वर्षीय मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला आहे. लवकरच आम्ही मुलीचा शोध लावू अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.          

                 अकोले तालुक्यातील कारखाना रोड परीसरातील शिवसेना नेते शिवाजीराव शेटे यांचे वडील स्व. विठ्ठल सखाराम शेटे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, 1 मुलगी, तीन सुना, नातवंडे, असा मोठा परीवार आहे.  त्यांच्या अंत्यविधीसमयी राजकीय सामाजिक, शैक्षणिक'  क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
दरम्यान एक महत्वाची गोष्ट म्हणजे, अकोले पोलीस ठाण्यात किमान शंभर ते दिडशे कर्मचार्‍यांची गरज आहे. असे असताना येथे तोडक्या पोलीसांवर पोलीस ठाणे रन करताना अधिकार्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. येथे केवळ एका पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक अशा दोन अधिकार्‍यांवर पोलीस ठाण्याची धुरा उभी आहे. यात तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अकोले पोलीस ठाण्याचा सीआर 495 पर्यंत जाऊन पोहचला आहे. तरी देखील केवळ दोन पोलीस अधिकारी हा कठीण गाडा आपल्या परिने ओढताना दिसतात. तर येथे स्वत: पोलीस निरीक्षक मोठे गुन्हे स्वत: तपासासाठी घेतात तर त्यांची उकल देखील करतात. त्यामुळे त्यांची मोठी कसरत होताना दिसत आहे. तर याचाच फायदा घेत काही कर्मचारी उद्रव करत पोलीस ठाण्याचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर काही पोलीस अधिकार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून तर येथे मोठे ऑफेन्स घडून देखील त्याचा उलगडा झाला आहे आणि काहींचे दोषारोपत्र देखील सादर झाले आहे. एकीकडे, येथील मोर्चे आंदोलने, समाजभिमुख आमदार, वाढती गुन्हेगारी आणि दिवानी दाव्यांचे वाद यांची मोठी वर्दळ आहे. तरी देखील येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येथे आजवर निर्माण झालेला नाही. त्यामुळे, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत यांनी विशेष अहवाल तयार करुन किंवा क्राईम मिटींगमध्ये असा विषय उपस्थित करुन पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंग यांच्याकडे येथे अधिकारी वाढविण्याचे व मनुष्यबळ पुरविण्याची विनंती करणे अपेक्षित आहे. तर येथील लोकप्रतिनिधी म्हणून आ. डॉ. किरण लहामटे यांनी पोलीस अधिक्षक किंवा गृहमंत्र्यांशी बोलून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. असे झाल्यास अधिकार्‍यांचा मानसिक व शारिरीक त्रास कमी होईल व त्यांना जानतेसाठी जास्त वेळ मिळेल.