गुड न्युज.! अकोल्यात शंभर बेडचे कोविड सेंटर.! बॅड न्युज एक मयत आणखी तीन रुग्ण, तर संगमनेरात 48 तासात 55 रुग्णांची भर.!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. येथे गेल्या 48 तासात 55 रुग्णांची भर पडली आहे. तर आज 19 रुग्ण नव्याने मिळून आल्याची माहिती हाती आली आहे. तसेच अकोले तालुक्यात देखील कारखाना रोड येथे राहणार्या 71 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने जीव घेतला आहे. त्यामुळे येथे आजवर मयतांची संख्या नऊ झाली असून 326 बाधित मिळून आले आहेत. तर आज नव्याने अमृतनगर नवलेवाडी येथे 76 वर्षीय पुरूष तर हिवरगाव येथे 58 वर्षीय 58 वर्षीय पुरुष तसेच कळस येथे 38 वर्षीय पुरुष अशा तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, जसजसे स्वॅब घेणे कमी झाले आहे. तसतशी कोरोनाची आकडेवारी देखील कमी होत चालली असल्याचे लक्षात येऊ लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले शहराच्या लागत असणार्या कारखाना रोड येथे कोरोनाचा पहिला प्रादुर्भाव झाला. त्यानंतर तेथे जवळ-जवळ शतकभर रुग्ण मिळून आले. त्यानंतर अनेकांना आपला जीव गामवावा लागला आहे. तर त्याच प्रवाहाची आज पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे. कारण, येथे 71 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला आहे. त्यांना 15 ऑगस्ट रोजी बाधा झाल्याचे समोर आले होते त्यामुळे त्यांना संगमनेरच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांनी अखरेचा श्वास घेतला आहे. तर या पलिकडे आणखी तीन व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत त्यात नवलेवाडी, कळस व हिवरगाव आंबरे येथील व्यक्तींचा सामावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 326 वर जाऊन पोहचली आहे.
तर अकोले तालुक्याचे व सह्याद्रीचे भूषण ठरलेल्या अगस्ति सहकारी साखर कारखाना प्रशासनाने एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. तालुक्यात जे कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अकोले देवठाण रोडवर मार्केट यार्डच्या जवळ जे विठ्ठल लॉन्स आहे. तेथे 100 बेड आणि जेवणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे, हा तालुक्यासाठी उशिरा का होऊना परंतु महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यापुर्वी प्रशासनाने योग्य नियोजन केले असते तर सुगाव खुर्द येथे जे आरोग्य केंद्र उभे करण्यात आले होते. अशा काही सरकारी इमारती ताब्यात घेऊन दानशुरांची मदत घेतली असती तर खानापुर येथे जी गैरसोय होती ती टळली असती. मात्र, येणार्या काळात देखील अशी यंत्रणा उभी केली तर बाधितांच्या मानसिकतेत फार मोठा बदल होण्यास मदत होणार आहे. इतकेच काय! लोक कोविडने नव्हे तर पॉझिटीव्ह आल्यानंतर आणि तेथील परिस्थिती पाहून निम्मे हदरुन जातात. आता सुसज्ज आणि स्वच्छ कोविड सेंटरमुळे अकोल्याचा मृत्युदर कमी होण्यास फार मोठा हातभार लागणार आहे. तर कारखान्याच्या या निर्णयाचे जनतेने कौतुक केले असून संचालक मंडळ व एमडी घुले यांचे अनेकांनी आभार मानले आहे. येत्या आठ दिवसात ही सुविधा जनतेच्या सेवार्थ उभी करण्यात येणार आहे.
तर अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळेलेल्या अहवालानुसार आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार ६४७ इतकी झाली आहे तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०८ टक्के इतकी झाली आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६५० ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ०७९ इतकी झाली आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११९, अँटीजेन चाचणीत ३१४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१७ रुग्ण नव्याने बाधित आढळले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७९, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण १७, कॅन्टोन्मेंट ०५, नेवासा ०१, श्रीगोंदा ०४, पारनेर ०३, शेवगाव ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजन चाचणीत आज ३१४ जण बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये, मनपा ५४, संगमनेर १७, राहाता २२, पाथर्डी ११, नगर ग्रामीण ६०, श्रीरामपुर २९, कॅंटोन्मेंट ०८, नेवासा ०७, श्रीगोंदा १६, पारनेर १३, राहुरी ०७, शेवगाव ०७, कोपरगाव २२, जामखेड २८ आणि कर्जत १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अकोले तालुक्यातील कारखाना रोड परीसरातील शिवसेना नेते शिवाजीराव शेटे यांचे वडील स्व. विठ्ठल सखाराम शेटे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, 1 मुलगी, तीन सुना, नातवंडे, असा मोठा परीवार आहे. त्यांच्या अंत्यविधीसमयी राजकीय सामाजिक, शैक्षणिक' क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. त्यामध्ये, मनपा १३१, संगमनेर १४, राहाता ०८, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण २०, श्रीरामपुर ०८, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा ०४, पारनेर १६,अकोले ०३, राहुरी ०४, जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज एकूण ५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मनपा १५९, संगमनेर ३८, राहाता २६, पाथर्डी २९, नगर ग्रा. ४८, श्रीरामपूर १४, कॅन्टोन्मेंट ०८, नेवासा २५, श्रीगोंदा १५, पारनेर २७, अकोले ०७, राहुरी १४, शेवगाव ३५, कोपरगाव १५, जामखेड २६, कर्जत ३५ मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आता बरे झालेली रुग्ण संख्या आता ११ हजार ६४७ इतकी झाली आहे. तसेच उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ३ हजार ०७९ असून १९१ जणांचा आजवर मृत्यू झाला आहे. तर एकूण रूग्ण संख्या १४ हजार ९१७ वर जाऊन पोहचली आहे.