प्रेमविवाह केला म्हणून दरवाजा तोडून मारहाण.! जोडपं पसार, कुटुंबाला त्रास, मुलीच्या मामावर गुन्हा दाखल! संगमनेरातील घटना!


सार्वभौम (संगमनेर) :- शासन एकीकडे अंर्तजातीय विवाह आणि दोघांच्या मनपसंत जोडप्यांना कायदेशीर संरक्षण देत आहे. असे असताना संगमनेर तालुक्यातील मुंजेवाडी अकलापूर परिसरात एका तरुणाने प्रेमविवाह केला म्हणून त्याच्या घराचा दरवाजा तोडून मुलीच्या मामाने प्रियकराच्या घरातील महिलेस मारहाण केली. ही घटना बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात दत्तात्रय भिकाजी निमसे व भागाजी निमसे (रा. येलखोप, ता. संगमनेर) असे दोघांना आरोपी करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंजेवाडी येथे राहणार्‍या अजितने आळेफाटा येथे एका कॉलेजला शिकणार्‍या मुलीसोबत प्रेम केले होते. त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता. मात्र, या निर्णयास दोन्ही घरच्यांचा नकार होता. कालांतराने अजितचे कुटुंब मान्य झाले. मात्र, मुलीचे कुटुंब या विवाहास राजी नव्हते. परिणामी या दोघांनी  पुणे तालुक्यात त्यांच्या पद्धतीने हा विवाह अटपून घेतला. या दोघांची मने जुळली, मात्र दोन कौटुंबिक नाते जुळली नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील दरी अधिक खोल होत गेली. त्यामुळे, मुलीच्या मामांना या प्रकाराचा राग होताच त्यांनी थेट मुलाच्या घरी जाऊन दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि अंजाबाई काशिद यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर तुमच्या मुलगा कोठे आहे? त्यास आम्ही ठार मारु असे म्हणत ते निघून गेले. याप्रकरणी उपरोक्त दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मुलांच्या एका अविचारी निर्णयामुळे पालकांना किती त्रास होतो. याचा प्रत्येक व्यक्तींनी विचार केला पाहिजे. समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज नेहमी सांगतात की, तुम्ही प्रेमविवाह नक्की करा. पण, आधी स्वत:च्या पायावर उभे रहा. स्वत:ला सिद्ध करुन दाखवा, दोन्ही व्यक्ती समसमान शिक्षित असले पाहिजे, त्यांच्या घरच्यांना त्यांनी विश्वासात घेतले पाहिजे. कारण, तुमच्या दोघांच्या भावनेपोटी अनेकांची मने वाईट होत असेल किंवा मतभेद आणि मनभेद होत असेल तर ते प्रेम काय कामाचे? त्यामुळे अशा गोष्टी करताना प्रत्येकाने समाजाचा सोडा, परंतु दोन्ही कुटुंबाचा आणि त्यांच्या मानसिकतेचा तरी विचार केला पाहिजे अशी प्रतिक्रीया प्रशासकीय व्यक्तींनी दिली आहे.

आता याप्रकरणात दोन्ही मुले सक्षम असून सुशिक्षित आहे. यांची कोठेही मिसिंग नाही, घारगाव किंवा आळेफाटा येते नोंद नाही. यांचे वय लग्नाच्या पात्रतेचे असल्यामुळे त्यात पोलिसांचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही. आता मुलीच्या शोधासाठी तिच्या घरच्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र, अशा पद्धतीने कोणी एखाद्या कुटुंबाला मारहाण करीत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.