पोलीस माझे काही वाकडे करीत नाही असे म्हणत मतीमंद मुलास बेदम मारहाण! कळस येथे...पणाचा कळस!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील कळस येथे ...पणाचा कळस झाल्याची घटना समोर आली आहे. एका मतीमंद मुलाची वारंवार टिंगल करु नको असे म्हणाल्याचा राग येऊन एका व्यक्तीने त्यास स्टिलसारख्या पाईपाने बेदम मारहाण केली. तर मुलास सोडविणार्या आई-बहिनीला देखील शिवीगाळ. दमदाटी करण्यात आली. इतकेच काय! पोलीस माझे काही वाकडे करीत नाही. पोलीस ठाण्यात गेलात तर तुमच्या कुटुंबाचा खात्मा करुन टाकू अशी धमकी देण्यात आली. हा प्रकार सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी प्रितम बाळासाहेब गवांदे (रा. कळस बु, ता. अकोले) यांच्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात मारुती भिमाजी गवांदे (रा. कळस) यास आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रदिप गवांदे हा कळस बु येथील रहिवासी असून तो मतीमंद मुलगा आहे. असे असताना त्यास आधार देण्याऐवजी आरोपी मारुती गवांदे हा नेहमी त्यास हिनवत असे. हा वारंवार होणारा प्रकार त्याची आई, बहिन यांना सहन होत नव्हता. दरम्यान सोमवारी सायंकाळी 6 वाजता ते शेतातून घरी आले असता मारुती गवांदे हा प्रदिपची टिंगल-टवाळी करीत होता. त्यावेळी प्रदिपच्या आईला आपल्या मुलाची होणारी टिंगल सहन झाली नाही. त्यामुळे त्या माऊलीने मारुती यास समजून सांगितले की, तो शरिराने व मनाने अपंग आहे त्याची टिंगल-टवाळी करु नका. या बोलण्याचा मारूतीराव यांना फार राग आला त्यांनी थेट शिवीगाळ दमदाटी सुरू केली. मात्र, प्रदिपच्या आईने त्यास सांगितले की, जर आता यापुढे तू आम्हाला त्रास दिला किंवा माझ्या मुलाची टिंगल टवाळी केली तर मी पोलीस ठाण्यात जाऊन तुमची तक्रार करील.
त्यामुळे आरोपीस राग अनावर झाला आणि त्याने एका पवार नामक व्यक्तीच्या हातातील स्टील सारखा पाईप घेऊन प्रदिपला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच्या पाठीवर आणि पायांवर मारत असताना त्याच्या आईने व बहिनीने त्यास सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनाही मारुती गवांदे याने शिवीगाळ, दमदाटी करत म्हणाला की, तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या.! पोलीस माझे काही वकडे करत नाही. मात्र, तुम्ही पोलीस ठाण्यात गेलात तर तुमच्या कुटुंबाचा मी खात्मा करील अशी फिर्याद प्रितम गवांदे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोरडे करीत आहेत.