भैय्या..भैय्या..भैय्या निनाद स्थिरावला! शिवसेनेच्या वाघाची डरकाळी अनंतात विलीन! अनिल भैया राठोड यांना भावपुर्ण श्रद्धांजली!
सार्वभौम (अहमदनगर) :-
जातीवंत शिवसैनिक म्हणजे काय, याचे ज्वलंत आणि जिवंत उदा. म्हणजे आज (दि. 5) रोजी काळाच्या पडद्याआड विलीन झालेले माजी मंत्री अनिलभैय्या राठोड होय.! प्रखर हिंदुत्ववाद, बाळासाहेबांचे निष्ठावंत, जनतेच्या मनातील आमदार, सामान्य जनतेचा आवाज, धार्मिक अस्मितेचा पुरस्कर्ता आणि ज्याच्या धमन्यांमध्ये लाल नाही तर भगवे रक्त वाहत होते त्यांचे नाव म्हणजे भैय्या होय. समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्याने डरकाळी फोडली तर भल्याभल्यांना घाम फुटायचा असे नाव भैय्या! जीव गेला तरी बेहत्तर पण भगव्याची अस्मिता जपणारा माणूस, अगदी शुन्य मानसाला लाखोंची किंमत देणारा माणूस, सामान्य मानसांच्या उरावर आलेले संकट स्वत:च्या शिरावर घेणारा माणूस म्हणजे भैय्या. खरंतर गेली कित्तेक दशकं अहमदनगरच्या तख्तावर दिमाखात बसून डरकाळी फोडणारा हा वाघ आज शांत झाला आहे. वास्तवत: त्यांच्या देहाची राख होऊन या नगरच्या मातीत विलीन होईल. पण, सण उत्सवात भैय्या..., भैय्या..., भैय्या...हे नाव नगरच्या अगदी कानाकोपर्यात सदैव गुंजत राहिल आणि जेव्हा कधी नगरच्या अस्मितेचे शिलालेख कोरले जातील तेव्हा शिवसैनिक अनिल भैय्या राठोड यांचे नाव नक्कीच सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल यात तिळमात्र शंका नाही.
खरंतर मी एक क्राईम पत्रकार म्हणून नगर जिल्ह्यात काम केले. पोलीस आणि महसूूल खात्याला अगदी जवळून अभ्यासले आहे. त्या दरम्यान जेव्हाकधी अनिल भैय्यांशी संपर्क आले ते फक्त आणि फक्त पोलीस यंत्रणेसोबत. त्यातील काही आठवणी आज फार प्रकर्षाने डोळ्यासमोर चलचित्रासारख्या दरवळत आहेत. आज भैय्या आपल्यात नाहीत. मात्र, त्यांच्या स्मृती ह्या नगर शहरातून कधीही हद्दपार होऊ शकत नाही हे तितकेच वास्तव आहे. कारण, एक पावभाजी विक्रेता ते राज्यमंत्री आणि सलग पाच वेळा आमदार होणे ही सोपी गोष्ट मुळीच नाही. त्यामुळे, अखेरच्या श्वासापर्यंत मातोश्रीशी निष्ठा राखणार्या या हिंदुत्ववादी शिवसैनिकास विनम्र अभिवादन.!
सन 2015-16 चा कालावधी असावा सकाळी 11 वाजून गेले होतेे. मी आपला कामानिमीत्त एसपी कार्यालयात गेलो. तेव्हा तेथे मोठी गर्दीची झुंबड दिसून आली. मी गर्दीच्या दिशेने पुढे सरकलो आणि एका पोलीस कर्मचार्यास विचारले काय भानगड आहे? त्यावर तो उत्तरला एका वृद्धाला वाहतूक शाखेसमोर पोलिसाने मारले त्यामुळे ही गर्दी जमा झाली आहे. त्यानंतर मी एसपी साहेबांच्या केबीनमध्ये गेलो. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधिक्षक लखमी गौतम सर होते. "क्यों भाई, कहो क्या हाल हैं!" त्यांनी मला विचारले. त्यावर मी उत्तरलो. आता माझे सोडा तुमचे हाल होणार आहे. क्यों.! म्हणताच अनिल भैय्या राठोड यांचा ताफा आत दाखल झाला. त्या जुन्या कार्यालयात गर्दीच गर्दी झाली. मी आपला एका कोपर्यात उभा होतो. भैय्यांनी एसपींना पाहिला जाब विचारला, "पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी आहेत की जनतेला मारहाण करण्यासाठी आहेत"? त्यावर एसपींनी उत्तर दिले. "बेवजह पोलीस किसीपे हाथ नाही उठा सकते"! जो भी हैं उसकी इन्कॉयरी करेेंगे, जो गलत होगा उसपर कारवाई करेंगे! आता येथे विषय संपेल असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. सामान्य जनतेवर झालेला अन्याय राठोड यांना सहन झालाच नाही. त्यामुळे त्यांचा पारा चढत गेला आणि एसपी व भैय्या यांच्यात खडाजंगी झाली. ती इतकी की, भैय्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर तो वाद भरपूर दिवस सुरू होता. त्याचे वृत्तांकन मी केला होते. तेव्हा दोन्ही बाजू मांडल्यानंतर मला "शिवायलयातून" फोन आला. भैय्यांना तुमच्याशी बोलायचे आहे. तेव्हा भैय्यांशी संभाषण झालेला तो माझा "पहिला प्रसंग" होता. त्यांनी तीच घटना मला पुन्हा कथन केली आणि दोन्ही बाजू मांडल्यामुळे माझे कौतुक देखील केले. म्हणजे अगदी सामान्य व्यक्तीसाठी आयपीएस अधिकार्यांशी पंगा घेणारा हा "लोकनेता" होता. तर चांगल्या कामांचे कौतुक देखील त्यांच्याकडून होत होते.
या पलिकडे स्वत: भैय्या विसरतील किंवा नगरकर विसरतील मात्र, मी असे "वृत्तांकन आणि राजकारण" कधीच विसरु शकत नाही. असे प्रसंग मी नगरच्या राजकारणात अनुभविले आहेत. खरंतर नगरचा मोहरम, शिवजयंती आणि गणपती उत्साह याला राज्यात तोड नाही. नगरचा मोहरम म्हणजे अगदी कोणत्या क्षणी दंगल होऊ शकते हे सांगणे कठीण! शिवजयंती म्हणजे संगळा दंगाच दंगा आणि फुल जल्लोषही तर गणपती म्हणजे एकीकडे धार्मिक अस्मिता तर दुसरीकडे राजकारण.! या सर्व गोष्टी तात्वीक व नैतिक दृष्ट्या फार धार्मिक आणि अगदी संस्कृतीला व संस्काराला धरुन आहेत. मात्र, दंगलीमुळे नगर पुरते बदनाम झाल्याचे अनेकदा आपण पाहिले आहे. ऐरव्हीचा तणाव आपण बाजुला सारू मात्र, गणेश उत्सवाची मजा आणि त्यातील "राजकीय जुगलबंदी" काही औरच असते.
एकदा नाही, प्रतिवर्षी नगर शहरात 14 मानाचे गणपती असतात. त्यांची मिरवणूक मंगलगेट ते दिल्ली नाका अशी ठरलेली असते. तेव्हा खरे विरोधी पक्ष आणि शिवसेना यांची "राजकीय दंगल" पहायला मिळत असे. कारण, रात्री 12 नंतर पोलीस "डिजे" वाजून देत नसे. कोणत्याही प्रकारचा "माईक आणि मोठा आवाज" होणार नाही याची पोलीस दक्षता घेई. त्यामुळे शिवसेनेचे मंडळ रात्री 12 वाजण्याच्या आत म्हणजे किमान 11:30 वाजता तरी नेता सुभाष चौकात आले पाहिजे, जेणेकरुन अनिलभैय्या राठोड हे त्या चौकात मोठी सभा घेऊन जनतेला संबोधित करतील असे नियोजन ठरलेले असत. मात्र, जसे विरोधीपक्षात तरुण नेतृत्व उभे राहिले, तेव्हापासून त्यांनी या परंपरेला खंड कसा पडेल असा "राजकीय स्टण्ट" सुरू केला. अर्थात हा वाद नव्हे तर एक प्रकारचे कावे आणि सौम्य राजकारण होतेे. या मिरवणुकीत कधी कोणाला मारहाण झाली नाही किंवा दंगल झाली असे मला तरी आठवत नाही. त्यामुळे हे राजकारण काही गैर नाही. मात्र, ते पाहताना काळजाचा ठोका चुकत असे.
खरंतर शिवसेनेचा गणपती म्हटलं की, भगवा गुलाल, मोठमोठे झेंडे, भलामोठा डिजे आणि समोर गर्दीच गर्दी. त्यात "बनाऐंगे मंदीर" आणि "रामजीकी निकली सवारी" हे गाणे लागले की नाचणार्यांच काय! आमच्या देखील अंगात यायचे. अनिल भैय्या जर कधी मंडळाकडे आले की, भयानक जयघोष व्हायचा, भैय्या..., भैय्या..., भैय्या... अशा आवाजाने कापडबाजार दणाणून जायचा. तर शिवसेनेच्या अगदी पुढेच विरोधकांचे मंडळ असायचे. दोघांच्या डिजेची आणि कार्यकर्त्यांची मोठी चढाओढ असायची. कधी वातावरण तंग होई तर कधी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निर्माण होई, पण 12 वाजेपर्यंत तसूभर गर्दी हाटत नसायची. विरोधकांच्या डोक्यात एकच गणित असे, 12 वाजण्यापुर्वी आपण नेता सुभाष चौक ओलांडायचा नाही. म्हणजे आपोआप सभा उघळली जाईल तर शिवसैनिक 12 वाजण्याच्या आत या चौकात जाण्यासाठी धडपड करीत असे. मात्र, विरोधक त्यांना ना पुढे जाऊन देत ना ते स्वत: पुढे जात. यात खर्या अर्थाने पोलिसांची इतकी कोंडी होत असे की, त्यांना "तोंड दाबून बुक्क्यांची मारा" सहन करावा लागत असे. जर फारच अती झाले तर पोलिसांना नकळत "बळाचा वापर" करावा लागत असे. खर्या अर्थाने जेव्हा ही मंडळे नव्या पेठेत येई तेव्हा सगळ्यांना मोठी कसरत करावी लागत असायची. अगदी काही मिनिटे आणि काही सेकंद गृहीत धरुन ढकलाढकली होत असे. जेव्हा कधी 12 वाजण्यास पाच मिनिट बाकी असेल किंवा बारा वाजून गेले की मग चितळेरोडवर विरोधकांचा गणपती उतरत असे. नेता सुभाष चौकात जेव्हा शिवसेनेचा गणपती येई तेव्हा 12 वाजायला अवघे काही मिनिट बाकी असायचे तोवर आरती आणि प्रसाद यात उरलेला वेळ निघून जायचा आणि आरती होते कोठे नाहीतर पोलीस डिजे जप्त करण्यासाठी सज्ज व्हायचे.
असे असले तरी तेथे शिवसेनेची एक नवी ओळख होती. शहरावर त्यांचे राज्य होते. सामान्य मानसांना एक न्यायाची अपेक्षा होती भैय्या म्हटलं की एक आपुलकी आणि आधार वाटायचा. त्यामुळे, खर्या अर्थाने तेथे बिना माईकचा जो भैय्या..., भैय्या..., भैय्या...असा आवाज घुमायचा त्याची मिजास आणि धार फार रुबाबाची असायची. भैय्या एका व्यासपिठावर उभे राहून शिवसैनिकांना बिना माईक अन खड्या आवाजाने संबोधित करायचे, इतकेच काय! विरोधकांचाही चांगलाच खरपूस समाचार घ्यायचे. दुसर्या दिसशी त्यांनी केलेली टिका ही आमच्यासाठी "ब्रेकींग बातमी" असायची. हा गणेशोत्सवातील हा प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी नवी पेठ, चितळेरोड आणि नेता सुभाष चौकात तोबा गर्दी असायची. तर श्रीगणेशाचे विसर्जन भलेही त्या बारवात होत असेल. परंतु राजकीय दृष्ट्या बाप्पाचे विसर्जन नेता सुभाष चौक पार केल्यानंतरच होत होते.
- सागर शिंदे