चक्क 39 जणावरे व 10 लाखांचा मुद्देमाल जप्त.! संगमनेर पोलिसांची कामगिरी

सार्वभौम (संगमनेर) :

                         संगमनेर शहरात गणेश उत्सव सुरू असता पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी एक मोठी कारवाई केली आहे. आज तब्बल 39 जणावरांची कत्तल होण्यापासून त्यांनी मुक्तता केली आहे. त्यामुळे, या कारवाईचे आज अनेकांनी कौतुक केले आहे. शनिवार दि. 22 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जमजम कॉलनी येथे ही कारवाई करण्यात आली. यात 9 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अब्दुल वाहीद अब्दुल करिम कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सचिन कचरु उगले यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरात अनेक ठिकाणी बेकायदा कत्तलखाने सुरू असतांना वेगवेगळ्या उत्सवांच्या काळात त्यांच्यावर कडक कारवाई सुरू असल्याचे दिसते आहे. नगर सारख्या ठिकाणी सर्जेपुरा येथे गणेश मुर्तीच्या समोर कोणीतरी मांस टाकून खोडसाळपणा केला होता. त्यामुळे, दोन गटात वातावरण तापले होते. तेव्हापासून पोलीस कायदा व सुव्यवस्था आणि दोन गटात तणाव होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेत असतात. अर्थात संगमनेरात असे प्रकार आजवर कधी झाले नाही. मात्र, अनावधानाने असे काही घडू नये म्हणून पोलीस प्रशासन अगदी सज्ज असते. म्हणून तर पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी गस्त वाढविली असून  त्या दरम्यान त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी जमजम कॉलनी येथे धाव घेत मोठी कारवाई केली आहे.                 

शनिवारी रात्री त्यांना मिळालेल्या माहितीनुसार एक पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे आरोपी कुरेशी याने त्याच्या वाड्यामध्ये 39 जीवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने कोंडून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांच्या पथकाने या जनावरांबाबत माहिती विचारली असता त्याने उडवाउडविची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांच्या लक्षात आले की, ही जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशानेच आणली आहे. त्यामुळे पोलिसांनी ती ताब्यात घेतली असून त्यांची व्यवस्था गोशाळेत केली आहे. आज गणेश उत्सवात केलेल्या या कारवाईमुळे अनेकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. दरम्यान यात गुन्ह्यातून 9 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक आखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली अभय परमार व त्यांच्या टिमने केली.

महत्वाचे...

अकोले शहरात कोरोनाने आणखी एक बळी गेली आहे. कारण, शेकईवाडी येथे राहणार्‍या एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर संगमनेर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्या दरम्यान त्यांना श्वास घेण्यासाठी अधिक त्रास होऊ लागला होता. मात्र, ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अचानक अखेरचा श्वा घेसल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे, आजवर अकोले तालुक्यात 10 बळी गेले आहेत. तर कोरोना बाधितांची संख्या 373 इतकी झाली आहे.