बाप रे.! पोलीस अधिक्षक कार्यालयात एलसीबीचा कर्मचारी नाशिक लाचलुचपतच्या जाळ्यात.! 20 हजारांची मागणी.!
सार्वभौम (अहमदनगर) :- पोलीस दलात आज एकच खळबळ उडाली आहे. कारण, पोलीस ठाण्याचा नव्हे तर चक्क स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचार्यावर नाशिक लाचलुचपत विभागाचा छापा पडला आहे. त्यामुळे आज दिवस जिल्हाभर प्रत्येक सरकारी विभागाच्या कर्मचार्यांमध्ये तीच चर्चा रंगलेली होती. आज दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पोलीस कर्मचारी रविंद्र आबासाहेब कर्डीले यांनी शहरातील जुगाराचा क्लब चालु ठेवण्यासाठी तसेच दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत विभागाने त्यास ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात असत शेख जफर शेख यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दुपारी जिल्ह्यातील काही बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ पोलीस अधिक्षक कार्यालात येणार होते. मात्र, त्यांच्या अधीच तेथे नाशिकचे पथक दाखल झालेले होते. या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा कर्मचारी रवी कर्डीले यांनी एका व्यावसायीकाकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी त्यास या पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे. ही घटना अगदी काही काळ दबती राहिली, मात्र, काही वेळानंतर ती अगदी वार्यासारखी पसरली. नेमकी ही कारवाई कोणी केली हे लक्षात येत नव्हते. नगरच्या लाचलुचपत विभागाला या कारवाईची कानोकान खबर नव्हती. मात्र, दिवसभर उलटसुलट चर्चेनंतर सायंकाळी या घटनेचा उलगडा झाला. खरंतर नाशिकच्या विभागाने नगरच्या लाचलुचपत विभागाच्या अगदी काही अंतरावर ही कारवाई करावी. ही मोठी शोकांतीका आहे. त्यामुळे, स्थानिक विभागावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
इतकेच काय! गेल्या काही दिवसांपुर्वी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पंचायत समितीत देखील गटविकास अधिकारी यांच्यावर नाशिकच्या पथकाने छापा टाकला. त्यामुळे, नाशिकच्या पथकाची विश्वासाहर्यता अधिक वाढली आहे. तर लाचलुचपत विभागाचे अधिक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईचे कौतुक होऊ लागले आहे. कारण, पोलीस अधिक्षक कार्यालयात आणि ते देखील एलसीबीच्या कर्मचार्यावर कारवाई करणे म्हणजे आजवर भल्याभल्या अधिकार्यांना ते शक्य झाले नव्हते. त्यामुळे, या कारवाईची जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू असून पोलीस दलात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
एकीकडे एलसीबीत ट्रॅप झाला तर अकोले तालुक्यात चक्क पोलीस ठाण्यातून एका वाळुच्या गाडीचे टायर चोरी गेले आहेत. इतकेच काय? हा सर्व प्रकार दोन खाकी कर्मचार्यांनी केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, येथे बैठका घेऊन मोठी अर्थपुर्ण तडजोडी करुन यावर पडदा टाकण्याचे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. अर्थात हा प्रकार म्हणजे खाकीला काळीमा फासणारा आहे. ज्याने हा प्रकार केला आणि ज्याच्याकडे हे टायर विकले गेले. ती सर्व रिकवारी झाली आहे. मात्र, ज्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या दिल्या, तेच चोर निघाले अशा प्रकारची टिका आता होऊ लागली आहे. येथे पोलीस उपाधिक्षक केवळ बघ्याच्या भुमिकेत असून येथे कोणी गुटखा तस्करांना सहाय्य करते आहे तर कोणी पोलीस वाळु तस्कारांच्या मागे जाऊन तिघा-तिघांचा जीव घेत आहे. कोठे पोलीस ठाण्यात लावलेल्या वाहनांचे टायर चोरले जात आहे तर कोणी पोलिसांनाच मारहाण होत आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षकांनी याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी चर्चा सुज्ञ नागरिकांमध्ये सुरू आहे.