पोलिसाचा लोचका तोडून आरोपी पसार झाला! संगमनेरच्या घारगावात पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल!
सार्वभौम (अकोले) :-
संगमनेर तालुक्यातील माळवाडी-साकूर परिसरात एका चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पुणे पोलीस गेले होते. यावेळी त्यांनी आरोपीवर झडप घातली असता त्याने पोलिसांना चावा घेत धुम ठोकली. ही घटना शुक्रवार दि. 31 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रविंद्र आप्पा मांजरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार नवनाथ विजय पवार (रा. साकूर, ता. संगमनेर) याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवनाथ पवार हा साकूर परिसरातील रहिवासी असून तो चोरीच्या गुन्ह्यात मास्टर आहे. त्याने यापुर्वी काही ठिकाणी चोर्या केल्या असून त्याच्यावर पुणे ग्रामीणच्या मंचर पोलीस ठाण्यात व आळेफाटा पोलीस ठाण्यातील घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, तो वारंवार पोलिसांना चकवा देत होता. हा आरोपी शुक्रवारी साकुर परिसरात माळवाडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून पवार यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसांची चाहूल लागताच पोलीस कर्मचारी मांजरे यांनी त्याच्यावर झडप टाकून त्यास कवटाळले असता जिवाच्या आकांताने पवार धडपड करीत होता. मात्र, पोलिसांच्या कवळीतून सुटने वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे त्याने अटकेस विरोध करुन पोलिसांना धक्काबुक्की सुरू केली. तरी देखील पोलिसाची पकड सुटली नाही. त्यामुळे या संशयित आरोपीने मांजरे यांना बोचकडून छातीवर कडकडून चावा घेतला, तर दंडाचाही लोचका तोडला. त्यामुळे तो पोलिसाच्या कचाट्यातून सुटला आणि पसार झाला. त्याचा या पथकाने पाटलाग केला मात्र तो कोणाच्याही हाती लागला नाही.
दरम्यान याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पवार याच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संगमनेरच्या गुन्हेगाराने पुणे पोलिसांवर हात टाकणे आणि त्यास नगर जिल्ह्यातील घारगाव हाद्दीत आश्रय मिळणे ही विशषे बाब आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सगमनेर तालुक्यातील पठार भागावरील गुन्हेगारांचे राज्य सिद्ध झाले आहे. वाळुतस्करांनी महसुलच्या अधिकार्यांवर हल्ले करणे, गुन्हेगारांनी पोलिसांवर चालून जाणे, अवैध धंद्यावाल्यांनी सरकारी कर्मचार्यांना शिवीगाळ दमदाट्या करणे म्हणजे येथे मोगलाई सारखा वावर वाढू लागला आहे. त्यामुळे येथे एखाद्या सक्षम अधिकार्यांची गरज निर्माण झाली आहे. अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्या आहेत.