पंचायत समितीत पदांचे पुनर्वसन, राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज, भाजपचे भुमिगत राजकारण!


सार्वभौम (अकोले) :- 
                        अकोले पंचायत समितीत अधिकारांचे पुनर्वसन झाल्याचे आता पुन्हा पहायला मिळाले आहे. मात्र, या सगळ्यात राष्ट्रवादीचे अपयश आणि भाजप पुन्हा यशस्वी होताना दिसून आले आहे. तर स्व. दत्तात्रय बोर्‍हाडे यांच्या निधनानंतर त्यांच्या पदावर उर्मिला राऊत यांनी पदभार स्विकारला आहे. हे सदस्य पळावापळवीच्या नाट्यात देखील पिचडांचा वरचष्मा दिसून आला आहे. या सर्वांच्या पलिकडे पंचायत समितीचे बीडीओ भास्कर रेंगडे हे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्या जागी संगमनेर पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी ई. टी. चौधरी यांनी तात्पुरता पदरभार स्विकारला आहे. हे साहेब प्रचंड मेहनती आणि प्रमाणिक असून त्यांचे जे काही असते ते सर्व कायद्याच्या चौकटीत. त्यामुळे हे अकोल्याचा कारभार चोख पार पडतील. यात शंका नाही. मात्र, आता संकटांचे आणि राजकारणाचे ग्रहण लागलेल्या अकोले पंचायत समितीत अधिकारांचे पुनर्वसन झाल्याचे पहायला मिळाले आहे.
                      याबाबत सविस्तर वृत्त असे की, विधानसभा संपल्या आणि राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर पहिल्यांदाच पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. त्यात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी पहिल्यापासून जास्त काही कसोटी लावली नाही. मात्र, लढाई तोंडावर आल्यानंतर अनेकांनी ढाली तलवारी शोधायला सुरूवात केली. त्यामुळे तहान लागली की झरे खोदायचा प्रयत्न केल्यावर लगेच हाताला पाणी लागत नसते हा नैसर्गिक नियम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रचंड प्रयत्न करून देखील फक्त एक व्यक्ती फोडण्यात त्यांना यश आले. त्यामुळे आमदारकी गेली तरी सभापती पदाची माळ भाजपच्या गळ्यात पाडण्यात पिचडांना यश आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तरुण मंडळींनी फार आदळ आपट केली. तेव्हा कोठे राष्ट्रवादीचे वरिष्ट राजुरला आले आणि त्यांनी बैठक घेतली. त्यावेळी काही मुलाखती झाल्या. त्यात फार मत-मतांतरे पहायला मिळाली. मात्र, या निवडींची घोषणा देखील वादात सापडल्याने ती लांबणीवर पडली.
                     
 आता राष्ट्रवादीच्या जिल्हा कमिटीला थोडी मिर्ची झोंबेल, मात्र, त्यांनी काही निवडी करताना असे काही तरुण नेमले ज्यांना अक्कल ढबुची आणि प्रवास लंडनचा. त्यामुळे, ते पक्षाचे काम कमी पण रिकामी कामे करण्यात जास्त पटाईत असल्याचे दिसून येत असे बोलले जात आहे. पोलीस ठाण्यात जाऊन तडजोडी करणे, त्यांच्यावर पक्षाने दिलेल्या पदाचा गैरवापर करुन धिटाई करणे, (तसे परावे देखील सार्वभौमच्या हाती उपलब्ध आहेत) इतकेच काय! ज्या कार्यकर्त्याने पडत्या काळात राष्ट्रवादी पक्षाला तन-मन-धनाने स्वत:ला झोकून दिले. त्याचा मुलगा मयत झाल्यानंतर त्याच्या पडत्या काळात या राष्ट्रवादीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी ठामपणे उभे राहयचे होते मात्र यावेळी हे महाशय भाजपच्या कार्यकर्त्यांना फितुर झाले, पोलीस ठाण्यात त्यांची वकीली करु लागले, याचे देखील पुरावे आहेत. इतकेच काय! पदाचा गैरवापर केल्याचे असे अनेक पुरावे आहेत. मात्र, राष्ट्रवादीत जसे डॉ. किरण लहामटे हे सडेतोड व्यक्तीमत्व आहे. तसे जिल्हा पातळीवर नाही का? असा प्रश्न पडतो. नात्यागोत्याचे राजकारण संभाळताना यांनी माकडांच्या हाती कोलीत दिले तर येथे जो राष्ट्रवादी पक्ष तळागाळातील लोकांनी उभा केला आहे. तो उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला पुन्हा तळाला गेलेला दिसेल, यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे डॉ. लहामटे, अशोक भांगरे व फाळके तात्या यांनी यात स्वत: लक्ष घालणे अपेक्षित आहे. अन्यथा तालुक्याची मोट बसणार नाही. हेच वास्तव आहे.
                        याचे कारण असे की, कोणी नाही म्हटले तरी आजच राष्ट्रवादीत अनेक गट पडले आहेत. याला जबाबदार ही नवी फळी आहे. त्यासाठी एक वैचारिक विचारसारणी असलेल्या ज्येष्ठ नेत्यांचा गट एकत्र येणे गरजेचा आहे. त्यात खुद्द आमदार, अशोक भांगरे, भानुदास तिकांडे, संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, संदीप शेणकर आर. के. उगले, चंद्रभान नवले, पोपटराव दराडे, मिनानाथ पांडे, सुरेश गडाख यांच्यासह अन्य जे कोणी ज्येष्ठ आहेत. ज्यांचे पक्ष उभारणीसाठी योगदान आहे. त्यांनी एक होऊन पक्षाचे अजेंडे ठरविणे गरजेचे आहे. तर यापलिकडे जे मित्रपक्ष आहेत, त्यांना देखील एकत्र बसवून वेगवेगळ्या समित्या तयार करणे, प्रत्येकाला कामे वाटून देणे, त्याचा पाठपुरावा करणे, अशी नियोजनबद्ध कामे झाली तरच येथे स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकू शकतो. अन्यथा जर तरुणांच्या हाती कारभार दिला तर पक्षाच्या उभारणीचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे.
                     
  एक विशेष बाब म्हणजे जशी त्याकाळी मोदी लाट होती. तशी आजही डॉ. लहामटे यांच्या लोकप्रियतेची लाट आहे. हे नाकारुन चालणार नाही. मात्र, मोदीजींच्या लोकप्रियतेचा फायदा घेत भाजपने तब्बल 10 वर्षे देशावर निर्विवाद राज्य केले. तसेच डॉक्टरांनी आणि त्यांच्या वैचारिक व ज्येष्ठ नेत्यांनी पुढे येऊन येथील तळागाळातील लोकप्रियतेला राष्ट्रवादीत बांधून घेतले पाहिजेे. किमान आपण तालुक्यावर तरी निर्विवाद वर्चस्व उभे केले पाहिजे. त्यासाठी गावोगावी शाखा खोलणे, पदांचे पुनर्वसन करणे, जे पदांचा गैरवापर करतात त्यांना पदच्युत करणे, नव्या व अ‍ॅक्टीव तसेच  संयमी तरुणांना संधी देणे, संघटन बांधण्यासाठी नियोजन आखणे अशी अनेक कामे करणे गरजेचे आहे.
                           याचे कारण म्हणजे, एक प्रखर सत्य असे की, आज तालुक्यात आमदार असून पंचायत समितीत ज्या एका सदस्याला मागील वेळी राष्ट्रवादीने फोडले होते. तो आज आठ दिवसांपुर्वीच पिचडांच्या गळाला लागला होता. कारण, त्याच्या लक्षात आले होते. पहिली चूक झाली आता ती पुन्हा करायला नको. त्यामुळे पंचायत समितीच्या निवडणुकीत चक्क राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भाजपला पाठींबा दिला, इकेच काय! येथे महाविकास आघाडीत एकोपा दिसला नाही. त्यामुळे शिवनेनेचा एक सदस्य भाजपला मतदान करुन जातो आणि आपला उमेदार देखील न देण्याची नामुष्की आढावते हे महाविकास आघाडीचे अपयश नाही का? त्यामुळे, उद्या ग्रामपंचायत, कारखाना, नगरपंचायत अशा एकापाठोपाठ एक निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यांची मोट बांधण्यासाठी आजच कंबर कसणे गरजेचे आहे. त्या नियोजनासाठी जिल्हा कमिटी, आमदार महोदय व अशोक भांगरे यांनी एकत्र बसून तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणे फार महत्वाचे झाले आहे. अन्यथा याचे परिणाम येणार्‍या निवडणुकीत राष्ट्रवादीला भोगायला लागतील यात तिळमात्र शंका नाही.
 - सागर शिंदे
--------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 75 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 75 लाख वाचक)