अकोल्यात शिवसेनेची भूमिका म्हणजे, तू लढ.! मी कपडे संभाळतो! येथे सारंश शुन्य युती अन भाजपला ताकद.!


- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :- राज्यात अनोखी युती झाली आणि 1978 नंतर राज्यात वेगळेच चित्र पहावयास मिळाले. सत्तेच्या मोहासाठी वरती त्रिमुर्ती विचारांची दिलजमाई झाली खरी मात्र, ग्रामीण भागात कट्टर विरोधक ते विरोधकच राहून गेले. ज्यांनी वर्षानुवर्षे एकमेकांची उनिधुनी धुतली त्यांना तोंड मुरडून का होईन एकमेकांच्या हातात हात घ्यावा लागला आहे. नगर, कोपरगाव, पारनेर अशा अनेक ठिकाणी हेच चित्र पहायला मिळत आहे. मात्र, अकोल्यात जगावेगळेच चित्र पहायला मिळत आहे. येथे महाविकास आघाडीने एकोप्याने लढायचे तर ... तू हो पुढे, मी आलोच! किंवा तू लढ मी कपडे संभाळतो असे प्रकार पहायला मिळत आहे. तर पक्ष एक आणि गटतट अनेक ही देखील प्रचिती आता पहावयास मिळत आहे. इतकेच काय! तालुक्यात भलेभले अँन्टी शिवसैनिक असून मातोश्रीच्या नावाखाली खरी श्रद्धा ते कोणावर ठेवतात हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे, अकोल्यात खरंतर आता आमदारांनी शिवसेनेला ताकद देणे म्हणजे नकळत भाजपला ताकद दिल्यासारखे आहे. अशी जोरदार चर्चा आता अकोल्यात सुरू आहे. अर्थात आमदार डॉक्टर आहेत, त्यांना फितुरांचे ऑपरेशन कसे कायचे हे आपल्यासारख्यांनी सांगणे सुज्ञपणाचे ठरणार नाही.
                         याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोल्यात शिवसेनेची भूमिका नेहमी तडजोडीची असते असेच बोलले जाते. याची पुन:प्रचिती पंचायत समितीच्या निवडणुकीत आली. राज्यात एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजवर सरसंधान साधत असतात, तर संजय राऊत रोजच भाजपशी वृत्तपत्रातून सामना करतात. त्यामुळे, जे मातोश्रीला डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करतात ते नक्कीच शिवसेनेच्या अजेंड्याने काम करतात. मात्र, अकोल्यात तसे चित्र पहायला मिळाले नाही. या तालुक्यात अगदी काल-परवा पंचायत  समितीच्या निवडणुका झाल्या. त्यात 12 सदस्यांपैकी चार भाजप, चार राष्ट्रवादी आणि चार शिवसेना असे गणित होते. मावळते सभापती यांचे अपघाती निधन झाल्यामुळे येथे 11 सदस्यांमध्ये फेरनिवडणुका झाल्या. आता माजी आ. वैभव पिचड हे राष्ट्रवादीतून भाजपत गेले त्यामुळे त्यांनी सात सदस्य अगदी छान पद्धतीने जीवापाड जपले. मात्र, शिवसेनेने त्यांची भूमिका अगदी गुलदस्त्यात ठेवली. त्यांनी जर ठरविले असते तर पंधरा दिवस आधीच यंत्रणा आखली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सामंजस्याने पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असता. मात्र, राष्ट्रवादीला आमदारकी मिळाली त्यांना बाकीची गरज नाही असेच वाटू लागले आहे. ऊलट एक नवी उर्जा म्हणून पुर्वीच एक सदस्य फुटला होता, त्याने देखील यावेळी यांच्या वाटेकडे डोकून देखील पाहिले नाही. थेट राजूर गाठून तेथे आपल्या चुकीचे प्रयचित्त मागितले. त्यामुळे हे खर्‍या अर्थाने राष्ट्रवादीचे आणि स्वत:ला निष्ठावंत तसेच पदाधिकारी म्हणून घेणार्‍यांचे अपयश आहे.
                   आता या पलिकडे अकोल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे जणुकाय मुंगसा सापाचे वैर झाले आहे. येथील पदाधिकारी आमदारांकडे जायला तयार नाही आणि आमदार त्यांना फोन देखील करायला तयार नाही. अर्थात अमादार फोन करतील तरी कसे? कारण, विधानसभेच्या प्रचारादरम्यान आमदारांच्या डॉक्टरकीची चिरफाड कोणी केली हे अजुनाही त्यांच्या कानात गुंजत असेल. त्यामुळे, आमदारांचा स्वभाव पाहता ते एकवेळी अलिप्तता प्रशन करतील मात्र, स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवणार नाहीत. त्यामुळे कारखाना रोडचे शिवसैनिक आणि खरोखर ज्यांनी विधानसभेच्या काळात पक्षाचे आदेश झुगारुन डॉक्टरांचे काम केले त्यांच्यासाठी ते सदैव भगवा सलाम करीत राहतील यात शंका नाही.
साहेब!अकोल्यात हे वास्तव आहे!
खरंतर पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपले चार का होईना परंतु विरोध म्हणून सभापती पदासाठी अर्ज भरायला हवा होता. मात्र, येथे तसे झाले नाही. उलट, त्यांच्यातच एकाच एक नाही अन बापात लेक नाही अशा म्हणीप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्यात कोणी भगवा गळ्यात घालुन भाजपत गेले. तर कोणी भर श्रावणात मांसाहारी दुकाने खोलण्यात व्यस्त आहे. म्हणजे पहा ना! सरळ-सरळ सगळी गणितेच फेल गेल्याचे दिसते आहे. त्यामुळे, एकेकाळी येथे रिपाईत पाच पंन्नास गट होते. ते एक करण्यात विजय वाकचौरे यांना यश आले तर त्यांचा पायंडा शिवसेनेने उचलला आहे की काय! असे दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे येथे डॉक्टर प्रणित राष्ट्रवादी आणि विद्यमान विचारसारणीची शिवसेना यांच्यात कधीच जमू शकत नाही. हेच चित्र दिसत आहे.
                      अकोले तालुक्याचे राजकारण वाटते तितके सोपे नाही. कारण, येथे काही शिवसैनिक कारखान्यात मुंगी होऊन साखर खात आहेत. तर काहींना नकळत तेथील वेगवेगळ्या माध्यमांतून रसद मिळत असल्याचे बोलले जाते. मात्र, स्टेजवर भल्याभल्या बाता मारायच्या बंद खोलीत मांडीला मांडी लावून बसायचे. यात दुर्दैव असे की जे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर मात्र प्रचंड अन्याय होताना दिसतो आहे. आता हेच पहा. उद्या प्रशासक म्हणून शिवसेनेकडून 26 जणांची यादी गेली आहे. ती अशा व्यक्तीकडून ज्यांचे व आमदारांचे अगदी कधीच पटले नाही.  इतकेच काय! महाविकास आघाडीत असून देखील त्यांचा आणि आमदारांचा कधी संपर्क देखील झाला नाही. डॉक्टर आमदार झाल्यानंतर आणि सत्ता आल्यानंतर अभिनंदन देखील करण्यासाठी त्यांनी फोन केला नाही. अशा दोन टोकाच्या दोन व्यक्ती एका म्यानात राहतील तरी कशा? आणि आमदार त्यांच्या कामांना किती प्राधान्य देतील? ज्यांनी राजकारण सोडून जहरी टिका करु पाहिली. ते देखील विरोधकांच्या स्टेजहून.! हे डॉक्टर आजही विसरले नसतील. त्यामुळे शिवसैनिकांना केवळ एक हे एक गाजर दाखविण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे.
                       आता यात अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की, डॉक्टरांना येणार्‍या काळात येथे राष्ट्रवादी बळकट करायची असेल तर किंवा स्वत:चे निष्ठावंत कार्यकर्ते मोठे करायचे असेल तर त्यांच्यासाठी ही एक नामी संधी आहे. कारण, शेजारील तालुक्यात ना. बाळासाहेब थोरात हे राज्यात सत्ता असो नको, पुर्वी राष्ट्रवादी व काँग्रेस सरकार असले तरी त्यांनी कधी राष्ट्रवादीला फारसे सत्तेत स्थान दिले नाही. आजही राज्यात महाविकास आघाडी आहे. तरी देखील त्यांनी शिवसेनेला विचारात देखील घेतले नाही. कारण, ते ज्ञात आहे. वाटाघाटीच्या नादात आपण येथे विरोधक प्रबळ करुन हाताने भविष्याचे संकट ओढविल्यासारखे आहे. आता अकोल्यात देखील डॉक्टर जितके बळ शिवसेनेला देतील तितकी येणार्‍या काळात त्यांची डोकेदुखी ठरु शकते.
                           कारण, येथील शिवसेना एनवेळी कोणाला ताकद देते हे त्यांना नव्याने सांगायला नको. अन्यथा सगळे आयटीआय मैदान अशोक भांगरे यांच्या समर्थनार्थ भरते आणि तरी देखील त्यांचा पराभव होतो, मधुकर तळपाडे यांच्यासारखा अभ्यासू, बुद्धीमान, डॅशिंग आयपीएस अधिकारी नोकरी सोडून तालुक्यात येतो आणि वारंवार विजयाच्या आशेचा किरण दिसतो आणि पराभव पदरात पडतोे हे कशाचे द्योतक आहे? त्यामुळे, येथील लबाड शिवसैनिकांच्या बहूत बळ भरण्यापेक्षा तळागाळात ज्या शिवसैनिकांनी तुमच्यासाठी जीवाचे रान केले, ज्यांनी भगवा नाही तर भगव्याचा पायीक असणारा माणूस पाहिला त्यांना बळ दिले पाहिजे. जे आजही शरिराने शिवसेनेत आणि मनाने नातेगोते व सत्ता संभाळण्यात व्यस्त आहेत त्यांच्यापेक्षा महाविकास आघाडी म्हणून तुमच्या सुखा दु:खात सोबत आहेत त्यांच्यासाठी डॉक्टरांनी नक्कीच हात सैल सोडला पाहिजे. त्यामुळे येथे शिवसेना आणि त्यांची तू चल मी आलोच ही भूमिका समजून घेतली पाहिजे असे येथील सुज्ञ जनतेला वाटते आहे. बाकी, डॉक्टरांना माहिती असते कोणत्या व्यधीवर कोणते औषध जालीम आहे. ते त्यांचे काम योग्यवेळी चोख पार पडतील यात शंकाच नाही.
 - सागर शिंदे
--------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 75 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 75 लाख वाचक)