ते तिन्ही जलपूजन? छे.! ती तर निवडणुकीची रंगित तालीम! राष्ट्रवादीचे दोन गट आणि एकटे भाजप!.


- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) : - 
                           सन 2014 साली अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाची पायाबांधणीला सुरूवात झाली. मुळा खोर्‍यात शेतकर्‍यांसाठी पाणीसाठा, सिंचन व जलविद्युत असे अनेक अजेंडे डोळ्यासमोर ठेवून या सहाशे दसलक्षघनफुट धरणाची उभारणी झाली. अर्थात माजी मंत्री मधुकर पिचड यांनी या धरणासाठी पाठपुरावा केला हे जर कोणी नाकारत असेल तर त्याला त्याचे ते स्वार्थी राजकारण लकलाभ! पण, त्यात अजितदादा पवार यांचे सर्वात मोठे योगदान आहे. हे देखील तितकेच वास्तव आहे. सुदैवाने या धरणामुळे 1 हजार 778 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. मात्र दुर्दैव असे की ज्या एक हजार 57 मिलिमिटर वेगाने तेथे पाऊस पडतो, त्याच वेगाने या पाण्यावर येथे राजकरण होते. हे राजकारणी चक्क पाण्यावर आपली राजकीय धेय्यधोरणे ठरवितात. धरणाला वारंवार चोळी बांगडी टाकून वस्त्रधारण करतात की वस्त्रहरण करतात! हेच कळायला तयार नाही. 255 मिटरच्या धरणाचे राजकारण 224 किमी बारामतीपर्यंत वारंवार नेले जाते. यापेक्षा दुसरे दुर्दैव काय आहे? म्हणजे तालुक्यात एकात एक नाही आणि बापात लेक नाही. असेच राजकारण सुरू असून एकाच पुलाचे दोन-दोन उद्घाटन, एकाच धरणाचे तीन-तीन पुजन! जो-तो एकमेकांची राजकीय पोळी भाजण्याचे व बीजे रूजविण्याचे काम करताना दिसत आहे. मात्र यांच्या चेहर्‍याआड असणारे बुरखे जरा जनतेने उघडून पाहिले पाहिजे. म्हणून हा उहापोह!
                 खरंतर आजवर पिचड कुटूंबाची सत्ता भोगणारे आणि त्याच्या बोटाला धरून राजकारणात आलेले त्यांच्यावर नको तशा प्रकारची टिका टिप्पणी करताना दिसतात. गेली वर्षानुवर्षे त्यांनी अनेकांना रसद पुरविली मात्र आता त्यांची सत्ता काय गेली आणि ते इतके काही वाईट वाटू लागले आहेत की, जसे हे राजकारणी गुलामीतून मुक्त झाले आहेत. त्यांच्या बोलण्याचा आणि भाषणाचा आवेश पाहिला तर अनेकांना असे वाटेल की फार कट्टर विरोधक झाले आहेत. मात्र, जनता इतकी दुधखुळी नाही की तुमच्या शब्दांच्या फवार्‍यावर ती भुलून पडेल. कारण, गेली 40 वर्षे येथे कोण्या व्यक्तीला जमले नाही ते या जनतेने करून देखविले आहे. त्यामुळे कोणी कितीही चोळ्या बांगड्या पाण्यात सोडल्या तरी त्यामागच्या राजकारणावर पाणीच फिरणार आहे. हेच सत्य असल्याचे सुज्ञ नागरिकांना वाटते आहे. फक्त तुम्हा सर्वांच्या श्रेय्यवादात निसर्गराजा कोपायला नको आणि पाण्याची विटंबना व्हायला नको इतकीच शेतकर्‍यांची प्रांजळ इच्छा आहे.
                         
  खरंतर पिचड कुटुंबाला जसे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तेव्हापासून त्यांनी प्रचंड वैराग्य धारण केले आहे. झेडपीपासून ते ग्रामपंचायत समितीच्या सदस्यापर्यंत त्यांनी सगळ्यांवर नकळत आपली नाराजी दर्शविली आहे. आता त्यांचा पराभव कसा झाला हा काथ्याकुट करण्यापेक्षा त्यांच्या वैराग्याने मानसे तुटत चालली आहे असे बोलले जात आहे. एक साधे उदा. म्हणजे आज पिंपळगाव खांड धरणाचे तृतीय पुजन पार पडले तेथील लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त करुन दाखविल्या. म्हणजे हाद्दीत येऊन ना हाक ना हावाला! त्यामुळे नाराजी सहाजिक आहे. तेव्हा खर्‍या अर्थाने याच्यातील राष्ट्रवादी आणि बारामतीकरांवरील दादाप्रेम जागरूक झाले. मात्र, हेच लोक निवडणुकीच्या काळात पिचडांच्या स्टेजवर रुबाबत बसले होते. तेव्हा दादांची कोणाला आठवण आली नाही, तेव्हा पिंपळगाव खांड धरणाची कोणाला आठवण झाली नाही. पण आता पिचड पडले त्यामुळे हैव नाही आणि दैवही नाही त्यामुळे राष्ट्रवादीचे झेेंडा हाती घेतलेला कधीही बरा. पण, दुर्दैव असे की, जेव्हा राष्ट्रवादीने धरणाचे पुजन केले. तेव्हा देखील डॉ. किरण लहामटे यांनी अ‍ॅन्टी राष्ट्रवादीप्रेमींना थारा दिला नाही. त्यामुळे दोन्ही घरचा पाहूणा अन उपाशी मेला. अशीच गत मुळा खोर्‍यात पहावयास मिळाली.
                       आता पिंपळगाव खांड धरणाने कधी नव्हे अशा एकावर एक तीन साड्या नेसल्या. पण, एक गट स्वत: राष्ट्रवादी प्रणीत सांगत असला तरी त्यांना आमदार आणि स्थानिक निष्ठावंत राष्ट्रवादी (तात्पुुरते असे म्हणू) हे त्यांना आपले मानायला तयार नाही. म्हणजे हे माजी मंत्र्यांच्या मुशीतले बंडखोर. मात्र, फक्त वाट पाहत होते. सत्ता कोठे जाते म्हणजे टायमानुसार यांना घड्याळावर प्रेम जडू लागले आहे. त्यामुळे हे न समजण्याइतकी नवोदीत राष्ट्रवादी दुधखुळी नाही. तर आमदार देखील त्यांच्या मतावर ठाम आहे. मला नेत्यांनी नव्हे तर जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही सारथ्याची किंवा दिपस्तंभाची गरज नाही. त्यामुळे त्यांची धुंदी म्हणजे हम खडे तो सरकारसे बडे! त्यांना पुढारी, नेता, कार्यकर्ता यांच्यापेक्षा तळागाळातील व्यक्तींवर प्रेम करणे प्रिय वाटते. अर्थात त्यांना त्याच्या अजुबाजूला असणारी पिलावळ सुधरु देत नाही तो भाग थोडा वेगळा आहे. मात्र, ते स्वयंभू, धडपडे व जनतेच्या मनातील आमदार आहेत हे नाकारुन चालणार नाही.
                   
 खरंतर हे पाण्याचे राजकारण तर आहेच मात्र त्याआडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येकावर आरोप प्रत्यारोप करीत आपण अदखलपात्र झालो आहोत त्याची दखल कोणीतरी घ्यावी यासाठी मलिदे देऊन मीडियाबाजी होऊ लागली आहे. अर्थात हा राजकारणाचा एक भाग आहे. स्टण्टबाजी, आरोप, प्रत्यारोप, टिका टिपण्णी धोकेबाजी, खोटेनाटे, खंजीर खूसाखुपशी हे केले नाही तर त्याशिवाय राजकारण होईल का? आज लोक पिचडांवर आरोप करतात त्यांनी पवारांना धोका दिला. मात्र, पवारांनी 18 जुलै 1978 साली वसंतदादा पाटील यांना धोका दिली नाही का? अजित दादांनी पहाटे-पहाटे काकांना धोका दिला नाही का? त्यामुळे इतिहास उगळताना इतिहासाचे दाखले देखील लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा उघडे पड्याची वेळ येते. आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोडावर आल्या आहेत. त्यामुळे कोणाला कोठे बी.जे रूजवायचे आहे हे नव्याने सांगायला नको. मात्र, यावेळी तृप्त आणि अतृप्त आत्मे संभाळताना भाजप व राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. यात फक्त सामाजिक स्वस्थ बिघडले नाही म्हणजे बरे! अन्यथा राजकारणाच्या नादात सामान्य मानसांची मोठी हानी होते. कोणी अनाथ होते तर कोणी मरणयातना सोसतात हे अकोल्याच्या मार्केटयार्ड गोळीबारात आपण अनुभवले आहे.
                 अकोले तालुक्यात येणार्‍या निवडणुकांची रंगबाजी फार भयानक पद्धतीने पहायला मिळणार आहे. आता पिचडांकडे आमदारकी नाही, मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्या कायम राखण्यासाठी कबर कसावी लगणार आहे. कारण, भाजपचा प्रवेश त्यांना अंगलट आला खरा पण तो सिद्ध करण्यासाठी त्यांना नवी खेळी खेळावी लागणार आहे. तर दुसरीकडे डॉ. लहामटे व अशोक भांगरे यांना राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कसोशीने मैदानात उतरावे लागणार आहे. मात्र, जर त्यांनी माकडांच्या हाती कोलीत दिले तर हाती कोळसा सोडून काही लागणार नाही. त्यासाठी वैचारिक राष्ट्रवादीची बांधणी करावी लागणार आहे. तर अकोल्यात तिसरी आणि चौथी आघाडी देखील लंगोट बांधण्याच्या तयारीत असून तालुक्यात राजकीय आखाडा रंगनार हे निश्चित झाले आहे. फक्त अजून थोडे दिवस वेट अ‍ॅण्ड वॅच.! तुम्ही वाचत रहा निर्भिड व निष्पक्ष दै. रोखठोक सार्वभौम!

                     भा


प्रिय वाचकहो.! उद्या दै. रोखठोक सार्वभौम या पोर्टलाचा वर्धापनदिन आहे. गेल्या एक वर्षात राजकीय विश्लेषण, क्राईम स्टेरी, सामाजिक, आर्थिक व भौगोलीक   घडामोडींवर आपण 592 लेख लिहिले आहेत. त्यास उदंड प्रतिसाद देत आजवर त्याचे 69 लाख 31 हजार 425 वाचक झाले आहेत. खरंतर उद्या 7/12 तारीख आहे. त्यामुळे, कोणाच्याही आर्थिक व राजकीय दबावाला बळी न पडता अनेकांचा 7/12 आपण उघडा पाडला, गेल्या वर्षभरात कोणाला न्याय दिला तर कोणाची मने दुखावली असतील त्याबद्दल दिलगिरी.! पण निर्भिड व निष्पक्ष पत्रकारीता म्हणजे काय! हे तुमच्याकडे पाहून कळते. या शब्दांचे मानकरी आम्ही ठरलो हीच या पोर्टलची मिळकत आहे. बातम्या करणे हा माझा हातखंडा असला तरी माझ्या सह्याद्रीसारख्या प्रतिनिधींचे त्यात फार अनमोल योगदान आहे. तर जे ज्ञात अज्ञात मित्र, हितचिंतक ही बातमी शेअर करतात ते देखील या यशाचे शिल्पकार आहेत. या सर्वांचे मी मन:पुर्वक आभार मानतो!
संपादक
- सागर शिंदे 
--------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 68 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 460 लेखांचे 68 लाख वाचक)