महसुलमंत्र्यांच्या मतदारसंघात कोरोनाची महाआघाडी! जिल्ह्यातील उच्चांक गाठला! एकच दिवसात अर्धशतक!


सार्वभौम (संगमनेर) :- 
                       संगमनेरमध्ये आज मात्र कोरोनाचा बॉम्ब फुटला आहे की पाऊस पडला आहे. हेच कळायला तयार नाही. कारण आज बुधवार दि. 15 जुलै रोजी तब्बल एकाच दिवसात 48 रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष जिल्ह्याचे पालकमंत्री होमक्वारंटाईन झाले आहेत. संगमनेर तालुक्याचे आमदार तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात होमक्वारंटाईमधून नुकतेच बाहेर आले आहेत. राज्याचे मंत्री, जिल्ह्याचे आमदार कोरोना पॉझिटीव्ह तर क्वारंटाईन होत आहे. त्यामुळे भल्याभल्यांना कोरोनाने रांगेत उभे केले आहे. मात्र ज्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून मोठ्या आशेने महाविकास आघाडी पुढे आली. त्याच ठिकाणी कोरोनाने महाआघाडी घेतली असल्याचे दिसते आहे. कारण, एकाच दिवशी तब्बल कोरोनाचे अर्धशतक तर जिल्ह्यात अव्वल आणि राज्यात अगदी तोडक्यात शहरांपैकी संगमनेरचे नाव कोरोनाग्रस्त म्हणून अग्रभागी असल्याचे दिसते आहे. अशी बोचरी व खोचक टिका आता होऊ लागली आहे.
                याबाबत सविस्तर आकडेवारी अशी की, बुधवारी सकाळी 7 व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून येताच सायंकाळी होते कोठे नाहीतर येथे 23 रुग्ण नव्याने आढळून आले. येथे प्रशासन पोहचते कोठे नाहीतर रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार पुन्हा 18 कोरोनाबाधीत रुग्ण मिळून आले आहेत. त्यामध्ये शहरातील अभिनव नगर मध्ये 69 वर्षीय पुरुष तर 41 वर्षीय इसमास कोरोनाची बाधा झाली आहे. नवीन नगर रोड येथे 73 वर्षीय वयोवृद्ध महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. तर रेहमतनगर येथे 54 वर्षीय पुरुषाला व लखमीपुरा येथे 32 वर्षीय युवकाला कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तसेच शिवाजी नगर येथे पुन्हा तीन कोरोनासंक्रमीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये 5 वर्षीय बालकास कोरोनाची लागण झाली आहे तर 13वर्षीय युवतीस कोरोनाची बाधा झाली आहे व 34 वर्षीय महिलेस कोरोनाचे संक्रमण झाले आहे. जनतानगर मध्ये 30 वर्षीय महिला, भारत नगर 63 वर्षीय पुरुष, भारत चौक 55 वर्षीय महिला, ऑरेंज कॉर्नर 55 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोर्वे येथील 33 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच घुलेवाडी येथे 3 वर्षीय बालकास कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तर निमोणचे ग्रहण अजून सुटता सुटत नाही. येथे पुन्हा 65 व 71 आणि 61 वर्षीय पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर घुलेवाडी येथे 30वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या 284 वर जाऊन पोहचली आहे.
                                 
दरम्यान, तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या त्रिशतकाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. आज संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्णांचे उच्चांक गाठला आहे. आज संगमनेर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे शहरालगतच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यापासून संगमनेर शहरात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन काळात रस्ते सुनसान झाले होते. विनाकारण बाहेर पडणार्‍यांवर कठोर कारवाई केली जात होती.परंतु लॉकडाऊन शिथिल केल्यापासून सोशल डिस्टन्सचा तालुक्यात सर्वत्र फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे कोरोनाचा फैलावही तितक्याच झपाट्याने वाढत चाल्याचे दिसत आहे. 
 आता संगमनेरात एकूण 97 रुग्ण असून ग्रामीण भागात धांदरफळ येथे 8, निमोण 16, घुलेवाडी 8, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, पळासखेडे 3, जोर्वे 1, खळी 1, गुंजाळवाडी 8, कुरण 51, पिंपरणे 1, साकूर 1, पेमरेवाडी 2, कसारा दुमाला 3, संगमनेर खुर्द 2, ढोेलेवाडी 5, निमगाव जाळी 1, खांडगाव 3, पिंपळगाव कोंझिरा 3, हिवरगाव पठार 1, पेमगिरी 1, नांदुरखंदरमाळ 1, हिवरगाव पावसा 1, मिर्झापूर 1, करुले 1, कनोली 4, नानज 2, चिखली 1, कौठे धांदरफळ 1 असे एकूण 237 रुग्ण कोरोनाचे झाले होते. आता यात 48 रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या 284 वर जाऊन पोहचली आहे. तर संगमनेर शहरातील 8 जण मयत असून धांदरफळ 1, निमोण 2, कसारा दुमारला 1, डिग्रस 1, शेडगाव 1 अशा 14 जणांनी कोरोशी झुंज देत आपले प्राण सोडले आहेत.
           जिल्हा सामान्य रुग्णालय  येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दि. 15 रोजी रात्री उशिरा आणखी 33 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सुरूवातीला 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज दिवसभरात 82 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहेत. तर रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 33 अहवालांमध्ये श्रीरामपूरमधील 21, नेवासेमधील 6, अकोले येथील 2, संगमनेरमधील तीन आणि शेवगावमधील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान संगमनेरमधील पाच जणांची कोरोना चाचणी पुन्हा करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आहे. या व्यतिरिक्त अकोले तालुक्यात आज कोरोनाचे सहा रुग्ण मिळून आले होते. तर आता हे दोन रुग्ण असे आठ रुग्णांची भर एकाच दिवशी पडली आहे.

- सुशांत पावसे