अकोले तालुक्यात पुन्हा दोन रुग्णांची भर! त्या अहवालाकडे अनेकांचे लक्ष! खानापुरात नागरिकांनी संतप्त

 
सार्वभौम (संगमनेर) :-
                     अकोले तालुक्यातील देवठाण येथे पुन्हा दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मिळुन आले आहेत. त्यामुळे देवठाण येथे आता चार रुग्ण झाले असून प्रशासनाने तो भाग कंटेनमेंट केला आहे. यात विशेष बाब म्हणजे ज्या घरात कोरोनाचे रुग्ण मिळून आले आहेत ते वस्ती गावापासून फार दुरवर आहे. त्यामुळे देवठाण गावाला फारसा त्यापासून धोका नाही. तरी विरगाव आणि देवठाण या दोन्ही गावांना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
                           
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या आठ दिवसांपुर्वी देवठाण येथे एक महिला पाहुणी आली होती. त्यांनी संगमनेर येथे एक बस्ता करुन एका लग्नाला हजेरी लावली होती. त्यानंतर ही महिला देवठाण येथे तिच्या पाहुण्याकडे गेली असता तेथे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांनी थेट रुग्णालय गाठलेे. दोन दिवसानंतर त्यांच्या रिपोर्ट पॉझिटीव्ह मिळून आला होता. त्यांच्या पाठोपाठ पुन्हा संपर्कामुळे घरातील वृद्ध महिलेला त्याची लागण झाली, त्यामुळे त्यांना देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या दरम्यानच्या काळात घरातील आणखी दोघांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेऊन तपासणी केली असता त्यात एक महिला व एका पुरूषाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
                              दरम्यान अकोले शहरातील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. यातील दोन रिपोर्ट संशयास्पद आहे. त्यामुळे अनेकजण चिंतेत आहे. आज संध्याकाळी हे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अकोलेकरांचा जीव भांड्यात पडणार आहे. तर अकोल्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे बाहेरुन येणारे व्यक्ती आणि लग्नसोहळा यांच्यावर प्रशासनाला कडी नजर ठेवावी लागणार आहे. याबाबत दक्षता न घेतल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
             
दरम्यान प्रशासनाने खानापूर येथे कोविड सेंटर केले आहे. त्यामुळे पहिल्यापासून तेथील जनता जीव मुठीत धरुन जगत आहे. तर दुसरीकडे जे काही आरोग्य कर्मचारी आणि अ‍ॅम्ब्युलन्समध्ये येणारे लोक आहेत. त्यांना मात्र कोरोनाविषयी जागरुकता व गंभीरता आहे की नाही. असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण, या कर्मचार्‍यांनी हातातील हॅण्डग्लोज अक्षरश: खानापूर परिसरातील रस्त्यावर फेकूण दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करीत प्रशासनाची कानउघडणी केली आहे. याचे कारण म्हणजे येथे बहुतांशी  घरे रस्त्यावर आहेत. त्यामुळे घरातील प्रत्येक लहान मुलगा रस्त्याने ये-जे करतो तेथे खेळतो. अशावेळी ही पांढरीशुभ्र वस्तु काय आहे. अशी चिकित्सकता करीत तो ती उचलु शकतो हातात घालु शकतो. इतकेच काय? हा सर्व भाग शेतीचा असल्यामुळे जनावरे देखील ते हॅण्डग्लोज खावू शकतात. आता त्या बेजबाबदार कर्मचार्‍याच्या एका चुकीमुळे काय होऊ शकते याची कल्पना नव्याने द्यायला नकोे. त्यामुळे आज सकाळी खानापूर परिसरातील नागरिकांनी थेट तहसिलदार व आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. अर्थात डॉक्टरांनी या प्रकाराची दिलगिरी व्यक्त केली आहे. कर्मचार्‍यांना या प्रकाराबाबत सुचना देण्यात देण्यात येतील, एव्हाणा कारवाई केली जाईल. त्यानंतर नागरिकांनी शांतता घेतली आहे.