कोरोनाचा निव्वळ बागुलबुवा, काय आहे कोविडचे वास्तव!

- सागर शिंदे
सार्वभौम (संगमनेर) :-
                          नगर, संगमनेरमध्ये कोरोनाचा कहर नक्कीच सुरू आहे. यात शंकाच नाही. मात्र, ही संख्या एका दिवसाची नाही, तर ती गेल्या चार महिन्यांपासुनची आहे. त्यामुळे येथे थेंबे-थेंबे कोरोना साचे असे असले तरी एक-एक करुन येथील कोरोना बरा करण्यात देखील डॉक्टरांना यश आले आहे. हे देखील अधोरेखीत केले पाहिजे. नगर जिल्ह्यात ही संख्या भलेही आज ३ हजार ७३६ असोत, परंतु त्यात बरे झालेले २ हजार २८५ इतके रुग्ण आहेत. तर संगमनेरमध्ये ही संख्या भलेही सहाशेपर्यंत पोहचली आहे. मात्र, यापैकी 400 रुग्ण ठणठणीत होऊन कधीच घरी गेले असून त्यांनी त्यांची कामे देखील सुरू केली आहेत. तर आपल्याला कोरोना झाला होता हे देखील ते विसरून गेले आहे. तर अकोल्यातही 80 पैकी 65 रुग्ण बरे झाले आहेत. असे असूनही मात्र आजूनही काही लोकांच्या मनात कोरोनाविषयी भिती आहे. म्हणूणच की काय? कोरोनाशी फाईट देण्यापुर्वीच काहींनी आपले "प्राण सोडले" आहे. मात्र, तुम्ही एक गोष्ट लक्षता घेतली पाहिजे की, या रोगाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. कारण, संगमनेरात मृत्यूचा दर अगदी दोन-तीन टक्क्यांवर आहे आणि तो देखील 60 ते 70 च्यापुढे वयोवृद्ध व्यक्तींनी कोरोनापुढे हार पत्कारली आहे. त्यामुळे, आपण संशयित असाल, बाधित असाल तर फक्त लढायला विसरू नका आणि कोरोनाला घाबरु नका. ही आकडेवारी म्हणजे केवळ एक बागुलबुवा भासविणारा असून याला धैर्याने सामोरे जाणे आणि स्वत:ची काळजी घेणे हाच संदेश "सार्वभौम" व प्रशासन आपल्याला देत आहे.
दरम्यान डॉ. अरविंद कुशवह आणि डॉ. सितीकांता बॅनर्जी या दोन केंद्रीय पथकाच्या सदस्यांकडून जिल्हा प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक योजनांचे कौतुक करण्यात आले. त्यावेळी त्यांनी कोविड योद्ध्यांचा केलेला हा शब्दगौरव!
                             
                   खरंतर संगमनेरात रोज मोठ्या संख्येने कोरानाचे रुग्ण मिळून येत आहे. मात्र, त्या पाठोपाठ रुग्ण बरे होण्याऱ्यांची संख्या देखील तितकीच प्रगतीपथावर आहे. हे देखील जनतेच्या लक्षात आणून देणे सार्वभौमला अनिवार्य वाटते आहे. म्हणून संगमनेरकरांनो वास्तव असे आहे की, आजवर तालुक्यात 597 रुण मिळून आले आहेत. त्यापैकी 378 रुग्ण अगदी ठणठणीत बरे झाले आहेत. तर आज केवळ 198 रुग्णांवर उपचार सुरू असून 19 जणांनी कोविड-19 समोर हार पत्कारली आहे. म्हणजे सरासरी 85 टक्के रुग्ण बरे होत असून कोरोनापासून धोका नाही तर फक्त यापासून काळजी घेणे अपेक्षित आहे. खरंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु डेंग्यु, मलेरीया यांसारखे संसर्गजन्य आजार झाले तरी लोक मरण पावतात, तुलनेत संख्या नक्कीच कमी असेल मात्र, कोरोनाचा जो बागुलबुवा उभा केला आहे. त्यानेच लोक जास्त मृत्यू होताना दिसत आहे. याचे उदा. म्हणजे आश्वी परिसरातील 45 वर्षीय तरुण अगदी संशयित म्हणून जातो आणि अवघ्या तासात मयत होऊन त्याचा अंत्यविधी होतो! त्यामुळे हा आजार शरिरात कमी तर मनाला जास्त भिडतो, कोरोनाचा किडा नव्हे तर शंकेचा किडा आपल्या मनात वळवळ करतो आणि तेव्हापासून खरा प्रदुर्भाव सुरू होतो. त्यामुळे स्वत:चे मन धिट करा, असला तरी माणूस मरत नाही, नसला तर उगच भितीने का मरावे? असे स्वत:शी बोेला. स्वत:च्या पाठीवर हात ठेवा आणि फक्त स्वत:ला लढ म्हणा.!
                                यापलिकडे तुमच्या माहितीस्तव सांगावेसे वाटते की, अनेकांना वाटते मला कोरोनाची लागण नाही, सर्दी, खोकला नाही, कणकण व ताप नाही. तरी देखील हे प्रशासन मनस्ताप का देत आहे. मात्र, यामागे काही दडलेले वास्तव असे आहे की, कोरोना तीन स्टेपमध्ये तपासला जातो. त्यात सौम्य, मध्यम व गंभीर अशा प्रकारे त्याची लगण होत असते. ज्यांना अगदी नुकताच प्रादुर्भाव झाला आहे आणि त्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्याला या आजाराचे परिणाम जाणवत नसले तरी ती एक सुरूवात असते. त्यामुळे, आरोग्य विभाग, स्वॅब मशिन किंवा डॉक्टरांना दोषी धरणे चुकीचे आहे. तर ज्याला गंभीर स्वरुपाचा प्रादुर्भाव आहे म्हणून तर अकोले तालुक्यातील माणिक ओझर येथील एक बाधित व्यक्ती एक ना दोन तब्बल 11 जणांना बाधित करतो. त्यामुळे, हा आजार हाताबाहेर जाऊन आपले कुटुंब आणि समाज यांची अधोगती करण्यापेक्षा तत्काळ उपचार घेतलेले बरे नाही का?
                           आता आजचा कोरोना उद्या निघून जाईल, एव्हाना नामशेष देखील होईल. मात्र, दुर्दैवाने या कोविडने अनेक गोष्टी लोकांना जगायला शिकविल्या. कितीही प्रेम करा, पण वेळ आली की कोण कोणाच्या कामी पडत नाही. जन्मदात्या आईने सुद्धा लेकराला स्विकारले नाही म्हणून त्यांने आत्महत्या केल्याच्या घटना आपण एकल्या. तर कोठे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे देखील पाहायला मिळाले. सामाजाने हिनविले म्हणून कोणी देह त्यागला तर कोणी वैराग्य धारण केले. आपल्या रक्ताच्या नात्याला देखील लोकांनी अस्पृश्यतेची वागणूक दिली तर काही नतदृष्ट लोकांनी कोरोना झालेल्यांना वाळीत टाकल्याचे पहायला मिळाले. म्हणजे कोरोनाशी लढताना तेथे एकोप्याची गरज होती तेथे समाजद्रोह दिसून आला तर काही ठिकाणी कोविड योद्ध्यांचे दमदार स्वागत झाले. त्यामुळे जे रोग्याशी लढले त्यांचा निषेध केलाच पाहिजे तर जे रोगाशी लढले त्यांचे कौतुकच केले पाहिजे. त्यामुळे प्रशासन तुम्हाला विनंती करीत आहे. की, कोणाच्या भावनांशी खेळू नका, बाधितांचा अनादर करु नका, बळ द्या, लढ म्हणा, सहकार्य करा. कारण, तुमचा एक चुकीचा शब्द एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करु शकतो तर एखादा चांगला शब्द त्याच्या जगण्याला उर्मी देऊ शकतो. हे तुम्ही कधीच विसरु नका.

  * काय करावे?
*तोंडाला मास्क लावा
*शक्यतो बाहेर पडणे टाळा
*गर्दीची ठिकाणे टाळा
*सॅनिटायझरचा वापर करा
*दोघांत योग्य अंतर ठेवा
*बोलताना,शिंकताना काळजी घ्या
*लहान वृद्धांना सांभाळा
*प्रशासनाचे नियम पाळा
*बाधित व्यक्तींना धिर द्या

* संरक्षण म्हणून काय कराला

*शक्यतो कोमट पाणी प्या
*शंका वाटल्यास वाफ घ्या
*सकस आहार कायम ठेवा
*काढा पिण्याची सवय ठेवा
*खाण्यात थंड पदार्थ टाळा
*डॉक्टरांशी बोलून निरसन करा
*वारंवार आपले हात धूवा
- सागर शिंदे

--------------------------------------
 शेतकरी पुत्रांनो,! आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 76 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
टिप :- राजकीय जाहिराती किंवा पेडन्युज स्विकारल्या जात नाहीत.!

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 76 लाख वाचक)