अबब... साहेब.! आता तरी संगमनेर शहरात प्रशासक नेमा!, एकच दिवशी 60 रुग्ण आणि दोन मयत!


सार्वभौम (अकोले) :-
                       संगमनेर तालुक्यात कोरोनाला आळा घालताना आता प्रशासनाच्या नाकीनव आले आहे. रोज 20, 30, 40, 50 अशी आकडेवारी समोर येऊ लागल्याने ते तरी काय करतील? किती व कोठे-कोठे कंटेनमेंटची थिगळं लावत बसतील? उलट त्यामुळे प्रशासकीय अधिकार्‍यांचे कुटुंब धोक्यात येऊ लागले आहे. काल एकाच दिवशी तब्बल 60 रुग्ण कोरोना बाधित मिळून आले आहेत. तर कुरण येथील 45 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह पुरूष मयत झाला असून निमज येथील 75 वर्षीय संशयित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. ही दोघे एका खाजगी रुग्णालयात मयत झाले आहेत. त्यामुळे, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून शासनाच्या हट्टापोटी नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचे काम सुरू आहे की काय? असा आरोप आता सुज्ञ व्यक्तींकडून होऊ लागला आहे. कारण, संगमनेर बंद तर नकोच, मात्र, जो रोजचा चकीत करणारा आकडा आहे, त्यावर तरी वेगळी काहीतरी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. परंतु त्यासाठी कोणीच का काही प्रयत्न करीत नाही? असा प्रश्न संगमनेरकरांनी उपस्थित केला आहे. आज शहरात रोज नवीन एक गल्ली कोरोनाचा शिकार होत आहे. यावर आळा बसविणे नगरपालिकेला जमत नसेल किंवा यंत्रणा कमी पडत असेल तर येथे सक्षम प्रशासक का नेमू नये? असे एक ना अनेक प्रश्न घेऊन येथील नागरिक आता पुढे येऊ लागले आहेत.
                 संगमनेर तालुक्यात नेमके कोण कोठे कमी पडते आहे. हे सर्वांना दिसते आहे. मात्र, यात सामान्य व्यक्तींची प्रचंड फरपट आणि लुट होताना दिसते आहे. वास्तव पाहिले तर महसूल प्रशासन येथे कसोशीने काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, नगरपालिकेवर एखादा खमक्या प्रशासक नेमण्याची नित्तांत गरज भासू लागली आहे. येथे फार नात्यागोत्याचे आणि राजकीय दृष्टीकोणातून एकमेकांना सांभाळा-सांभाळी होताना दिसते आहे. मात्र, यावर कोणी ब्र काढायला तयार नाही. आज निव्वळ शहरात 260 रुग्ण असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे नगरसेवक बाधित, येथे अधिकारी बाधित, येथे मटक्यावाले बाधित, येथे कत्तलखाण्यावाले बाधित, येथे दारु, जुगार आणि राजकारणी देखील बाधित मिळून येऊ लागले आहे. आता नेमके काय पहायचे बाकी आहे.? महसूल प्रशासनात फारसे राजकारण नाही, त्यामुळे त्यांचे काम त्यांच्या परिने सुरू आहे. त्याचे उत्तम उदा. म्हणजे त्यांनी कुरण सारखे ठिकाण आज किती कवर केले आहे. तर मग शहर अटोक्यात आणण्याचे काम कोणाचे आहे? लोकांना विश्वास पटत नाही की, संगमनेरसारख्या ठिकाणी चक्क महसुलमंत्र्यांच्या गावापासून तर ते राहणार्‍या गल्लीपर्यंत कोरोनाने थैमान घातले आहे. इतकेच काय! येथे जी एकहाती नगरपालिका आहे तिच्या अंतर्गत देखील प्रत्येक गल्लीबोळात रुग्ण मिळून येत आहे. तर मतदारसंघात कोरोनाने आत 600 कडे वाटचाल केली आहे. म्हणजे जे राज्याचा कारभार चालवितात ते तालुक्यात कोरोना अटोक्यात आणण्यासाठी सफसेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे, त्यांनी येथे सुनिल कडासणे, प्रशांत खेडकर यांच्यासारखे अनुभवी व खमके अधिकारी काही दिवस विशेष पथक किंवा प्रशासक म्हणून आणले पाहिजे. खरंतर संगमनेर बंद ठेवणे हा योग्य पर्याय मुळीच नाही. मात्र, ही रोज पंन्नाशीने वाढणारी संख्या देखील योग्य नाही. हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे साहेबांनी येथे वेगळी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. असे संगमनेरकरांना वाटते आहे.
                              आज संगमनेर शहरात व तालुक्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे.? काही जिल्ह्यात महिन्याची आकडेवारी नाही तितकी संगमनेरात रोजची आहे. कालचा विचार करता राजापूर येथे 21 वर्षीय महिला, जवळे कडलग येथे येथे 27 वर्षीय महिला, जेधे कॉलनी येथे 50 वर्षीय पुरुष, कुरण रोड येथे 52 वर्षीय पुरुष, रायते येथे 70 वर्षीय महिला, संगमनेरात अशोक चौक येथे येथे 6 वर्षीय मुलगा, पद्मानगर येथे 80 व 68 वर्षीय महिला तर 41 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 52, 39, 14, 06, अवघ्या दोन वर्षीचा मुलगा, तर 2 वर्षाची चिमुकली देखील. तसेच 33 वर्षीय महिला, सुकेवाडी येथे 23 वर्षीय पुरूष, धांदरफळ बु येथे 27 वर्षीय पुरुष, उंबरी बाळापूर येथे 27 वर्षीय पुरुष, निमोण येथे 42 वर्षीय पुरुष, वरुंडी पठार येथे 50 वर्षीय पुरुष, संगमनेर शहरात शनिमंदीर येथे 45 वर्षीय पुरुष, सावित्रीबाई फुले नगर येथे 44 वर्षीय पुरुष तर 37 वर्षीय महिला, त्याच प्रमाणे कुरण रोड येथे 52 वर्षीय महिला, शहरातील दिल्ली नाका येथे 45 वर्षीय महिला, निमोण येथे 38 वर्षीय पुरुष, निमगाव बु येथे 62 वर्षीय पुरुष, जानता राजा मार्ग येथे 60 वर्षीय पुरुष, ऑरेंज कॉर्नर येथे 78 वर्षीय महिला, संगमनेर शहरातील मेन रोड येथे 75 वर्षीय पुरुष असे अहवाल प्रशासनाला सायंकाळी मिळाले होते. तर रात्री उशिरा मिळालेल्या अहवालात देखील 27 अहवाल प्राप्त झाले आहेत.
                           यात अकोले तालुक्याच्या जवळ मंगळापूर येथे 62 वर्षीय महिला, जनता नगर येथे एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 74 वर्षीय पुरुष, तर 55, 21, 45 वर्षीय महिला यांचा सामावेश आहे. तसेच जोर्वे म्हणजे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात साहेबांचे गाव येथे तर कोरोनाचे आता थैमान घालायला सुरूवात केली आहे. तेथे एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात 57 वर्षीय पुरुष, 28 व 40 वर्षीय महिला तर अवघ्या 6 वर्षाच्या मुलाला कोरोनाने ग्रासले आहे. हे साहेबांच्या गावातील परिस्थिती आहे. तर घुलेवाडी येथे देखील 36 व 31 वर्षीय पुरुष आणि 59 वर्षीय महिला अशा एकाच कुटुंबाला कोरोनाने घेरले आहे. संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभे येथे देखील 25 व 23 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 59 व 29 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे 78 वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली येथे 29 वर्षीय तरुणी, घोडेकर गल्ली येथे 27 वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथे 50 व 48 वर्षीय पुरुष, माऊली येथे 70 वर्षीय पुरुष, नांदरखंदरमाळ येथे 37 वर्षीय पुरुष तर जेधे कॉलनी येथे 16 वर्षीय तरुण तर 21 वर्षीय तरुणी अशा 27 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे काल एकाच दिवशी सरकारी अहवाल 18, तर खाजगी 7 असे 25 तर रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये पॉझिटीव्ह मिळून आलेले 36 असे मिळून 60 रुग्ण एकाच दिवशी बाधित मिळून आले आहेत. तर कुरण येथे एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर निमज येथे एक संशयित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारी आकडेवारीनुसार 589 कोरोना बाधित तर 19 जणांची नोंद मयत म्हणून झाली आहे. तर या व्यतिरिक्त खाजगी आकडा पाहिला तर अनेकांच्या भुवया उंचावेल असा आहे.
 - सागर शिंदे
--------------------------------------
 शेतकरी पुत्रांनो,! आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 76 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
टिप :- राजकीय जाहिराती किंवा पेडन्युज स्विकारल्या जात नाहीत.!

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 75 लाख वाचक)