बेकायदा खत विकल्याची तक्रार केल्यामुळे दुकानदाराने शेतकर्‍यास घरात घुसून मारले! आठ जणांवर गुन्हा!


सार्वभौम (संगमनेर): 
                     राज्यात सध्या कोरोनामुळे शेतीची बियाने व युरीया तसेच अन्य साधन सामग्रींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशात काही शेतकरीद्रोही आणि नतद्रष्ट लोक शेतकर्‍यांची पिळवणूक करताना दिसत आहे. कोणी बनावट बियाने देत आहे तर कोणी साठा असून पुरवठा करायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. तर काही शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे देशाचा पोशिंदा आता हतबल झाला असून काही दुकानदार त्यांचा अंत पाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आाहे. असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यातील जवळेबाळेश्वर येथे पहायला मिळाला आहे.
                               
त्याचे झाले असे की, पोपट बाळु पांडे (रा. जवळेबाळेश्वर, ता. संगमनेर) यांना त्यांच्या गावातील एका दुकानात गफला होत असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या लक्षात आले की येथे बेकायदा खतांची विक्री होत आहे. त्यामुळे त्यांनी एक सगज व जागरूक शेतकरी म्हणून ही तक्रार थेट तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली. आता खरं बोललेलं आणि पितळ उघडं पाडलेलं कोणाला पटतं का? त्यामुळे दुकानाचा मालक तुकाराम रावबा पांडे यांनी पोपट यांनी ग्रामपंचायत जवळ शिवीगाळ, दमदाटी केली.  त्यानंतर देखील हा प्रकार मिटला नाही. दुकानदार यांच्या मुलांनी म्हणजे सोमनाथ तुकाराम पांडे, सुनिल तुकाराम पांडे, सविता सोमनाथ पांडे, राणी सुनिल पांडे, सखुबाई तुकाराम पांडे, रामदास सोपबा पांडे, आशा रामदास पांडे (सर्व रा. जवळेबाळेश्वर, ता. संगमनेर) या आठ जणांनी मिळून पोपट यांच्या घरात घुसून त्यांना टामीने मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादीनुसार घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान असे प्रकार घडत असेल तर बेकायदेशीर कृत्यांना उघडे करण्यासाठी कोणी धजणार नाही. त्यामुळे, या घटनेची सखोल चौकशी करून जर यात तत्थ असेल तर आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.