अकोल्याच्या कृष्णावंती नदित तरुणाच्या खांडोळ्या-खांडोळ्या करुन फेकल्या.!
सार्वभौम (राजूर) :
अकोले तालुक्यातील वाकी परिसरात कृष्णावंती नदित एका २५ वर्ष तरुणाचे तुकडे-तुकडे करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मृतदेह कोणाचा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून नदिच्या कडेला एका गोणीत काहीतरी तरंगलेले दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. या परिसरात दुर्घांधी का येते हे पाहण्यासाठी लोक गेले असता गोणीत एका मृतदेहाचे तुकडे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्थानिक लोकांनी राजूर पोलिसांना माहिती दिली असता राजूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे, राजूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या तीन ते चार तिवसांपुर्वी कोणाचे तरी वाद झाले असावे. त्याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी गुन्हेगारी आणि अशा प्रकरच्या खांडोळ्या केल्याच्या हत्या पाहिल्या तर त्याला अनैतिक संबंधाचे वलय असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, हा तरुण कोण आणि याची हत्या कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. या मृतदेहाला इतके छिन्न विछिन्न करण्याचे कारण काय! हे शोधण्यासाठी पोलिसांनी आपली यंत्रणा कामाला लावली आहे. हा मृतदेह कोठे टाकला असावा, तो वाहत-वाहत कसा आला असा सुक्ष्म तपास आता आरोपीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. सध्या हा तरुण कोण आहे, कुठला आहे हेच शोधण्यासाठी पोलिसांना पहिली मिसिंग शोधावी लागणार आहे. तर पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या मदतीने जवळपासच्या गावांमध्ये कोण हरविले आहे याचा शोध घ्यावा लागणार आहे. त्याचे नाव-गाव शोधणे फारसे कठीण नसले तरी त्याची हत्या कोणी केली, त्याचे कारण काय? हे शोधणे मोठे आव्हाणात्मक असणार आहे. तसेही देवगाव परिसरात एका अर्भकाची हत्या झाली होती. तो गुन्हा देखील अद्याप कायम तपासावर आहे. त्यातच आता हे नवे आव्हाण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
दरम्यान राजुरचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना ही माहिती समजताच त्यांनी स्वत: लक्ष घालून या घटनेचा शोध सुरु केला आहे. सध्या हा मृतदेह ताब्यात घेऊ त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेचा तपास तत्काळ लावला जाईल अशी खात्री पोलिसांनी दिली आहे.
संकेत सामेरे