महसुलमंत्री बाळासाहेब थोरात होमक्वारंटाईन, त्यांचा फोन ऑपरेटर आला पॉझिटीव्ह!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्याचे आमदार तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात हे स्वत:हून होमक्वारंटाईन झाले आहेत. कारण, त्यांच्या मुंबई येथील हाऊसमध्ये जो टेलिफोन ऑपरेटर होता त्यास कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात असलेल्या तब्बल 20 जणांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी घेतले असून त्याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ना. बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात कोरोनाने कहर घातला आहे. तब्बल 12 जणांचा मृत्यू तर 150 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. अशात ना. थोरात यांचा देखील कोरोना बाधित व्यक्तीशी संपर्क आल्याचे बोलले जात होते. एक दक्षता म्हणून त्यांनी सावध भुमिका घेत स्वत:ला मुंबईत होमक्वारंटाईन करुन घेतले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात त्यांच्या चाहत्यांनी देवाकडे सुखरूपतेचे साकडे घातले आहे. ना. बाळासाहेब थोरात यांनी गेल्या दोन दिवसांपुर्वी संगमनेरात एका आईस्क्रिमच्या दुकानाचे उद्घाटन करुन ते मुंबईला रवाणा झाले होते.
दरम्यान त्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी जो टेलिफोन ऑपरेटर आहे. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. याच दरम्यानच्या काळात हा फोन आणि साहेबांचा संपर्क झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे, कोणतीही रिस्क नको म्हणून त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली असता त्यांनी स्वॅब घेतले असून तुर्तास त्यांनी मुंबईत होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. आता त्यांच्या रिपोर्टकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
यापुर्वी नगर जिल्ह्यातील एका काँग्रेस आमदारास कोरोना झाल्याचे समोर आले होतेे. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या सौभाग्यवती देखील कोरोना बाधित मिळून आल्या आहेत. तर त्यांच्यापुर्वी मंत्री महोदय मुंडे व आव्हाड यांना देखील कोरोना झाल्याचे समोर आले होते. हे सर्व लोकप्रतिनिधी नंतर ठणठणीत झाले आहेत. त्यामुळे कोरोना म्हणजे भिती वाटण्यासारखे काही नसले तरी काळजी घेणे महत्वाचे आहे.