एक अपघात, तिघांचा मृत्यू, खाकी व कंपनीला अभय का? तर ठार मारु! दुसरा गुन्हा दाखल!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पवसा येथे वाळुतस्करी करताना वाहन अपघातात तिघांचा बळी गेला होता. हे प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. याचे कारण म्हणजे पोलिसांचा चोर सोडून सन्याशांना फाशीवर नेण्याचा आटापिटा सुरू असल्याचे बोलले जात आहे. कारण, या वाहनाच्या मागे जो खाकीतील कर्मचारी लागला होता. त्याचे काय झाले हे कळेना, ज्या कंपनीने ही काम घेतले होते. त्या कंपनी मालकाला पाठीशी का घेतले जात आहे हे देखील कळेना. मात्र, भलत्याच लोकांच्या चौकशी सुरू असून त्यामुळे मारामार्या आणि वेगळाच जातीयवाद यात सुरू झाल्याचे दिसते आहेे. त्यामुळे, या गुन्ह्यात पोलीस मर्मावर बोट का ठेवत नाही! याबाबत अनेकांनी साशंकता व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार दि. 28 रोजी पहाटे वाळुने भरलेली एक झेनॉन गाडी निळवंडे कॉनॅलच्या खड्यात कोसळली व त्यात दुदैवी तिघांचा मृत्यू झाला. आता या घटनेला कारणीभूत कोण? हे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला. मात्र, ते मर्मावर बोट ठेवायला तयार नाहीत. पोलिसांनी या घटनेला जबाबदार धरले ते रस्ता कॅन्ट्रॉक्टर आणि अभियंता. मात्र, त्यांनी कंपनीस जबाबदार धरले नाही. कारण, ही कंपनी एका बड्या नेत्याच्या अगदी जवळच्या नातगलाची आहे. त्याला पर्याय म्हणून अभियंता पुढे करीत पहिला प्रश्न कंपनी मालकास झाकण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे जेव्हा पोलीस एखाद्या कत्तलखान्यावर छपा टाकतात तेव्हा चालकासह जागा मालकावर देखील गुन्हा दाखल करतात, एखादी गाडी पकडली तर त्या चालकासह मालकालाही आरोपी करतात. मग येथे मालकास का सुट मिळाली. याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.आता एकवेळी यांना आरोपी केले नसते तरी चालले असते. मात्र, ज्या तिघांचा बळी गेला. त्याचे मुळ कारण काय होते हे शोधले असते तर फार भयानक माहिती समोर आली असती. कारण, श्रीरामपूर विभागीय कार्यालयातील एक खाकीतील कर्मचारी या वाहनाच्या मागावर होता. जसा नगरच्या गुन्हे शाखेचा कर्मचारी प्रवरा नदीच्या पात्रात आपले ठाण मांडतो, तसे हा श्रीरामपूर येथील एक कर्मचारी सगळ्या उत्तरेत मनसोक्त फिरत असतो. त्या दिवशी देखील तो एका वाळुतस्कारच्या झायलो गाडीतून या वाहनाचा पाठलाग करीत असल्याचे बोलले जात आहे. कदाचित हेच कारण त्या तिघांच्या मृत्युचे बनले असावे असे बोलले जात आहे. मात्र, पोलीस त्या दृष्टीने आता काय तपास करतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. खरंतर संगमनेरात आजकाल खाकी गुटख्यांना अभय देत आहे तर कोणी वाळुतस्करीला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे खरोखर वरिष्ठ अधिकार्यांचा काही दबदबा आहे की नाही? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. या घटनेकडे पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक व पोलीस उपाधिक्षक यांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
आत यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जे तरुण मुले मयत झाले आहेत. त्यांना ही कामे करण्यासाठी कोण प्रवृत्त करीत होते? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. ही बातमी काही व्यक्तींना समजली असता त्यांनी थेट मयत मुलांचे घर गाठले. विठ्ठल मुरलीधर बर्डे या तरुणाच्या घरी जाऊन त्यांनी धिंगाणा घातला. त्या अपघातात जर आमची नावे आली तर तुम्हाला मारुन टाकू, इतकेच काय! गाव प्रवेशाला देखील मज्जाव केला. त्यामुळे, कोंची येथे मयत मुलाच्या घरासमोर हा राडा घालण्यात आला. त्यांच्या घरासमोर जाऊन जातीवाचक शिवीगाळ करीत धमकी देण्यात आली. आता याप्रकरणी गोरख जोंधळे व बळी शिंगोटे (रा. कोकणगाव, ता. संगमनेर) या दोेघांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोलीस उपाधिक्षक रोशन पंडित करीत आहे. विशेष म्हणजे पंडीत यांना जर या घटनेचे मुळ शोधले तर त्यांच्यासमोर हा सर्व प्रकार क्षणात समोर येऊ शकतो. त्यामुळे यात आता किती खोलवर जायचे हे त्यांच्या अधिकारक्षेत्रात असणार आहे.! फक्त यात चोर सोडून सन्याशांना फाशी झाली नाही म्हणजे बरे..!