सराफावरील दरोड्याचा प्लॅन फसला, संगमनेरात दहा दरोडेखोर जेरबंद, शस्त्रास्त्रांसह 24 लाखांचा मुद्देमाल!

सार्वभौम (संगमनेर) :- 
                        संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात गेल्या आठवड्यात एका हॉटेलवर दरोडा पडतो कोठे नाहीतर आज घोटी राज्यमार्गावर असलेल्या चिंचपुर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पाठलाग करुन आश्वी पोलीसांनी दहा दरोडेखोरांसह दोन मालवाहतूक ट्रक, एक मालवाहतूक पीकअप व घातक शस्त्रे असा सुमारे 23 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर याच टोळीतील दोन दरोडेखोर अद्याप फरार झाले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या लुटारु दरोडेखोरांकडून अन्य गुन्ह्यांची उकल करण्याचे काम सुरू आहे.
                 याबाबत पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलिस नाईक शांताराम झोडगे, आनंद वाघ, होमगार्ड अमोल सहाणे, माजी सैनिक दामोदर भोसले याच्या समवेत आम्ही गस्त घालत होतो. यावेळी लोणी-संगमनेर रस्त्यावरील चिंचपूर शिवारात असलेल्या वृंदावन हॉटेल समोर दोन मालवाहतूक ट्रक (एम.एच. 10 ऐडब्ल्यू. 71) व (एम.एच. 40 बीएल 5569, तसेच एक पिकअप व्हॅन (एम.एच. 25 ऐजे 2148) या तीन वाहणांनमध्ये संशयास्पद हालचाली दिसले होते. त्यानंतर आम्ही चौकशीसाठी तेथे जात असताना पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून ट्रक मधील 8 ते 9 व पिकअप मधील दोघे अंधारात पळाले. त्यामुळे आम्ही पाठलाग करुन अरुण उर्फ बिभिषण काळे (वय 30 रा. कन्हेरवाडी फाटा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) व समाधान शहाजी घुमरे (रा. आदोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या दोघाना पकडले. यावेळी त्यांच्या वाहनांची तपासणी केली असता त्यात लोखंडी कटर, धारदार सुरा, लोखंडी कटावण्या, गज अशी घातक हत्यारे मिळून आली.
                           
पकडलेल्या दोघाकडे पळून गेलेल्याची माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, नाना भास्कर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे, बाबुशा भिमराज काळे, बिभिषण राजाराम काळे, रमेश लगमन काळे, सुभाष ऊर्फ हरी ऊर्फ दादा भास्कर काळे, चदंर ऊर्फ चदंर्‍या भास्कर काळे, सुधाकर श्रावण भगत, नवनाथ बाळू काळे व बाबू अनिल शिदें सर्व कळंब तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) हे रहिवासी पळाल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही लोणी व नगर नियत्रंण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानतंर इतर आरोपीचा शोध घेतला असता कोल्हार (ता. राहाता) येथून नाना भास्कर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे व बाबुशा भिमराज काळे यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांना विचारले असता माहिती देण्यास टाळा-टाळ केले. मात्र, खाकीची भाषा सुरू होताच सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकणार असल्याची माहिती सांगितली.
- सुशांत पावसे