तिकडे कोरोनाने 14 वा बळी गेला आणि शेजारी वाळु उपसा जोरात सुरू! संगमनेरची घोडदौड!
संगमनेर (सार्वभौम) :
संगमनेर तालुक्यातील कसारा दुमाला येथे आज सकाळी कोरोनाचा 14 वा रूग्ण मयत झाला. त्यामुळे, तालुक्याला पुन्हा मोठा धक्का बसला असून नागरिकांनी प्रशासनाच्या भरवशावर न बसता स्वत: काळजी घेणे आवश्यक झाले आहे. सध्या संगमनेर शहरात 8 मयत, धांदरफळ 1, निमोण 2, डिग्रस 1, पळासखेडे, कसारा दुमाला 1 अशा 14 जणांनी अखेरचे श्वास घेतले आहेत. तर 232 जण कोरोना बाधित मिळून आले आहेत. यात 219 मुळ रहिवासी असून 16 जण तालुक्याबाहेरील आहेत. 232 पैकी 139 रुण बरे होऊन घरी परतले आहेत आणि 80 जणांवर उपचार सुरू आहेत. तर नगर शहरात एका 24 वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी गेला आहे. तसेच आज सकाळी नगर शहरातील 15 जणांना तर श्रीगोंदा 7 व पारनेर तालुक्यातील एक व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत.
होऊद्या गर्दी.! बिनधास्त! |
काल संगमनेरातील एका खाजगी रुग्णालयातून 10 कोरोनाचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यात एक नगरसेवकासह मोठ्या व्यापार्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यात 9 संगमनेर तर एक अकोले शहरातील कारखाना रोड असे 10 रुग्ण होते. म्हणजे आता कोरोनाने तहसिल कार्यालयानंतर नगपालिका आणि साहेबांच्या पाहुण्यांपर्यंत मजल मारली आहे. तरी देखील येथील लोक कोणत्याही प्रकारची काळजी घेताना दिसून येत नाही. ही फार शोकांतीका असल्याचे दिसत आहे.
कसारा दुमाला येथे दुर्दैवाची बाब अशी की, जो व्यक्ती मयत झाला आहेे. तो दुध वाटण्याचे काम करत होता. तर त्याच्या घरातील अन्य सदस्य घरोघरी पाण्याचे जार देण्याचे काम करीत होते. त्यामुळे हे गाव कंटेनमेंट करण्यात आले होते. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या गावात दारुपासून तर वाळु तस्करीपर्यंत कोणताही अवैध धंदा बंद नव्हता. इतकेच काय! जेव्हा सकाळी हा व्यक्ती मयत झाल्याची माहिती समजली तेव्हा देखील अगदी सकाळी-सकाळी वाळु तस्करांचे स्मशानभुमिच्या परिसरात वाळु काढण्यासाठी काम युद्धपातळीवर सुरू होते. ज्या आजवर येथे दोन व्यक्ती मिळून आलेल्या असताना देखील या भागातील लोक अवैध धंद्यांसाठी बाहेर पडतात म्हणजे संगमनेरात कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे. हे लक्षात येते.
हे जर असेच सुरू राहिले तर मानसे मरत राहतील, प्रशासन आकडे टिपत पाहिल. हे कागदी घोडे घोडे नाचविणे आणि सांगितले आहे, नियम आहे, वरिष्ठांचे आदेश आहे. म्हणून असल्या पाट्या टाकण्याचे काम होत असेल तर खरोखर संगमनेरात येणारा काळ आता मालेगाव नव्हे तर चिन आणि अमेरीका सारखा होऊ शकतो. त्यामुळे, जोवर नागरिक दक्षता घेत नाही आणि प्रशासन प्रॉपर काम करीत नाही. तोवर संगमनेरातून कोरोना हटत नाही. हेच वास्तव आहे.