संगमनेरात कोरोनाचा 13 वा बळी, अकोल्याचे 23 अहवाल प्राप्त.!

- sushant pawse
सार्वभौम (अकोले/संगमनेर) :
                               संगमनेर शहरातील श्रमीकनगर येथे चार दिवसांपुर्वी एक कोरोना बाधित रुग्ण मिळून आला होता. आज सकाळी तो एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा व्यक्ती 65 वर्षाचा असून तो संगमनेरमधील 13 वा बळी ठरला आहे. विशेष म्हणजे संपुर्ण जिल्ह्यात कोरोनाचे मयत रुग्ण 19 असून त्यापैकी 13 रुग्ण एकट्या संगमनेरचे आहे. त्यामुळे, येथे कोरोनाचा वास्तव्य किती भयानक आहे. हे नव्याने सांगायला नको.
                           
यापलिकडे अकोले तालुक्यात पिंपळगाव निपाणी येथे एका कांदा व्यापार्‍यास कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याच्या पत्नीला देखील या आजाराला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आरोग्य प्रशासनाने त्या गावातील 23 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. आज दुपारी हे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात कोणालाही कोरोनाची बाधा झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तालुक्यासाठी ही एक महत्वाची बाब आहे. असे असले तरी हे गाव शनिवार पर्यंत  बंद ठेवण्यात येणार असून गावकर्‍यांनी घाबरुन न जाता केवळ स्वत:ची काळजी घेत प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन स्थानिक कोरोना प्रतिबंधक समितीने केले आहे. तर धुमाळवाडी ते शिवाजीनगर या परिसरातील जी शिक्षक महिला कोरोना बाधित मिळून आली होती. त्यांच्या सानिध्यात आलेल्या तिघांचा रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे.
अकोल्यातील परिस्थिती तशी फार अटोक्यात आहे. मात्र, संगमनेरात कोरोनाचा कहर थांबता थांबत नाही. येथे रोज दोन अंकी आकडे कोरोनाने ग्रासत आहे. आत पुन्हा शहरात एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे येथे काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या  संगमनेर शहरात 8 जणांनी या महामारीसमोर हतबल होऊन अखेरचा श्वास घेतला आहे. तर धांदरफळ 1, निमोण 2, डिग्रस 1, पळसखेडे 1 असा 13 जणांना कोरोनाची बाधा होऊन ते मयत झाले आहेत. या व्यतीरिक्त 150 जणांना आजवर कोरोनाची लागण झाली असून 100 जण बरे होऊन घरी परतले आहे. तर सध्या 39 जणांवर संगमनेर व नगर येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे  ही अकडेवरी पाहता संगमनेर तालुका कोरोनाच्या विळख्यात अडकला असून येथे वेगळी यंत्रणा उभी करण्यासाठी काहीतरी अमलबजावणी करणे अपेक्षित आहे.