संगमनेरात पोलिसांनी 11 वाळुतस्करांच्या मुसक्या आवळल्या! लाखोंचा मुद्देमाला जप्त, रिक्षांचा गैरवापर!
सार्वभौम (संगमनेर) -
संगमनेर शहरात पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी रिक्षातून वाळु तस्करी करणार्यांवर मोठी कारवाई केली आहे. एकाच दिवशी चार जणांची वाहने पकडून त्यांच्यावर गुन्हे ठोकले आहेत. त्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर आश्वी पोलिसांनी देखील एकावर कारवाई केली आहे. घारगाव अंतर्गत चालणारा वाळु उपसा मात्र, राजरोस सुरू असून तेथे ना महसुलला कारवाई करण्यासाठी वेळ आहे ना पोलीस प्रशासनाला त्यामुळे, तेरी भी चूप, मेरी भी चूप अशा पद्धतीने सर्व काही अलबेले असल्याचे चित्र दिसत आहे. या पलिकडे अकोले तालुक्यात देखील राजरोस वाळुच्या गाड्या भर दिवसा शहरातून जातात. तुम्हाला धक्का बसेल पण खाकीच्या संरक्षणात हा दिवसा आणि रात्रीस खेळ चाले असे उपक्रम सुरू आहे. मात्र, वरिष्टांनाच चौकशीली, आदेशाला आणि कारवाई करण्याला लॉकडाऊन लागला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवार दि. 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरालगत प्रवरा नदीपात्रात काही लोक वाळु काढत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभय परमार यांना मिळाली होती. त्यांनी तडक गांगाघाट गाठला. नदीपात्रात जाऊन तेथे काही रिक्षावाले वाळुची वाहतूक करीत असल्याचे लक्षात आले. त्यांनी एकाच वेळी चार रिक्षा व त्यावरील चालक यांना ताब्यात घेतले. त्यांना वाळु चोरीबाबत परवाना विचारला असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागद मिळाले नाही. त्यामुळे या चौघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केला आहेत. त्यात शिवाजी शरद काळन (रा. लालतारा कॉलनी अकोले), भागवत बर्डे (रा. कासारवाडी, ता. संगमनेर), भरत सर्जेराव पवार (रा. कतारगल्ली, ता. संगमनेर), भानुदास राजू आव्हाड (रा. संगमनेर खुर्द) अशा चौघांवर कारवाई केली आहे. यांच्या चार रिक्षा आणि प्रत्येकी अर्धा ब्रास वाळु असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर आश्वी पोलिसांनी देखील सागर ज्ञानेश्वर पाथरे (रा. आश्वी बु. ता. संगमनेर) या वाळु चोरट्यावर कारवाई केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.संगमनेर तालुक्यात अवैध वाळुतस्करांनी व कोरोनाने उच्चांक गाठला आहे. तालुक्यातील प्रवरा व पठारभागावरील मुळा नदीपात्रातुन अवैध वाळू तस्करी करणार्यांच्या शहर पोलीस व घारगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शहर पोलिसांनी 5 लाख 20हजार रुपयांचा तर घारगाव पोलिसांनी 10लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुरुवार दि.16 रोजी प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळु तस्करी सुरू होत असल्याची पोलीस निरीक्षक अभय परमार यांना गोपनीय सुत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संध्याकाळी 11 ते 5 वाजेपर्यंतच्या दरम्यान संगमनेर खुर्द येथील कचरा डेपो परिसरात नंबर प्लेट नसलेला लाल रंगाचा महिंद्रा ट्रॅक्टर व नंबर प्लेट नसलेली हिरव्या रंगाची जीप वाळु वाहताना मिळुन आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता. आवश्यक कोणतेही कागदपत्रे मिळून आली नाही. त्यामुळे त्यांची तपासणी केली असता. ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये एक ब्रास वाळु तर जीपमध्ये वाळु मिळुन आली. यावरून विजय रामचंद्र गोफने वय 40(रा.सायखिंडी) मारुती गोरख गांगुर्डे वय 25 (रा.जाखुरी) इम्तियाज शेख (रा. अलकानगर) सोमनाथ अंबादास वराडे (रा. इंदिरानगर) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास घारगाव पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गाने आळेफाट्याच्या दिशेने जाणारा एक ढंपर एम.एच.42 ए. क्यु. 1904 हटकवला असता. त्यामध्ये वाळु आढळून आली. त्याच्याकडे चौकशी केली असता. वाळु वाहतुकीचा कुठला ही परवाना नाही. त्यामुळे त्या ढंपरची तपासणी केली असता त्यामध्ये चारब्रास वाळु मिळून आली. यावरून पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी चालकास ताब्यात घेऊन 10 लाख 16 हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. याबाबत, पोलीस कॉन्सटेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात ढंपरचा मालक विकास रामनाथ कसबे (रा. खंदरमाळवाडी) व चालक लहू बबन आहेर (रा. म्हसोबाझाप) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, तीन महिने कोरोनासंदर्भात खबरदारी आणि उपायोजनात प्रशासन व्यस्त असल्याने वाळु तस्करांनी डोके वर काढले आहे. तालुक्यातील प्रवरा आणि मुळा नदीपत्रातून मोठ्या प्रमाणात अवैधवाळु तस्करी होत आहे. ऐकिकडे याच अवैधवाळु तस्करीने तिघांचा जीव गमवावा लागला आहे. तर अगदी काल परवा एका वाळुच्या गाडीखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाला, या घटनेला पंधरा दिवस होत नाही तेच तालुक्यात वाळु तस्करी जोमात सुरू असल्याचे दिसते आहे. हे सर्व महसुलमंत्र्यांच्या मतदारसंघात चालु असल्याने चर्चेला उधाण आले आहे. पण, महसुल व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत सातत्याने कारवाई केली. तर त्यास निश्चित आळा बसेल असे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्याना वाटते आहे. अन्यथा संगमनेरात कोरोनाची महामारी आणि वाळु आणि जनावरांची तस्करी हा मुद्दा राज्यभर चेर्चेत राहणारच आहे.