संगमनेरात अंधळ्याकडून सख्या भावाचा भोकसून खून.! बापाची फिर्याद, मुलास अटक
सार्वभौम (संगमनेर) :-
अंध भावाच्या बायकोला शिवीगाळ करुन घालून-पाडून बोलल्याने ती माहेरी निघून गेली. याचा राग आल्यामुळे सख्या भावानेच भावाच्या पोटात चाकू भोकसून त्याचा खून केला. ही घटना बुधवार दि. 22 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यात किशोर मनोहर अभंग (वय 32, रा. माताडे माळा, ता. संगमनेर) या तरुणाचा जागीच मृत्यु झाला आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून साहेबराव मनोहर अभंग (रा. माताडे मळा) यास आरोपी करुन अटक करण्यात आली आहे. त्यास आज न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, साहेबराव अभंग हा काही दिवसांपुर्वी सेंट्रींगची कामे करीत होता. त्यावेळी काम करताना त्याच्या डोळ्यात लोखंडी खिळा उडाला आणि त्याचा एक डोळा त्यात कायमचा अधू झाला होता. दरम्यानच्या काळात त्यावर उपचार झाले नाही त्यामुळे अधू डोळ्याचे इन्फेक्शन दुसर्या डोळ्याला झाले आणि त्याचे दोन्ही डोळे अधू झाले. त्यानंतर त्यास अगदी अंधूक प्रमाणात दिसत असावे असे पोलिसांचे मत आहे. मात्र, त्याने दिलेल्या पाहितीनूसार त्यास काहीच दिसत नाही असे न्यायालयात युक्तीवाद झाला. दरम्यानच्या काळत तो घरी राहत असे मात्र, मयत किशोर अभंग आणि आरोपी साहेबराव याच्या कुटूंबाशी कधी जमले नाही. किशोर हा आरोपीच्या पत्नीस शिवीगाळ करीत असे म्हणून ती माहेरी निघून गेली होती. त्यामुळे आरोपी साहेबराव अधिक तणावाखाली होता.