गोरगरिबांच्या आडून वाळुतस्करांची महसूल अधिकार्‍यांना धक्काबुक्की! घारगाव गुन्हा दाखल!



संगमनेर (सार्वभौम) :-                        संगमनेर तालुक्यात घारगाव येथे अवैधरित्या वाळु तस्करी करणार्‍यांच्या विरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसुलचे मंडल अधिकारी व तलाठी, कोतवाल यांना गाडीतून ओढून शिवीगाळ व धक्काबुकी केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार दि.22 जून रोजी पहाटे पावणे तीनच्या दरम्यान घडला. या प्रकरणी ज्ञानेश्वर बर्डे, संपत बर्डे, उषा बर्डे, गणपत बर्डे (रा.घारगाव, ता. सगमनेर, जि. अ.नगर) या चौघांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                         
याबाबत सविस्तर माहिती अशी की, घारगावचे मंडल अधिकारी बाबासाहेब दातखीळे यांना मुळा नदीपात्रातून अवैधरित्या वाळुतस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी त्यांनी आंबीखालसाचे तलाठी साईनाथ ढवळे व बोट्याचे कोतवाल मिथून खोंड आणि घारगावचे कोतवाल शशिकांत खोंड यांना घेऊन ते कारवाईसाठी गेले. मुळानदीपात्रात कारवाईसाठी जात असताना आरोपींचे घरे नदीलगत रस्त्यातच असल्याने ते रस्त्यात भेटले. ते नदीपात्रात वाळुउपसा करत असल्याचा पुरावा दातखिळे यांच्याकडे असल्याने त्यांनी आरोपीस विचारणा केली असता आरोपींनी अरेरावीची भाषा करत बाचाबाची केली. त्यानंतर महसुलचे पथक पाहणी करण्यासाठी नदीपात्रात गेले. त्यानंतर पुन्हा पावणेतीन वाजता परत स्मशानभूमी मार्गाने येत असताना आरोपीच्या घरासमोर उषा गणपत बर्डे ही महिला महसुलच्या पथकास खाजगी वाहनापुढे आडवी झाली. त्यावेळी गणपत बर्डे, संपत बर्डे व ज्ञानेश्वर बर्डे यांनी महसुलच्या कर्मचार्‍यांस गाडीतून ओढून धक्काबुकी केली. तसेच आपल्या जातीचा चुकीचा फायदा उचलत अट्रोसिटी व विनयभंगचा गुन्हा दाखल करू अशी त्यांना धमकी दिली. हा सर्व प्रकार घारगाव पोलीस ठाण्यापासुन हक्केच्या अंतरावर घडला ही सर्वात मोठी शोकांतीका आहे.
                   
दरम्यान, आधीच महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांवर कोरोनाचा अतिरिक्त ताण आहे. त्यातच वाळु तस्करांनी तालुक्यात उदमाद घातला आहे. काही दिवसांपुर्वी कोठे व मंगळापुर येथे तलाठी व कोतवालांना धक्काबुकी झाली होती. तो प्रकार घडून महिनाही उलटत नाही तेच पुन्हा वाळुतस्करांनी मंडलअधिकारी व तलाठ्यास धक्काबुकी करून विनयभंग अट्रोसिटी या सारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजातील अशा काही विघातक वृत्तीमुळे मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल हे काम करताना बिचकत आहे. आज कर्मचार्‍यांना धमकी दिली जाते. उद्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली तर काही वावगं वाटु देऊ नका. कारण लॉकडाऊनच्या काळात वाळूतस्करीने तालुक्यात उदमाद घातला आहे. तर एकीकडे तस्करांनची इतकी हिम्मत की त्यांनी पोलीस व तहसील आवारातील ट्रॅक्टर देखील चोरून नेला आहे. तरी देखील आरोपीचा छडा लागत नसल्याने तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.काल धरलेला आरोपी दुसर्‍या दिवशी सुटला जातो. मुख्य आरोपी जेरबंद होत नाही. अवैध वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टरवर नंबरप्लेट नसल्याने खर्‍यामालकाचे नाव पुढे येत नाही. अवैधकाम करत असलेल्या कामगारास पैशाचे आमिष दाखवून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे त्यांच्या जातीचा दुरुपयोग करून अट्रोसिटी सारख्या गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. या सर्व गोष्टीला पडद्यामागचा झारीतला शुक्राचार्य कोण? या वाळुतस्करांना कोणाचा आशीर्वाद आहे. असा प्रश्न संगमनेरच्या सुज्ञ लोकांना पडला आहे.
                       
दरम्यान, संगमनेरात जातीपातीच्या लोकांना पुढे करून राजकारण केले जाते तर कोठे अधिकार्‍यांचे मनोबल खचविले जाते. त्यामुळे, अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग, पोक्सो अशा  प्रकारची गुन्हे दाखल करताना पोलिसांनी विचार केला पाहिजे. त्यातील तत्थ्य तपासले पाहिजे. असे अनागोंदी गुन्हा दाखल झाले तर भल्याभल्या अधिकार्‍यांचा कायद्याहून विश्वास उडून जातो. इतकेच काय! तर नकळत जातील तेढ निर्माण होण्यात खतपाणी घातले जाते. मात्र, एक बाकी नक्की की, अशा प्रकारची बहुतांशी कलमे यांच्यामागे फार मोठा राजकीय स्टण्ट असतो तर काही ठिकाणी गुंडांगिरीचा वरदहस्त असतो. वास्तवत: हे नतद्रष्ठ समाजदोही त्यांच्यामुळे चांगल्या अधिकार्‍यांना कागदी घोडे व मानसिक छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा प्रकारात राजपत्रित अधिकार्‍यांनी लक्ष घालून कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. अन्यथा असे फालतू गुन्हे दाखल झाले तर ना येथील गुन्हेगारी संपुष्टात येईल ना वाळुतस्कारी. आज वाळुतस्कारांच्या फुस घालण्याने अज्ञानी व अनभिज्ञ लोकांचा हात अधिकार्‍यांच्या कॉलरपर्यंत गेला. मात्र, हे आज एनसी व 353 पर्यंत येऊन प्रकरण थांबेल. परंतु उद्या हेच लोक कधीनाकधी अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यासाठी मोर्चे आंदोलने काढतील असा वर्तमान सांगतो आहे. त्यामुळे अशा वेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन का होईना अशा खोट्या गुन्ह्यांचे पडदे फाडले पाहिजे. असे  सुज्ञ व्यक्तींना वाटते आहे.
             अन्यथा प्रशासन कोणतेही असो वेळ आली की कोण कोणाच्या भागे उभे राहत नाही हेच वास्तव आहे. कारण, एका नायब तहसिलदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे फार जुने नाही. तर एका पोलीस कमर्र्चार्‍यास मारहाण झाली तरी त्याच्या मागे कोणी उभे राहिले नाही. या प्रकाराला देखील फार दिवस झाले नाही. त्यामुळे, खात्यात जो-तो सावध भूमिका घेऊन काम करीत असतो. मात्र, काम केले तरी कधीकधी वरिष्ठ नावे ठेवतात आणि नाही केले तरी तेच. त्यामुळे अधिकार्‍यांची अवाजवी अपेक्षा आणि समजातील अशी विघातक वृत्ती यामुळे सरकारी कर्मचारी कोंडीत अडकला आहे. मात्र, त्याच्या पडत्या काळात सर्वानी एक दिलाने उभे राहावे इतकीच प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली आहे.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 61 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------




(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 52 लाख वाचक)