संगमनेर बाळेश्वरात तरुणाच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घातला.! तीन जखमी, पाच जणांवर हाफ मर्डर केस!

                               
सार्वभौम (संगमनेर) : 
                       संगमनेर तालुक्यातील तळेवाडी पोखरी बाळेश्वर परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामार्‍या झाल्याची घटना बुधवार दि. 24 जून रोजी सायकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. यात अमोल साहेबराव घुले (वय 20) यांच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालण्यात आला असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शांताराम यशवंत घोगरे, शिवाजी उर्फ शिवनाथ लहानु फटांगरे, सविता शांताराम घोगरे, चैतन्य शांताराम घोगरे, धिरज शांताराम घोगरे (सर्व रा. तळेवाडी पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर) अशा पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे.
       
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जसा लॉकडाऊन शिथिल झाला आहे. तेव्हापासून लोकांना शेताची कामे हाती घेतली आहे. त्यात पाऊस झाल्यामुळे कोणाच्या पेरण्या तर कोणाच्या नांगरण्या सुरू आहे. त्यामुळे, कोणाचा बांध कोरला जात आहे तर कोणाचा रस्ता नांगरला जात आहेे. कोणाची झाडे तोडली जात आहे तर कोणाची वाट अडविली जात आहे. त्यामुळे गेल्या महिनाभराचा लेखाजोखा घेतला तर लक्षात येते की, नगर जिल्ह्यात कोेठे नाही इतके गुन्हे संगमनेर तालुक्यात दाखल झाले आहेत.             
आता या गुन्ह्यांचे वर्गिकरण केले असता जमिनीच्या वादातून दाखल झालेले गुन्हे जवळजवळ 80 टक्के इतके आहे. म्हणजे महसुलमत्र्यांच्या तालुक्यात वितभर तुकड्यासाठी लोक लाठ्या काठ्या, गज आणि कुर्‍हाडीशिवाय कोणी बोलायला तयार नाही. ही किती मोठी शोकांतीका आहे. तर महत्वाचे म्हणजे हे वाद मिटविण्यासाठी खास एक समिती नेमण्याची गरज आहे. अन्यथा आज किरकोळ कारणांहून रक्तपात होताना दिसत असून मुडदे पडत आहे. हे कष्टकरी शेतकर्‍याच्या दृष्टीने फार शोकांतीका वाटण्यासारखे आहे. त्यामुळे अशा वादांवर पुढाकार घेणे फार महत्वाचे वाटू लागले आहे.        
  तळेवाडी पोखरी बाळेश्वर येथील गुन्ह्यात फारसे काही कारण नव्हते, किरकोळ वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि त्याला वेगळे वळण लागले. हे वाद सुरू असताना शांताराम घोगरे यांनी अमोल घुले यांच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर घुले यांच्यासह इंदुबाई घुले, साहेबराव मारुती घुले, यांना देखील मारहाण करीत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली अशा प्रकारची फियार्र्द ज्ञानेश्वर साहेबराव घुले यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
         

 तर याच प्रकरणात दुसर्‍या गटाच्या संगिता शांताराम घोगरे यांनी समोरच्या चौघांवर गुन्हा दाखल केेला आहे. त्यात म्हटले आहे की, शेतातील वहिवाटीच्या कारणाहून साहेबराव मारुती घुले, इंदुबाई साहेेबराव घुले, ज्ञानेश्वर साहेबराव घुले, अमोल साहेबराव घुले (रा. तडेवाडी, पोखरी बाळेश्वर) यांनी संगिता यांना काठ्या कुर्‍हाडी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुचाकीच्या खोपडीवर मारुन वाहनाचे नुकसान केले. तसेच शांताराम यशवंत घोगरे यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या या जबाबानुसार घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.