वडगावच्या खुनातील गुन्हेगारांना बेड्या ठोकून गावभर मिरविले! आश्रय देणार्या मित्रांनाही अटक!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे रविवार दि.21 जून रोजी चिकन शॉपच्या जवळ बाळासाहेब चत्तर यांचा खून झाला होता. यातील एका आरोपी अटक केला होता. मात्र, मुख्य आरोपीसाठी पोलिसांनी जंग-जंग पछाडले होते. आज गुरूवार दि.25 रोजी मुख्य आरोपी राहुल देविदास काळे यास बेड्या ठोकण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. तसेच त्याच्यासोबत गुन्हेगाराला आश्रय देणार्या दोघांना पोलिसांनी आरोपी केले असून त्यांना देखील अटक करण्यात आले आहे. काळे याची वडगाव पान परिसरात प्रचंड दहशत असून पोलिसांनी त्यास गावात फिरवून त्याची गावातील दहशत कमी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रविण बाळासाहेब चत्तर यांनी रविवारी देविदास हरीभाऊ काळे याच्यासह अन्य एका महिलेसोबत शाब्दीक चकमक व मारामारी झाली होती. याबाबत प्रतिक चत्तर हे काळे यांना समजून सांगत असताना काळे याने त्याच्या हातातील दगड त्यास फेकून मारला. त्यामुळे प्रतिकच्या डोक्याला लागला होता. त्यावेळी काळे यांने बाळासाहेब चत्तर यास ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेतली नाही. मात्र, निवांत दुसर्या दिवशी पोलिस तेथे गेले असता एकामेकांची समज गैरसमज काढण्यात गुंतले होते. मात्र, जर तत्काळ आरोपी अटक केले असते तर पुढील प्रकार टळला असता. परंतु स्थानिक प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा काही पोलीस घटनास्थळाच्या अगदी काही अंतरावर होते. इतकेच काय? हे आरोपी देखील त्यांच्या समोर होते. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. कादाचित गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ प्रतिबंधात्म कारवाई किंवा मुख्य आरोपीस अटक केली असती तर बाळासाहेब चत्तर यांचा जीव वाचला असता.
दरम्यान सोमवार दि. 22 जून रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलीस गावात आले होते. ते गावात असताना त्यांनी काल झालेल्या घटनेची माहिती घेण्यास सुरूवात केली. त्याच वेळी राहूल देविदास काळे, देविदास हरिभाऊ काळे व रामा गायकवाड यांनी काल झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चत्तर यांच्या चिकन शॉपवर जाऊन त्यांनी शिवीगाळ दमदाटी सुरू केली. तर राहुल काळे याने याच्या हातातील चाकुने बाळासाहेब चत्तर यांच्या पोटात चाकु खुपसत त्यांची हत्या केली होती. तसेच त्याचा मुलगा प्रतिक याच्या दंडावर आणि पाठीवर वार करुन घटनास्थळाहून पळ काढला होता. विशेष म्हणजे यातील काही आरोपी पुर्वी एक मटका प्रकार चालवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
या घटनेनंतर पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत यांनी घटनेची चौकशी केली. रोशन पंडीत यांनी घटनास्थळी घाव घेऊन तपासी अधिकारी पप्पू कादरी यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल याचा शोध सुरू केला होता. गेल्या 24 तास पोलिसांनी पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद अशा विविध जिल्ह्यात त्याचा शोध घेण्यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र, एक कादरी यांना एक धागा सापडताच त्यांनी राहुल यास नगर येथून अटक केली. तर काळे हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून देखील त्यास त्याच्या मित्रांनी आश्रय दिला. त्यामुळे, शुभम दिलीप सिंग परदेशी (रा. संगमनेर) व महेश संपत सुपेकर (रा. मुळशी, ता. पुणे) या दोघांने अटक केली आहे.
दरम्यान काळे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे गावात त्यांची दहशत आहे. ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी त्यास बेड्या ठोकून गावातून त्यास फिरविले. एरव्ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रुटमार्च करीत संचलन करणार्या पोलिसांनी गुन्हेगारांची भिती कमी करण्यासाठी चक्क त्यांचा गावभर फिरविले. त्यामुळे पोलिसांचे नागरिकांनी कौतुक केले आाहे.